HomeमनोरंजनAnkita Walawalkar: अंकिता वालावलकरने राज ठाकरेंना दिलं लग्नाचं निमंत्रण

Ankita Walawalkar: अंकिता वालावलकरने राज ठाकरेंना दिलं लग्नाचं निमंत्रण

Subscribe

‘कोकण हार्टेड गर्ल’ या नावाने लोकप्रिय असणारी कोकण कन्या अंकिता वालावलकर ‘बिग बॉस मराठी’मुळे अधिक प्रसिद्धी झोतात आली. अंकिता (Ankita Prabhu Walawalkar) हिची सध्या लगीनघाई सुरु आहे. लवकरच ती मराठी मनोरंजन विश्वातील संगीतकार कुणाल भगत याच्याशी लग्न करणार आहे. लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी अंकिता आणि कुणाल हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भेटीला ‘शिवतीर्थ’वर पोहचले.

अंकिता आणि कुणालनं राज ठाकरेंना लग्नाचं निमंत्रण दिलं आहे. दोघांनीही इन्स्टाग्रामवर राज ठाकरे यांच्यासोबतचा फोटो शेअर केलाय. यामध्ये राज ठाकरेंसह त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे देखील पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे अंकिता वालावलकरने सर्वात आधी लग्नाची बातमी राज ठाकरेंनाच सांगितली होती. एका व्हिडीओच्या माध्यमातून तिने सांगितलं होतं की, “तुम्ही सर्वांनी ‘बिग बॉस’च्या घरातील माझा प्रवास पाहिला. मी खूप जास्त भावनिक मुलगी आहे. जेव्हा आमचं लग्न ठरत होतं तेव्हा एक गोष्ट तुम्हाला सांगते. आमच्या दोघांचे बरेच गुण जुळतात, त्यापैकीच एक गुण जुळला तो म्हणजे आमच्या भावना.

त्या भावनांपैकी एक महत्त्वाची व्यक्ती म्हणजे माननीय राज ठाकरे जेव्हा ‘येक नंबर’ या चित्रपटाचं काम चालू होतं आणि कुणाल या चित्रपटासाठी काम करत होता. तेव्हा मला खूपच आनंद झाला होता. यादरम्यानच आम्ही राज ठाकरेंना सगळ्यात आधी आमच्या लग्नाची बातमी सांगितली होती. राज साहेबांना आम्ही गुढीपाडव्यालाच लग्नाबद्दल सांगितलं होतं. पण, त्यानंतर ‘बिग बॉस’मुळे सगळ्या गोष्टी पुढे ढकलल्या गेल्या.”

अंकिता वालावलकरने लग्नाची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. पण माहितीनुसार, अंकिता मार्च महिन्यात कुणालबरोबर लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणार असल्याचं म्हटलं जातं आहे. अंकिताचा होणारा पती कुणाल संगीतकार आहे. बऱ्याच चित्रपटातील गाणी आणि मालिकांचं शीर्षकगीत त्याने संगीतबद्ध केलं आहे.