घर मनोरंजन अनन्या पांडे : मला आता प्रेमाची आस आहे

अनन्या पांडे : मला आता प्रेमाची आस आहे

Subscribe

– हर्षदा वेदपाठक

चंकी पांडे यांची मुलगी असलेली अनन्या पांडे चित्रपटसृष्टमध्ये आता आपलं नाव करू पाहत आहे. आणि त्यात तिला यश देखील आले आहे. ड्रीम गर्ल टू या आगामी चित्रपटाबद्दल अर्थात आदित्य रॉय कपूर या विषयाला बगल देत तिच्याबरोबर केलेली बातचीत.

- Advertisement -

कारकिर्दीच्या या टप्यावर एकदम सुखावली असशील आता?

माझे वैयक्तिक आयुष्य आणि काम यांचा समतोल राखणे हा माझा कसोशीचा प्रयत्न असतो आणि त्यातच मला आनंद मिळतो. माझे कुटुंबीय, जवळचे मित्र मैत्रिणी यांच्याबरोबर वेळ घालवणे मला सुखकारक वाटते. ड्रीम गर्ल टू हा चित्रपट प्रदर्शित होत असल्याने, दिल्लीहून माझे आजी-आजोबा, मावशी, चुलत भाऊ-बहिणी सगळे मोठे फॅमिली मुंबईला आली आहे, कारण त्यांना हा चित्रपट थिएटरमध्ये बघायचा आहे. आणि यासारखं दुसरे काय सुख असेल की आपल्या कुटुंबासमवेत आपलं काम पाहता यावे.

- Advertisement -

आव्हानाला तु संधीमध्ये कश्याप्रकारे परावर्तित करते?

कोणत्याही कामामधून काहीही नवीन शिकायची संधी मला आवडते. मग ते यश असो की अपयश , त्यात ही बरेच काही शिकता येते. इतकच नव्हे, एखादे नवीन काम असेल तर त्यासाठी जे काही शिकण्याची, जाणून घेण्याची समजून घेण्याची गरज असते. ते पूर्ण करायला मला आवडतं. मला वाटते एका परीने ते एक आव्हानच असतं की, तुम्हाला जे काही करायचं आहे ते व्यवस्थित करता येते.

यश म्हणजे काय?

निर्मळ मनाचं असणे हेच मला वाटतं यश आहे. जर एखाद्याने आयुष्यात खूप काही कमावलं, आणि तो व्यक्तीच मुळात चांगला नसेल? तर काय फायदा त्या कमावलेल्या वस्तूंचा किंवा इतर गोष्टींचा. माझ्या मधील माणुसकी आणि चांगुलपणा याला मी सगळ्यात जास्त महत्त्व देते. आणि त्यालाच यश मानते. मला वाटतं चांगल्या गोष्टी चांगल्या मनाच्या लोकांबरोबर नेहमी घडतात.

ड्रीम गर्ल टू मध्ये आयुष्यमान खुराना महिला परिवेषामध्ये दिसेल. आयुष्यमानला तर तु काम करताना पाहिले आहेस,परंतु त्याखेरीस तुला आणखीन कोणते ॲक्टर महिला परिवेषामध्ये आवडलेत?

माझे वडील चंकी पांडे यांनी देखील कोणकोणत्या चित्रपटांमध्ये महिला परिवेष घेतलाय. मला सगळ्यात जास्त आवडला तो, आपना सपना मनी मनी मधील रितेश देशमुख. माझे बाबा देखील त्या चित्रपटात होते, पण भाव खाऊन गेला तो रितेश. त्याचा आवाज, त्याचे कपडे, मेकअप..सगळे कसे एकदम मजेदार होते.

तुझं स्वप्न मनी मनी नाही का?

माझ्या वडिलांचे स्वप्न मनी मनी आहे. पण माझं स्वप्न आहे प्यार प्यार. माझे वडील कंजूष नाहीत, ते फक्त पैसा जपून, मोजूनमापून वापरतात इतकंच.

तुला काही मोजकीच वर्ष इकडे झाली आहेत. तु निवडलेल्या चित्रपटाबद्दल समाधानी आहेस काय?

माझे बाबा अभिनेता आहेत. माझी आई रियाल्टी शो करते. तर माझी धाकटी बहीण हि अमेरिकेला फिल्म मेकिंग शिकत आहे. आणि मी ॲक्टर आहे. आम्ही घरात चित्रपट यावर खूप गप्पा मारत असतो. मला येणारया सगळया ऑफर, स्क्रिप्ट मी घरी दाखवते. पण आई-बाबा किंवा कोणी मला हा चित्रपट घे किंवा सोडून दे असा सल्ला देत नाहीत. मी जेव्हा सेटवर जाते, त्यापूर्वी मला चित्रपट, चित्रपटाचे कथानक यावर खात्री करून घ्यावी लागते. त्यानंतर मी चित्रीकरणाला सुरुवात करते. काही वेळा माझे निर्णय चुकले आहेत. त्या चुकलेल्या निर्णयामधून शिकणे महत्त्वाचे आहे आणि ते मी करते.

हिंदी चित्रपटसृष्टी हि पुरुष प्रमुख आहे. परंतु ड्रीम गर्ल टू हा असा चित्रपट आहे. त्याच्यामध्ये पुरुषच स्त्री भूमिका भूमिक रंगवत आहे काय सांगशील?

देखो ना सबको लडकिया बनना है.. मी खुश आहे त्याबद्दल. महिला प्रमुख किंवा अभिनेत्री प्रमुख कोणतीही कलाकृती असली तरी मला आनंद होतो. जितक्या अधिक महिला चौकडी, तितका आनंदी आनंद, असं माझं मत आहे.

तु म्हणालीस तुझी बहीण फिल्म मेकिंग शिकत आहे. तर तिच्या पहिल्या चित्रपटात तू काम करणार का?

मी तिच्या चित्रपटामध्ये काम करण्यापूर्वीच तिने माझा करोना दरम्यान खूपच गैरफायदा घेतला आहे. अमेरिकन फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये तुमच्या कामाचे काही व्हिडिओ पाठवावे लागतात, तेव्हा तिने, मी आणि बाबांकडून, एकच नव्हे तर तिने आईकडून देखील खूप काम करून घेतले आहे. आणि ते देखील फुकट मध्ये, विचार करा.

काही वर्षांपूर्वी अनन्या पांडे हि चंकी पांडे यांची मुलगी म्हणून ओळखली जात होती. परंतु आता ती पडद्यावर सुंदर दिसते. अभिनय..नृत्य पण चांगले करते. आता तुझ्या स्वतःच्या नावाला देखील एक वेगळच वलय प्राप्त होऊ लागले आहे याकडे तु कशी पाहतेस?

माझ्या पहिल्या चित्रपटापासून मला प्रेक्षकांनी स्विकारलं, भरभरून सपोर्ट दिला हे खरे आहे. माझे बाबा चंकी पांडे सांगायचे, इंडस्ट्रीमध्ये तुझा प्रवेश सहज होईल. परंतु जोपर्यंत तुला प्रेक्षक स्वीकारत नाहीत, तोपर्यंत तुला स्वतःची ओळख मिळणार नाही. आणि आता लोक मला पसंत करतात त्याचा आनंद होतो. मला प्रत्येक चित्रपटाबरोबर सर्वोत्तम व्हायचं आहे. माझ्या प्रत्येक कामाबद्दल मला स्वतःलाच आव्हान द्यायचे आहे. मला प्रेक्षकांना कंटाळा नाही दयायचा. प्रत्येक कामागणिक मला सुधारणा करायची आहे आणि चुकांमधून शिकायचं आहे.

तु मागे एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की, शाहरुख खान यांची प्रतिक्रिया तुला फार महत्त्वाची आहे. आता ड्रीम गर्ल टूबद्दल त्यांची काय प्रतिक्रिया आहे?

मी त्यांना हल्लीच काही दिवसापूर्वी भेटली होती. त्यांना त्या चित्रपटाचा ट्रेलर आवडला आणि त्यांना चित्रपट पहायची इच्छा असल्याचे त्यांनी मला सांगितलं. एकदा चित्रपट प्रदर्शित झाला की, मी नक्कीच त्यांना हा चित्रपट दाखवेन.

सुहाना, शाहरुख खान यांची मुलगी पण आता चित्रपटसृष्टीत प्रवेश करतेय. ती तुझी खास मैत्रीण आहेस काय सांगशील?

चित्रपटसृष्टीमध्ये काम करायचं, यश मिळवायचं हे स्वप्न मी, सुहाना आणि शनाया कपूर या तिघांनी पाहिलं होते. मी त्यांचं काम पाहिले आहे, आता त्यांनी त्यांच्या पहिल्या चित्रपटाद्वारे लोकांना ते दाखवून दिले पाहिजे. पाहूयात लोक त्यांना कशाप्रकारे स्वीकारतात ते.

अनन्या तू काही वेळापूर्वी तुला प्यार महत्त्वाचे आहे असे म्हणालीस, त्याबद्दल आणखीन काय सांगशील?

(लाजून) माझ्यासाठी कोणत्याही स्थितीतलं प्रेम हे फार महत्त्वाचे आहे. मग ते घरातल्यांचे असू देत, प्रेक्षकांचं असू दे की माझे जे मार्गदर्शक आहेत त्यांचे असू देत. किंवा माझ्या आयुष्यात असलेल्या स्पेशल वन्स चे असू दे. जिवनात प्रेम असणे महत्त्वाचे.

गेहराई या चित्रपटामध्ये तू सगळ्यांनाच आचंबित केलं, आम्हाला तरी ती भूमिका आव्हानात्मक दिसत होती. तु कशी काय जमवलीस ती भूमिका?

गेहराई या चित्रपटाने माझ्या आयुष्यात लक्षणीय बदल आणला, असे म्हणायला पाहिजे. त्यापूर्वी मला अभिनेत्रीच व्हायचे होते. माझ्या सुरुवातीच्या दोन-तीन चित्रपटांबद्दल मी खूपच एक्साईटेड होती. कारण मी मोठ्या पडद्यावर दिसणार, नाचणार, गाणार, ग्लॅमरस दिसणार असं मला वाटायचं. गेहराईने मला बरच काही शिकवलं. कारण एक अभिनेत्री म्हणून कुठल्याही पात्राचा स्वतःचा एक प्रवास असतो. आपल्या भूमिकेसाठी गृहपाठ करणे महत्त्वाचे असतं. तसेच सेटवर येण्यापूर्वी आपल्या भूमिकेचे सगळे बारकावे टिपून, मगच कॅमेरासमोर उभे राहणं गरजेचं असतं, हे मला शकून ने शिकवलं. याला क्राफ्ट ऑफ अक्टिंग म्हणतात आणि हीच भावना मला प्रत्येक चित्रपटाबरोबर येत राहावी, अशी माझी इच्छा आहे.

तुझा चेहरा फार मासूमसां आहे, मग तू सशक्त भूमिका कश्याप्रकारे करतेस?

मला भूमिका निभावताना याच चेहऱ्याचा फायदा होतो. आता मी फक्त चोवीस वर्षाची आहे. त्याच्यामुळे जसे माझे वय वाढेल तसा माझा चेहरा अजून बदलत जाईल. परंतु कॉस्च्युम, मेकअप आणि नंतर दिग्दर्शक या सगळ्यामुळे अभिनय जमून येतो.

तु तुझ्या वडिलांच्या फार जवळ आहेस, तुझ्या जोडीदारामध्ये तु, त्यांचे कोणते गुण पाहशील?

माझे बाबा एकदम चिल्ड आऊट आणि मजेशीर व्यक्तिमत्त्वाचे धनी आहेत. माझ्या आईला ते सगळ्याच बाबतीत सपोर्ट देत राहतात. मुख्य म्हणजे ते माझ्या आईचे एक चांगले मित्र आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते खूप हँडसम आहेत. हे सगळे गुण मला माझ्या जोडीदारांमध्ये पाहायला आवडतील.

तू जेव्हा लहान होतीस तेव्हा वडिलांना कोणत्या अभिनेत्री बरोबर पाहून तुला खूप राग यायचा?

बाबांनी खूप विनोदी भूमिका केल्या आहेत. नीलम बरोबर त्यांची जोडी खूप प्रसिद्ध होती. पण नीलम आमच्या घरी येत होत्या, त्यामुळे मला त्यांच्याबद्दल कधी आकस असा वाटला नाही. मला फक्त एकाच गोष्टीचे वाईट वाटायचे आणि ते म्हणजे त्यांच्या कुठल्याही चित्रपटात ते जर का शेवटी मारणार असतील तर मी धाय मोकलून खूप रडायचे. अगदी घर डोक्यावर घ्यायचे. तेवढी एक गोष्ट सोडली तर मी त्यांचे प्रयेक चित्रपट पाहिला आहे.

चंकी पांडे हे बंगाली चित्रपट आणि बांगलादेशी चित्रपटात देखील खूप प्रसिद्ध होते. त्यानंतर त्यांच्या करिअरला पण एक वेगळेच वळण लागले काय सांगशील त्याबद्दल?

माझे बाबा हे खूप चांगले अभिनेता आहेत. आणि विविध अंगी भूमिका ते अगदी सहजरित्या करू शकतात. मला पण सल्ला देताना, ते नेहमी सांगतात…”कामाचा आदर कर, मग ते काम कोणत्याही प्रकारचे असेल तरी त्याचा आदर केलाच पाहिजे. चांगल्या टीम बरोबर काम कर, सगळं काही चांगलं होत राहील”.

सोशल मीडियावर तुझे खूप फॉलोअर आहेत. अशा वेळेला तु ट्रोलर्स बरोबर कशाप्रकारे डील करतेस?

कधी कधी मला त्याचा फरक पडत नाही. तर कधी कधी खूप वाईट वाटतं. कधी मी प्रचंड आकाणतांडव पण करते. तुमचा फोनच बंद ठेवणे आणि त्या जगातून बाहेर पडून, वास्तविक जिवनात आपल्या आयुष्याबरोबर डील करणे हे मी फॉलो करते. मी केलेल्या पोस्टवर कोणी काही कमेंट केली, ते मी आता वाचतसुद्धा नाही.

ड्रीम गर्ल दोनसाठी नुसरत भरूचा हिला विचारले गेले नाही. याबद्दल तिने जाहीरित्या नापसंती देखील व्यक्त केली आहे. काय सांगशील त्याबद्दल?

प्रेम गर्ल एक हा चित्रपट मी पाहिलेला आहे. नुसरत ने खूप सुंदर काम केले आहे.त्या चित्रपटामध्ये कोणाला घ्यायचे किंवा घ्यायचे नाही, हा सर्वस्वी निर्मात्यांचा निर्णय असतो. मी त्यामध्ये काय बोलू शकणार? आणि दुसरी गोष्ट म्हणजे चित्रपटाचे कथानक पहिल्यापासून वेगळे असल्यामुळे, कदाचित माझी निवड झाली असेल. नुसरत ऐक चांगली अभिनेत्री आहे. अकेली हा तिचा आगामी चित्रपट येतोय, आणि मी तो चित्रपट पाहण्याचा प्रयत्न करेन.


हेही वाचा- सुष्मिता सेन : तालीचा गजर घुमत राहिला पाहिजे

- Advertisment -