बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमार सध्या प्रचंड चर्चेत आला आहे. नुकताच त्याचा ‘स्काय फोर्स’ हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. गेल्या काही काळात अक्षय कुमारवर सलग फ्लॉपचा डाग लागला होता. मात्र, या सिनेमाच्या निमित्ताने हा डाग पुसला जाण्याची शक्यता आहे. अशातच आणखी एका गोष्टीमुळे खिलाडी चर्चेचा विषय बनला आहे. माहितीनुसार, अभिनेता अक्षय कुमारने नुकतंच मुंबईतील लक्झरी अपार्टमेंट कोट्यवधींना विकले आहे. हे अपार्टमेंट त्याने 2017 मध्ये घेतलं होत. याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया. (Akshay Kumar sold his luxury apartment in Mumbai)
खिलाडी झाला मालामाल
अभिनेता अक्षय कुमारने त्याचे मुंबईतील एक अपार्टमेंट विकल्याची माहिती समोर आली आहे. हे अपार्टमेंट बोरीवली पूर्व येथे स्थित आहे. 2017 साली अभिनेत्याने हे अपार्टमेंट विकत घेतलं होतं. यानंतर 8 वर्षांनी त्याने या अपार्टमेंटची कोट्यवधींमध्ये डील केल्याचे समजत आहे. शुक्रवारी एका निवेदनात रिअल इस्टेट सल्लागार स्क्वेअर यार्ड्सने या डीलविषयी माहिती दिली आहे. ज्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की, अक्षय कुमारने विकलेले अपार्टमेंट हे स्काय सिटीमध्ये आहे. स्काय सिटी हा ओबेरॉय रियल्टीने विकसित केलेला प्रकल्प आहे. जो एकूण 25 एकरात पसरलेला आहे.
या निवेदनात असेही सांगितले आहे की, अक्षय कुमारने विकलेल्या अपार्टमेंटच्या व्यवहाराशी संबंधित मालमत्ता नोंदणी दस्तऐवजांचीदेखील पूर्ण तपासणी करण्यात आलाय आहे. यानंतर त्याचा सौदा पूर्ण करण्यात आला.
अभिनेत्याला खरेदी किमतीपेक्षा 78% नफा प्राप्त
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने 2017 साली नोव्हेंबरमध्ये हे अपार्टमेंट खरेदी केले होते. या अपार्टमेंटचा कार्पेट एरिया 1073 चौरस फूट इतका आहे. ज्याची किंमत त्यावेळी 2.38 कोटी इतकी होती. 8 वर्षांनी आता जानेवारी 2025 मध्ये जेव्हा त्याने ही मालमत्ता विकली तेव्हा अभिनेत्याला चांगला नफा झाल्याचे समजत आहे. 2.38 कोटी रुपयांना खरेदी केलेले हे अपार्टमेंट अभिनेत्याने नुकतेच 4.25 कोटी रुपयांना विकले आहे. यानुसार त्याला खरेदी किमतीपेक्षा विक्रीतून 78% नफा मिळाला आहे. या व्यवहाराकरता मुद्रांक शुल्क म्हणून 25.5 लाख आणि नोंदणी शुल्क म्हणून 30 हजार रुपये भरण्यात आले आहेत. याबाबतची सविस्तर माहिती स्क्वेअर यार्ड्सने दिली आहे
आता कुठे राहतो अक्षय कुमार?
सध्या अक्षय कुमार आणि त्याची पत्नी ट्विंकल खन्ना हे दांपत्य त्यांच्या दोन्ही मुलांसोबत मुंबईतील जुहू स्थित आलिशान सी-फेस डुप्लेक्समध्ये वास्तव्यास आहेत. त्यांच्या या सुंदर घराची किंमत 80 कोटींपेक्षा जास्त आहे. या लक्झरी घरात सर्व आधुनिक सुखसोयी उपलब्ध असून इथे एक सुंदर बागदेखील आहे. मुख्य म्हणजे अभिनेत्याच्या घरातून थेट अरबी समुद्राचे दृश्य दिसते. मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्याच्या आणखी काही मालमत्ता आहेत. ज्यात खार येथील जॉय लीजेंडमध्ये एक आलिशान फ्लॅट आहे. हा फ्लॅट अभिनेत्याने 2022 मध्ये 7.8 कोटी रुपयांना घेतला होता.
हेही वाचा –
Mamta Kulkarni : अभिनेत्री ममता कुलकर्णीने घेतला संन्यास, बदलले नाव