घर मनोरंजन आता दाक्षिणात्य आणि हॉलीवुडपटांकडे लक्ष : अमिषा पटेल

आता दाक्षिणात्य आणि हॉलीवुडपटांकडे लक्ष : अमिषा पटेल

Subscribe

– हर्षदा वेदपाठक

गदर दोन या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पाचशे करोड पेक्षा अधिकचा गल्ला जमवला. या चित्रपटाच्या जोरदार यशाने पुन्हा एकदा प्रकाशझोता मध्ये आलेली अमिषा पटेल सध्या या यशाचा आनंद साजरा करताना दिसत आहे. सकीना या भूमिकेला मिळालेले यश आणि इतरही अनेक विषयांवर तिच्या बरोबर मोकळेपणाने गप्पा मारल्या.

- Advertisement -

सर्वप्रथम एक सांग, २००१ पासून तु तुझे सौंदर्य टीकून ठेवले आहेस, काय गुपित आहे त्याचे?

दिवसेंदिवस अधिकाधिक सुंदर होण्यासाठी मी काय खातेपिते, याबाबत लोक मला नेहमी विचारत असतात. त्यावर माझे उत्तर अगदी साधे असते – मी काय खाते यापेक्षा, मी काय खात नाही हे महत्वाचे – मी ड्रग्ज घेत नाही, दारु पित नाही, धूम्रपान करत नाही. मला वाटते माझ्या याच सवयींनी मला निरोगी आणि सुंदर ठेवले आहे. आणखीन महत्वाचे म्हणजे माझे मन साफ आहे.

- Advertisement -

गदर दोनला प्रेषक ऐवढ्ये पसंद करतील असे वाटले होते काय?

इतक्या अभूतपूर्व यशाला मी अजूनही पचवत आहे. लोकांना तारा आणि सकिना यांच्यावर खूप प्रेम आहे. बावीस वर्ष ते या भूमिके बरोबर जगलेत. आम्ही त्यांच्या मनात घर करून होतो हि भावनाच सुखावणारी आहे. खूप आभारी आहे मी प्रेक्षकांची आणि देवाची.

तुझा पहिलाच चित्रपट कहो ना प्यार है प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला होता. गदर चित्रपटाच्या मालिकेला केवळ व्यावसायिक यशच मिळाले असे नाही, तर त्यातील तुझ्या भूमिकेचेही चांगलेच कौतुक झाले. आता नवे चित्रपट निवडणे अधिक आव्हानात्मक झाले आहे का?

मला वाटते, मी नेहमीच वेगवेगळे प्रयोग केले आहेत आणि वेगळ्या भूमिका साकारण्याचा प्रयत्न केला आहे. काही भूमिका स्विकारल्या जातात तर काही नाही. गदरपेक्षाही अधिक चांगले काम करणे हे नक्कीच खूप कठीण आहे. जेंव्हा लोकांच्या अपेक्षा एवढ्या उंचावलेल्या असतात, तेंव्हा पुढे काय करावे या विचाराने तुमच्या मनावरही तणाव येतो. असे चित्रपट करण्यात ही गोम असते.

भूमिकेच्या लांबीला महत्व न देण्याच्या तुझ्या निःस्वार्थी विचाराला तू श्रेय देतेस का?

लोकांनी मला गदर न करण्यास सांगितले तेंव्हा मी निःस्वार्थी राहीले. ‘तू आईची भूमिका कशी करु शकतेस. तू महाविद्यालयीन मुलगी आहेस,’ असे ते सांगत होते. ‘तुझे इतर सगळे चित्रपट ग्लॅमरस आहेत, तू पाश्चिमात्य कपड्यांमध्ये आहेस. अशा वेळी तुझ्या दुसऱ्या चित्रपटात आईची भूमिका करणे हे हास्यास्पद आहे’. पण मला पटकथा खूप आवडली आणि मला त्याचा भाग बनायचे होते. मला वाटते, माझ्या मनाचा आवाज ऐकून मी नेहमीच भूमिकेच्या लांबीपेक्षा तिच्या दर्जाला महत्व देते.

तारा सिंग आणि सकीनाने, तिकीट खिडकीवरचा दुष्काळ संपवला, असे तुला वाटते का?

तारा आणि सकीनाने वीस वर्षांहून अधिकचा काळ लोकांच्या मनात स्थान कायम केले आहे हे आम्हाला माहीत होते. लोकांनी गदरकडे एक चित्रपट म्हणून नाही तर एक भावना म्हणून पाहीले. सनी आणि मी हा वारसा पुन्हा एकदा जगत होतो, जे यापूर्वी कोणीही केले नव्हते. मग ते रोमॅंटीक चित्रपटात असेल किंवा कलात्मक चित्रपटात… यापूर्वी बनलेल्या पाकीजा, मदर इंडीया किंवा अगदी शोले सारख्या कल्ट चित्रपटांचेही भाग २ बनलेले नाहीत. त्यामुळे आम्हीसुद्धा थोडेसे चिंतित होतो. पण आम्हाला असेही वाटत होते की, तारा और सकीना के साथ क्या होता है… हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांनाही असेल. त्यामुळे आम्ही हा धोका पत्करला. शुक्रवार किंवा शनिवारी हाऊसफुल्ल चा बोर्ड लागावा म्हणून आम्ही हा चित्रपट बनवला नव्हता. आम्ही प्रामाणिकपणे हा वारसा जपण्याचा प्रयत्न केला.

फ्लॅशफॉरवर्ड आणि फ्लॅशबॅकचे इतके आश्चर्यकारकरीत्या छान एकत्रिकरण करण्याविषयी तुझे काय मत आहे. गदर दोन यशस्वी होण्यामागचे प्रमुख कारण काय आहे?

आमचा मुलगा, जीतेचे (उत्कर्ष शर्मा) वडील तारा सिंग यांना परत मिळवण्यासाठी पाकिस्तानला भावनिक प्रस्थान करतो. सनी आणि मी खूप निःस्वार्थी आहोत. अमिषाने चांगले काम केले नाही, असे माझ्या दिग्दर्शकांना (अनिल शर्मा) किंवा एकूणच टीमला वाटू नये, अशी माझी इच्छा होती. त्याचबरोबर सकीना पुन्हा पाकिस्तानला जाणार नाही, हे देखील निश्चित होते, कारण आम्हा प्रेक्षकांना पुन्हा एकदा तोच चित्रपट द्यायचा नव्हता. माझ्या मते जेंव्हा एखादा कलाकार कमी स्वार्थी असतो आणि चित्रपटाच्या एकूण गुणवत्तेकडे पहातो, तेंव्हा तुम्ही तुमचा चित्रपट अगदी मनापासून बनवत असता.

या क्षेत्रातील तुझ्या रोलर कोस्टर प्रवासाकडे तू कसे पहातेस?

सकीनाला तिच्या चाहत्यांकडून आजही ते प्रेम आणि आदर मिळतो ही फारच आनंददायी भावना आहे. मी माझ्या सगळ्या चित्रपटांमध्ये स्वतःला झोकून देते, अगदी तिकीट खिडकीवर फारशी चांगली कामगिरी न केलेल्या चित्रपटांमध्येही. कारण माझ्या चाहत्यांना, माझ्या दिग्दर्शकांना कधीच असे वाटू नये की, अमिषाने, कुछ काम नही किया.. मी जे चित्रपट स्वीकारते, त्यातील काही चित्रपट चालतात तर काही चालत नाहीत. माझे लक्ष त्या व्यक्तिरेखेकडे कायमच असेल. आणि मी वेगवेगळ्या गोष्टींच्या शोधात असते.

तुझ्या मते चित्रपट जोरदार आपटण्यामागे काय कारणे असावीत?

आजकाल तुम्ही जर पाहीले, तर निर्माता चित्रपटाचे नियोजन असे करतात की, त्यांना तीस दिवसांत चित्रपट पूर्ण करायचा असतो. कोणीही त्याच्या कथेवर काम करत नाही. जर त्यांच्याकडे त्या अभिनेत्याच्या तारखा असतील तर ते चित्रपट करण्याचा निर्णय घेतात. कॉर्पोरेटायझेशने बॉलीवुडला खूप बदलले आहे. पूर्वी आम्ही दोन वर्षे किंवा त्याहूनही जास्त काळ कलाकाराची वाट पहात असायचो. त्याचप्रमाणे, जर एखादी अभिनेत्री एखाद्या भूमिकेत चपखल बसत असेल, तर ते तिची वाट पहायचे. कारण त्यांना हे समजत होते की योग्य कलाकारांची निवड म्हणजे अर्धी लढाई जिंकल्यासारखे आहे. आता, सेटवरचे त्यांचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करणे त्यांना ठीक वाटते. बहुतेक चित्रपट चित्रपटगृहात पाहीलेच जात नाहीत, कारण अंतिमतः तो कसा झाला आहे, यात कोणालाच रस नसतो. गदर दोन मध्ये आम्ही दाखवलेल्या धैर्याचे चीज झाले, कारण आम्ही कथा, संगीत, व्यक्तिरेखांना महत्व दिले आणि कथेच्या बीजाशी ईमान राखले आहे

तु फारसे चित्रपट करताना दिसत नाही, काय कारण आहे?

चित्रपटांचे जग आता अधिक खुले होत आहे. त्यामुळे मला जे काही काम करायचे असेल त्याला न्याय देणाऱ्या, चांगल्या संधी मला मिळतील, अशी मला आशा असते. अशा कितीतरी गोष्टी आहेत, ज्या मी अजून करुन पाहीलेल्या नाहीत. सलमान (खान) बरोबर ये है जलवा (२००२) मध्ये मी विनोदी भूमिका करण्याचा प्रयत्न केला. पण आता मला संपूर्णपणे विनोदी भूमिका आणि स्पाय थ्रिलर करण्याची इच्छा आहे. न्याय व्यवस्थेवर आधारीत चित्रपटात वकीलाची भूमिका करायची इच्छा आहे. मुघल काळ किंवा चौल साम्राज्याच्या राजवटीच्या काळावर आधारीत चित्रपटांमध्ये काम करायला आवडेल. माझ्याकडे, अजूनही न वापरलेली गुणवत्ता भरपूर आहे. पण ज्यामध्ये नायिकांनाही महत्वाच्या भूमिका असतील, असे चित्रपट बॉलीवुडमध्ये बनवले जात नाहीत.

ओटीटी बद्दल काय वाटते?

मला ओटीटीवर चांगले चित्रपट/सिरीज करायला खूप आवडेल. मला अनेकदा विचारणा झालेल्या ओटीटीवरील कामात अंगप्रदर्शन आणि खूप वाईट भाषा तसेच शिविगाळ होती. मला ते करायला आवडत नाही कारण माझे व्यक्तिमत्व तसे नाही आणि मला नाही वाटत माझ्या चाहत्यांनाही मला शिविगाळ करताना पहायला आवडेल. त्यांच्या दृष्टीने मी सुसंस्कृत, सौम्य आणि गोड मुलगी आहे. हमराज (२००२) सारख्या दमदार भूमिका करु शकते, पण मला नाही वाटत, माझ्या चाहत्यांना मला आईबहीणीवरुन शिव्या देताना किंवा उत्तान दृष्ये देताना पहायचे आहे. ते माझे व्यक्तिमत्व मुळीच नाही. त्यांना माझी शालीन प्रतिमा कायम ठेवायची आहे. कौटुंबिक मुलीमधून मी ती अचानक मोडू शकत नाही. सकीना आणि सोनियावर कुटुंबांनी प्रेम केले आहे. मला त्यांचे प्रेम आणि आदर गमवायचा नाही.


हेही वाचा- अभिनेता शाहरूख खान म्हणतो ‘थँक्यू नाशिक’; ‘हे’ आहे कारण…

- Advertisment -