4 डिसेंबर रोजी ‘पुष्पा 2’च्या प्रदर्शनादरम्यान हैदराबादच्या आयकॉनिक संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला तर एक बालक गंभीर जखमी झाला. याच प्रकरणासंबंधी स्थानिक पोलिसांनी 13 डिसेंबर रोजी सुपरस्टार अल्लू अर्जुनला त्याच्या घरातून अटक केली होती. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी पोलिसांच्या कारवाईला पाठिंबा देत अल्लू अर्जुनवर निष्काळजीपणाचा आरोप केला होता. चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याने हैदराबादचे लोक संतप्त झाले असून अल्लू अर्जुनबद्दल त्यांचा राग वाढत आहे.
रविवारी (२२ डिसेंबर रोजी) अल्लू अर्जुनच्या हैदराबाद येथील घरावर उस्मानिया विद्यापीठातील काही लोकांनी हल्ला केला. अल्लूच्या, हैदराबादमधील जुबली हिल्स परिसरात असलेल्या घरावर हल्ला करून तोडफोड केली. आंदोलकांनी अभिनेत्याच्या घरावर दगडफेक केली आणि संध्या थिएटरमधील महिलेच्या मृत्यूसाठी न्याय देण्याची मागणी केली. यासोबतच लोकांनी पुष्पाभाऊंच्या विरोधात घोषणाबाजी देखील केली. या घटनेनंतर काही वेळाने अल्लू आपली पत्नी आणि मुलांसह घर सोडून बाहेर पडला. या घटनेत सहभागी असलेल्या आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हल्ल्याच्या वेळी अल्लू अर्जुन घरी नव्हता. त्या हल्ल्यानंतर काही वेळाने तो, त्याची पत्नी स्नेहा रेड्डी हे दोघेजण मुलांसह (अल्लू अरहा आणि अल्लू अयान) घरातून बाहेर पडताना दिसले. मुलावर झालेल्या हल्ल्यानंतर अभिनेत्याचे वडील अल्लू अरविंद यांनी मौन तोडले आहे.
काय म्हणाले अल्लूचे वडील ?
अल्लू अरविंद यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “आमच्या घरी जे घडले ते सर्वांनी पाहिले, परंतु हीच वेळ आहे धीर धरण्याची आणि परिस्थितीनुसार वागण्याची.” ते पुढे म्हणाले की, “पोलिसांनी हल्लेखोरांना अटक केली आहे. मी केवळ मीडिया इथे आहे म्हणून प्रतिक्रिया देत नाही, तर आता संयमाची वेळ आली आहे म्हणून मी प्रतिक्रिया देत आहे. माझ्या घराजवळ कोणीही गोंधळ घालू नये, यासाठी पोलीस तैनात आहेत. अशा घटनांना कोणीही प्रोत्साहन देऊ नये. ही संयम ठेवण्याची वेळ आहे. कायद्याने हे प्रकरण मार्गी लागेल.”
हेही वाचा : Allu Arjun : अल्लू अर्जुनवरचं संकट संपता संपेना; ‘त्या’ महिलेच्या मुलाचा ब्रेन झाला डॅमेज
Edited By – Tanvi Gundaye