बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वामुळे अंकिता वालावलकर ( Ankita Walawalkar ) महाराष्ट्राच्या घराघरांत लोकप्रिय झाली. गेल्या काही महिन्यांपासून ही ‘कोकण हार्टेड गर्ल’ तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. येत्या काही दिवसात अंकिता संगीत दिग्दर्शक कुणाल भगतशी लग्नगाठ बांधणार आहे. त्यापूर्वी अंकिताने दिलेल्या एका आनंदाच्या बातमीची जोरदार चर्चा आहे. अंकिताने एक आलिशान गाडी खरेदी केली असून याविषयी सोशल मीडियावर पोस्टही शेअर केल्या आहेत.
अंकिताने नव्या गाडीविषयी पोस्ट शेअर करण्याआधी ‘तुम्ही तयार आहात का?’, ‘ती आलीये, वाट बघतेय’ अशा उत्सुकता वाढवणाऱ्या स्टोरी शेअर केल्या होत्या. अंकिता नेमकं काय सरप्राइज देणार याची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर नव्या गाडीची पहिली झलक तिने फोटो शेअर करत सर्वांना दाखवली आहे. अंकिताने महागडी ऑडी कार खरेदी केली आहे. गाडीचा पहिला फोटो शेअर करत याला ‘कोकण हार्टेड गर्ल’ने ‘आवडी आली’ असं कॅप्शन दिलं आहे.
गाडी खरेदी करताना अंकितासह तिचा होणारा नवरा कुणाल देखील उपस्थित होता. याशिवाय या पोस्टसाठी तिने यो यो हनी सिंगचं ‘मिलेनिअर’ हे गाणंही वापरलं आहे. काही दिवसांपूर्वीच अंकिताने तिची पहिली कार विकली. यासंदर्भातील विविध पोस्ट आणि व्लॉगही तिने शेअर केला आहे. दुसरी गाडी घ्यायचा विचार असल्याने ही जुनी गाडी विकल्याचे अंकिताने सांगितले होते. अखेर अंकिताने थेट महागडी ऑडी विकत घेतली. नवीन वर्षात अंकिताने केलेल्या या महागड्या खरेदीनंतर सोशल मीडियावर तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला.