‘महानायक अमिताभ बच्चन पुन्हा एकदा जुहूच्या बंगल्यावरुन हात दाखवतील’

amitabh bachchan rais hand
अमिताभ बच्चन आपल्या बंगल्यातून चाहत्यांना हात दाखविताना

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन.. सहस्र वर्षातला महान अभिनेता म्हणून अमिताभ यांची गणना केली जाते. अमिताभ बच्चन यांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती खुद्द त्यांनीच आपल्या ट्विटर हँडलवर दिली आणि क्षणात जगभरातून प्राथर्ना सुरु झाल्या. ट्विटर आणि इतर सोशल मीडिया साईटवर ते लवकर बरे होतील, असे मेसेजेस, कमेंट पडू लागल्या. जुन्या जाणत्या लोकांना लागलीच १९८२ ची आठवण झाली. कुली चित्रपटावेळी झालेल्या अपघातानंतर याचप्रकारे देश आणि जगभरातून अमिताभ यांच्यासाठी प्रार्थना करण्यात आली. ते बरे झालेही आणि त्यानंतर जुहूच्या बंगल्यातून चाहत्यांना हात दाखविण्याची परंपरा सुरु झाली. आता देखील अमिताभ बच्चन लवकरच बरे होऊन घरी येतील आणि पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांना हात उंचावून दाखवतील, अशी प्रार्थना करुयात.

amitabh tweet
अमिताभ बच्चन यांचे ट्विट

अमिताभ बच्चन यांनी १० वाजून ५२ मिनिटांनी ट्विटरवर कोरोनाच्या संसर्गाबद्दलची माहिती दिली. त्यानंतर जवळपास तासाभरातच त्यांच्या ट्विटला अद्वितीय असा प्रतिसाद मिळाला. जवळपास २ लाख १५ हजार लोकांनी या ट्विटला लाईक केले होते, तर ८० हजार रिट्विट मिळाले होते. तर एक लाखाहून अधिक लोकांनी या ट्विटखाली कमेंट करुन अमिताभ लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना केली होती. ही आकडेवारी फक्त रात्रीच्या १२ वाजेपर्यंतची आहे. त्यानंतरही मिनिटा मिनिटाला हे आकडे वाढत जातील.

अमिताभ बच्चन यांच्या या ट्विटखाली सामान्य चाहत्यांसोबतच अनेक मान्यवर सेलिब्रिटी, खेळाडू, राजकारणी, जागतिक पातळीवरील सेलिब्रिटींनी ते लवकर बरे होतील, अशी मनीषा व्यक्त केली आहे.

२६ जुलै १९८२ रोजी कुली चित्रपटाचे शुटिंग करत असताना अमिताभ बच्चन यांना अपघात झाला होता. त्यानंतर जवळपास महिनाभर ते रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांची तब्येत अतिशय नाजूक झाली होती. मात्र त्या संकटावर त्यांनी यशस्वीरित्या मात केली. त्यावेळी देखील अशाचप्रकारे जगभरातून प्रार्थनाचा वर्षाव झाला होता. ११ ऑक्टोबर हा अमिताभ यांचा जन्मदिवस आहे. मात्र ते ज्या दिवशी बरे झाले, तो २ ऑगस्ट हा दिवस त्यांचा दुसरा जन्मदिवस म्हणून बच्चन कुटुंबिय साजरे करतात.