मराठी सिनेसृष्टीतील ‘या’ चित्रपटात पहिल्यांदाच वाजणार अहिराणी भाषेतील गाणं

खान्देशी संस्कृती आणि व्यापार उद्योगाच्या नव्या संधी उपलब्ध करून देणारे एकमेव व्यासपीठ “ग्लोबल खान्देश महोत्सव”. हा महोत्सव यंदा कल्याण येथे पार पडला. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्यानिमित्ताने “मराठी पाऊल पडते पुढे” या चिराग पाटील आणि सिद्धी पाटणेच्या आगामी सिनेमाचे आहिराणी भाषेतील गाणे “हाऊ पोऱ्या अनेर काठणा” हे या कार्यक्रमात लॉंच करण्यात आले. या गाण्याचे संगीत इतके अनोखे आहे की जमलेल्या सर्व लोकांना त्यावर ताल धरायचा मोह आवरला नाही.

मुख्य म्हणजे हे गाणे चिराग पाटील यांच्यावर चित्रित झाले असून त्या कार्यक्रमात चिराग आणि सिध्दीने देखील गाण्यावर ठेका धरला आणि वातावरणात एक वेगळाच उत्साह आला. या गाण्याचे गीतकार आणि गायक  “जळगाव भूषण पुरस्कार” विजेते प्रवीण माळी सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते.

चित्रपटाच्या संपूर्ण टीमने म्हणजेच कलाकार चिराग पाटील आणि सिद्धी पाटणे सहित दिग्दर्शक, निर्माते, संगीत दिग्दर्शक साऱ्यांनीच भगवे फेटे परिधान करत महाराष्ट्र दिनानिमित्त मराठी अस्मिता जोपासली. या दरम्यान गीतकार गायक प्रवीण माळी यांनी स्वतः त्यांच्या भारदस्त आवाजात लॉन्च झालेले गाणे सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली.

शिवलाईन इन्कम ग्रोथ प्रा.लि. निर्मित मराठी पाऊल पडते पुढे सिनेमाचे सहनिर्माते चंद्रकांत विसपुते असून संगीत दिग्दर्शक समीर खोले यांनी सिनेमाची सर्व गाणी संगीतबद्ध केली आहेत. बाविस्कर ग्रुप, नवी मुंबई यांचे प्रमुख सहकार्य या चित्रपटाला लाभले आहे. स्वप्नील मयेकर दिग्दर्शित तसेच अभिनेता चिराग पाटील आणि अभिनेत्री सिद्धी पाटणे, जेष्ठ अभिनेते अनंत जोग, सतीश पुळेकर, अभिनेते सतीश सलागरे आणि संजय कुलकर्णी या सर्वांच्या प्रमुख भूमिका असलेला चित्रपट “मराठी पाऊल पडते पुढे” हा एका धडाडी तरुण उद्योजकाची कथा आहे. या सिनेमाचे संगीत लेबल झी म्युझिक कंपनी असून पोस्ट प्रोडक्शन प्रोसेसिंग चे काम यूएफओ तर्फे झाले आहे. ऍक्शन, इमोशन्स आणि दर्जेदार डायलॉग्ज असलेला चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 


हेही वाचा :अक्षय कुमारचे हिंदीसिनेसृष्टीत ३० वर्ष पूर्ण, ‘पृथ्वीराज’ चित्रपटानिमित्त अनोख पोस्टर सादर