महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस एक उत्तम गायिका आहेत. आतापर्यंत त्यांची अनेक गाणी प्रदर्शित झाली आहेत. या गाण्यांसाठी त्यांना रसिकांकडून कधी दाद मिळते तर कधी ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. मात्र, अमृता फडणवीस कायम आपलॆ गायनाची आवड जोपासताना दिसल्या आहेत. अशातच नुकतंच त्यांचं आणखी एक गाणं प्रदर्शित झालं आहे. या गाण्याचं नाव ‘मारो देव बापू सेवालाल’ असे आहे. टी सीरिजच्या बॅनरखाली हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे. यातील अमृता फडणवीसांचा बंजारा लूक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. (Amruta Fadnavis New Song Maro Dev Bapu Sevalal Released)
मारो देव बापू सेवालाल
अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या गाण्याची आधीच घोषणा केली होती. ज्यासाठी त्यांनी एक पोस्ट शेअर करत म्हटलेले, ‘मी पुन्हा येत आहे.. आपली संस्कृती आणि धरोहर तुमच्यापर्यंत पोहचविण्यासाठी.. संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंती निमीत्ताने एक गीत घेऊन.. संपर्कात रहा’. या पोस्टनंतर काही तासांतच ‘मारो देव बापू सेवालाल’ हे गाणे रिलीज करण्यात आले.
View this post on Instagram
गाण्यात बापू सेवालाल देवाची स्तुती करण्यात आली आहे. या गाण्याचे गायन अर्थात अमृता फडणवीस यांनी केले आहे. तर गाण्याचे गीतकार निलेश जालमकर आहेत. संगीत दिग्दर्शन कामोद सुभाष यांनी केले आहे.
बंजारा लूकने वेधलं लक्ष
‘मारो देव बापू सेवालाल’ या गाण्यात अमृता फडणवीस यांनी पारंपारिक बंजारा पोशाख परिधान केला आहे. त्यांचा हा बंजारा लूक सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे. या लूकसाठी आणि सुमधुर गायनासाठी नेटकऱ्यांनी अमृता यांचे कौतुक केले आहे.
या गाण्याचा व्हिडीओ रिलीज झाल्यानंतर आतापर्यंत 70 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच या व्हिडिओवर अनेक नेटकरी कमेंट्सच्या माध्यमातून प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. आतापर्यंत या व्हिडिओवर 5,479 इतक्या कमेंट्स आल्या आहेत.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
एकाने लिहिलंय, ‘एवढ्या मोठ्या चॅनलवर तुम्ही संत सेवालाल महाराज यांचे गीत सादर केल्याबद्दल धन्यवाद’. तर अन्य एकाने म्हटले, ‘बंजारा समाजावर असलेलं प्रेम हे या माध्यमातून दाखवल्याबद्दल खूप आभार’. तसेच आणखी एका नेटकऱ्याने कमेंट्समध्ये लिहिले, ‘महाराष्ट्र संतांची भूमी म्हणून आपण ओळखतो. यात टी सिरीजने आजपर्यंत संत श्री सेवालाल महाराज यांचे गाणे कधीही चॅनेलवर टाकले नाही. मात्र, तुमच्या माध्यमातून आज हे गाणे प्रसिद्ध झाले. आपण कोणत्या जातीचे आहोत, धर्माचे आहोत यापेक्षा आपण महाराष्ट्राच्या या संतभूमीचे आहोत हे महत्वाचे आहे’.
हेही पहा –
Punha Kartavya Aahe : वसुंधरा तनयासमोर झुकणार? पुन्हा कर्तव्य आहे मालिकेत नवा ट्विस्ट