‘बिग बीं’ कडून पान मसाला कंपनीला कायदेशीर नोटीस

बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांना काही दिवसांपूर्वी एका पान मसाला कंपनीच्या जाहीरातीवरून टिकेला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर बच्चन यांनी त्यांच्या ७९ व्या वाढदिवशी त्या पान मसाला कंपनीबरोबरचा करार रद्द केल्याची घोषणाही केली होती. पण संबंधित कंपनी अजूनही ती जाहीरात दाखवत असल्याने बिग बींनी कंपनीला कायदेशीर नोटीस बजावली आहे.

बच्चन यांनी ज्या पान मसाला कंपनीची जाहीरात केली होती त्यात शरीरास अपायकारक पदार्थांचा समावेश होता. यावरून बिग बींवर नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठवली होती. याबद्दल कळल्यानंतर बिग बींनी तातडीने त्या कंपनीबरोबरचा करार रद्द केल्याचे पत्रकच जाहीर केले होते. त्यात संबंधित उत्पादनात शरीरास अपायकारक पदार्थ असल्याचे आपल्याला माहित नव्हते असे या पत्रकात बच्चन यांनी म्हटले होते. तसेच या जाहीरातीसाठी घेण्यात आलेले मानधनही आपण परत केल्याचे बच्चन यांनी सांगितले होते.

पण त्यानंतरही संबंधित कंपनीकडून वेगवेगळ्या मिडीया प्लॅटफॉर्मवर ती जाहीरात दाखवण्यात येत होती. यामुळे त्या कंपनीला बच्चन यांनी कायदेशीर नोटीस पाठवली आहे.