अमिताभ बच्चन यांनी दिली आपल्या आरोग्याची माहिती, शूटिंगच्या सेटवर झाले होते जखमी

मुंबई : बॉलिवूडमधील बिग बी अमिताभ बच्चन यांनी हे एका चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना जखमी झाले. यात त्यांच्या बरगडीला मार बसला होता. पण आता त्यांनी ब्लॉगमधून आपल्या स्वास्थ्याची माहिती दिली आहे. आता तब्येत हळूहळू सुधारत असल्याचे त्यांनी सांगितले.

अमिताभ बच्चन यांचा फिल्म इंडस्ट्रीवरील करिष्मा अद्याप कायम आहे. बिझी कलावंत म्हणून ओळखले जातात. हैदराबाद येथे एका चित्रपटातील (प्रोजेक्ट के) अॅक्शन सीनचे शूटिंग सुरू असताना त्यांच्या बरगड्यांना मार बसला. याची माहिती त्यांनी आपल्या ब्लॉगमधून दिली होती. ‘हैदराबादमध्ये प्रोजेक्ट केमधील अॅक्शन सीन शूट केला जात होता. त्यादरम्यान मी जखमी झालो. यामुळे बरगड्या मोडल्या आहेत. तर, उजव्या बरगडीच्या स्नायूलाही दुखापत झाली आहे. अपघातामुळे शूटिंग रद्द करण्यात आले आहे. डॉक्टरांचा सल्ला घेतला आहे. हैदराबादच्या एआयजी हॉस्पिटलमध्येही स्कॅन करण्यात आले आहे. आता मी घरी परतलो आहे… चालताना खूप त्रास होतोय. गोष्टी पूर्वपदावर यायला थोडा वेळ लागेल. वेदनाशामक औषधेही दिली आहेत. स्थिती सामान्य होईपर्यंत कोणतीही हालचाल न करण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला आहे,’ असे त्यांनी या ब्लॉगमध्ये म्हटले होते.

नाग अश्विन दिग्दर्शित हा अॅक्शनपट असून चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्याशिवाय प्रभास, दीपिका पदुकोण आणि दिशा पटनी मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाची रिलीज डेट 12 जानेवारी 2024 आहे. आता अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगमध्ये आपल्या स्वास्थ्याबद्दलची अपडेट दिली आहे. ‘सर्वप्रथम, ज्यांनी माझ्या दुखापतींबद्दल चिंता व्यक्त केली त्या सर्वांच्या प्रार्थनांबद्दल मी माझे प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करतो. तुम्ही माझ्याबद्दल जी चिंता व्यक्त करता, ते पाहून मी भारावून गेलो आहे. पूर्वीपेक्षा मी हळूहळू बरा होत आहे. आता वेळ लागेल, पण डॉक्टरांनी सांगितलेले पथ्यपाणी मी अत्यंत काळजीपूर्वक पाळत आहे, असे 80 वर्षीय अमिताभ यांनी म्हटले आहे.

‘कुली’च्या प्रसंगाची आठवण
सन 1982 मध्ये कुली चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अमितभ यांना गंभीर दुखापत झाली होती. दुखापतीसह विविध आजारांमुळे त्यांची स्थिती अधिकच गंभीर बनली होती. त्यांना बरे वाटावे म्हणून देशभरात ठिकठिकाणी प्रार्थना केली जात होती. तीन महिन्यांनी बरे होऊन ते घऱी परतल्यानंतर देशात जल्लोष साजरा करण्यात आला होता.