अक्षय कुमारने केला भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज; म्हणाला… “जेव्हा लोक काहीही बोलतात, तेव्हा..”

अक्षय कुमारने अलीकडेच त्याच्या आगामी 'सेल्फी' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान एका मुलाखतीत त्याच्या नागरिकत्वाबद्दल सांगितले.

Akshay Kumar has applied for Indian citizenship

अक्षय कुमारने अलीकडेच त्याच्या आगामी ‘सेल्फी’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान एका मुलाखतीत त्याच्या नागरिकत्वाबद्दल सांगितले. यावेळी अक्षय कुमार म्हणाला की, भारतच त्याच्यासाठी सर्वस्व आहे आणि त्याने आधीच पासपोर्ट बदलण्यासाठी अर्ज केला आहे. तर त्याच्या कॅनेडियन नागरिकत्वाचे कारण न समजता लोक काहीही बोलतात तेव्हा वाईट वाटते, असेही त्याच्याकडून यावेळी सांगण्यात आले.

15 चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर अक्षयने नागरिकत्वासाठी केला होता अर्ज
यावेळी अक्षय कुमार याने त्याच्याकडे कॅनिडीयन नागरिकत्व का आहे? याबाबतचा खुलासा केला. तो म्हणाला की, ‘मी जे काही कमावलं, जे काही मला मिळालं ते इथूनच मिळाले आहे आणि ते परत देण्याची संधी मला मिळाली यासाठी मी भाग्यवान आहे. जेव्हा लोक काहीही नकळत बोलतात तेव्हा मला वाईट वाटते.’ तसेच 1990 च्या दशकात अक्षय कुमारचे 15 हून अधिक चित्रपट फ्लॉप झाले होते. याविषयी बोलताना तो म्हणाला की, चित्रपटांच्या बॉक्स ऑफिसवर खराब कामगिरीमुळे मला कॅनडाच्या नागरिकत्वासाठी अर्ज करण्यास प्रवृत्त केले होते.

मित्राच्या सांगण्यावरून अक्षयला जायचे होते कॅनडाला
अक्षयने यावेळी सांगितले की, ‘मला वाटले की माझे चित्रपट चालत नाहीयेत आणि मला काम करावे लागेल. मी तिथे कामासाठी गेलो होतो. माझा मित्र कॅनडामध्ये होता आणि तो म्हणाला इकडे ये. मी अर्ज केला आणि निघालो.’

पासपोर्ट बदलण्यासाठी केला आहे अर्ज
अक्षयने याबाबत पुढे सांगितले की, ‘माझे फक्त दोनच चित्रपट रिलीज व्हायचे बाकी होते आणि ते दोन्ही सुपरहिट झाले ही भाग्याची गोष्ट आहे. माझा मित्र म्हणाला परत जा, पुन्हा कामाला लाग. मला आणखी काही चित्रपट मिळाले आणि अजून काम मिळत राहिले. माझ्याकडे पासपोर्ट आहे हे मी विसरलो होतो. हा पासपोर्ट बदलून घ्यावा असे मला कधीच वाटले नव्हते, पण आता हो, मी माझा पासपोर्ट बदलण्यासाठी अर्ज केला आहे.’

कॅनेडियन नागरिकत्वामुळे अक्षय नेहमीच लोकांच्या निशाण्यावर असतो. त्याचे कॅनडाचे नागरिकत्व हा नेहमीच लोकांमध्ये चर्चेचा विषय राहिला आहे. अक्षयने तीन वर्षांपूर्वी त्याच्या चाहत्यांना वचन दिले होते की, तो लवकरच भारतीय पासपोर्टसाठी अर्ज करेल.

हेही वाचा – बॉलिवूडच्या “चांदणी”ची आज पाचवी पुण्यतिथी; पोस्ट शेअर करत पती आणि मुलगी झाले भावूक

अक्षय लवकरच ‘सेल्फी’ चित्रपटात दिसणार आहे. यात त्याच्यासोबत इमरान हाश्मी आणि नुसरत भरुचा देखील आहेत. हा चित्रपट 24 फेब्रुवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. याचे दिग्दर्शन राज मेहता यांनी केले आहे. हा चित्रपट ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ या मल्याळम चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. यानंतर अक्षय कुमार टायगर श्रॉफसोबत ‘बडे मियां छोटे मियाँ’मध्ये देखील दिसणार आहे. याशिवाय त्याच्याकडे ‘ओह माय गॉड 2’, ‘फिर हेरा फेरी 2’ सारखे चित्रपट आहेत.