वेध लग्नाचे? सोशल मीडियावर चर्चा

उपलब्ध माहितीनुसार आलिया आणि रणवीर आपापल्या आईसोबत एका कार्यक्रमाला गेले होते. त्यावेळी या चौघांनी हा फोटो काढल्याचं समजतं आहे.

सौजन्य- इन्स्टाग्राम

अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या अफेअरची सध्या बी-टाऊनमध्ये जोरदार चर्चा आहे. त्यातही सध्या हे दोघे ‘ब्रम्हास्त्र’ या आगामी चित्रपटाचे एकत्र शूटिंग करत असल्यामुळे, या चर्चांना अधिकच उधाण आलं आहे. आलिया आणि रणबीरमध्ये नेमकं काय शिजतंय? हे जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांमध्येही तितकीच आहे. अशातच आता नुकताच समोर आलेला एक नवीन फोटो या चर्चांना खतपाणी घालणारा ठरतो आहे. या फोटोमध्ये आलिया आणि रणबीर आपापल्या आईंसोबत दिसत आहेत. आलियाची आई सोनी राझदान आणि रणबीरची आई नितू सिंग या दोघी फोटोत एकत्र असल्यामुळे आता चर्चांना आणखीनच जोर आला आहे. ‘रणबीर आणि आलियाने आपल्या लग्नाची बोलणी करण्यासाठी या दोघींची भेट घडवून आणली का?’ अशाप्रकारचे प्रश्न चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून उपस्थित करत आहेत. बी-टाऊनमध्येही या फोटोवरुन आता चर्चा रंगू लागल्या आहेत. उपलब्ध माहितीनुसार आलिया आणि रणवीर आपापल्या आईसोबत एका कार्यक्रमाला गेले होते. त्यावेळी या चौघांनी हा फोटो काढल्याचं समजतं आहे.

दरम्यान रणबीर कपूरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत, रणबीरची आई नितू सिंगने हा फोटो त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे.

‘या’ फोटोचाही बोलबाला

दरम्यान काहीच दिवसापूर्वी सोशल मीडियावर आणखी एक फोटो व्हायरल झाला होता. ज्या फोटोमध्ये बॉलीवूडचे अनेक स्टार्स एकत्र दिसत आहेत. बुधवारी रणबीर कपूरने आपल्या घरी एका पार्टीचं आयोजन केलं होतं. ज्यामध्ये शाहरुख खान, अमिर खान, आलिया भट्ट, रणावीर सिंह, दीपिका पदुकोण आदी स्टार्सनी हजेरी लावली होती. याच सगळ्यांचा एक ग्रुप फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि विविध चर्चांना उधाण आलं. कारण या फोटोमध्ये आमिर आणि शाहरुखसारखे दोन मोठे स्टार्स तर एकत्र होतेच, पण त्याशिवाय दीपिका पदुकोणचा पूर्वप्रेमी रणबीर कपूर आणि सध्या ज्याच्यासोबत तिचं नाव जोडलं जात आहे असा रणवीर सिंग, या फोटोमध्ये एकत्र दिसत आहेत.