मराठी सिनेसृष्टीचा लाडका अभिनेता अंकुश चौधरीने त्याच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात पक्के स्थान निर्माण केले आहे. आपल्या हटके आणि युनिक अंदाजामुळे त्याला ‘स्टाईल आयकॉन’ म्हणून ओळखले जाते. आतापर्यंत त्याने साकारलेल्या भूमिकांमध्ये कधी रोमँटिक, कधी रावडी तर कधी दोस्तीतला राजा होऊन तो आपल्या भेटीला आला. यानंतर आता आगामी सिनेमात तो दमदार पोलिसाच्या भूमिकेतून आपल्या भेटीस येत आहे. आज अभिनेत्याच्या वाढदिवशी या नव्या सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. (Ankush Chaudhari Playing Cop Role In New Movie)
अभिनेत्याच्या वाढदिवशी पोस्टर रिलीज
लोकप्रिय अभिनेता अंकुश चौधरीच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या चाहत्यांना मोठं सरप्राईज मिळालं आहे. अंकुश त्याच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच एका दमदार पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. त्याच्या या नव्या सिनेमाचे नाव ‘पी.एस.आय.अर्जुन’ असे आहे. ज्यातील अंकुशच्या मध्यवर्ती भूमिकेचे पहिले पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे.
View this post on Instagram
या पोस्टरमध्ये अर्जुनचा करारी आणि धाडसी लूक पाहून प्रेक्षक पुन्हा एकदा त्याच्या प्रेमात पडले आहेत. आतापर्यंत प्रेक्षकांनी अंकुशला रोमँटिक आणि ऍक्शन हिरो म्हणून पाहिले आहे. पण पहिल्यांदाच पोलिसांच्या भूमिकेत पाहणार आहेत. त्यामुळे अभिनेत्याइतकीच त्याच्या चाहत्यांमध्ये देखील या सिनेमाबाबत उत्सुकता आहे.
प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी
अंकुश चौधरीचा हा आगामी सिनेमा म्हणजे प्रेक्षकांसाठी एक पर्वणी ठरणार आहे. कारण आतापर्यंत प्रेक्षकांनी अंकुशला ज्या भूमिकांमध्ये पाहिलंय त्यापेक्षा अत्यंत वेगळी भूमिका तो साकारताना दिसणार आहे. व्हिस्ट्रोमॅक्स सिनेमा, ड्रिमविव्हर एंटरटेनमेंट निर्मित ‘पी.एस.आय.अर्जुन’ या चित्रपटाचे दिग्दर्शन भूषण पटेलने केले आहे. तर विक्रम शंकर आणि ध्रुव दास या चित्रपटाचे निर्माते आहेत. यापूर्वी प्रेक्षकांनी अंकुशला कधीच अशा भूमिकेत पाहिले नव्हते. त्यामुळे या सिनेमाबाबत प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. अद्याप या सिनेमात इतर कोणकोणते कलाकार झळकणार ही माहिती गुलदस्त्यात ठेवली आहे. मात्र, लवकरच याबाबत मेकर्स माहिती देणार आहेत.
अंकुश चौधरी हा प्रतिभावान अभिनेता..
‘पी.एस.आय. अर्जुन’ या चित्रपटाचे निर्माते विक्रम शंकर म्हणाले, ‘या चित्रपटाच्या माध्यमातून मी मराठी सिनेसृष्टीत निर्माता म्हणून पदार्पण करतोय. याचा मला फार आनंद आहे. पूर्वी मी विविध भाषेत चित्रपटांची निर्मिती केली आहे. पण मराठीबद्दल मला नेहमीच कौतुक राहिले आहे. मुळात मराठी प्रेक्षक जाणकार आहेत आणि त्यांना वैविध्यपूर्ण विषय नेहमी आवडतात हे मी जाणतो. हा विषयही खूप वेगळा आहे आणि म्हणूनच मी या चित्रपटाची निवड केली. त्यात अंकुश चौधरी हा प्रतिभावान अभिनेता आहे. जो या चित्रपटाला लाभलाय. त्यामुळे हा एक उत्तम योग जुळून आला आहे असे म्हणता येईल. अंकुश मराठीतील एवढा मोठा अभिनेता असूनही त्याचे आम्हाला खूप सहकार्य लाभले. आज आमच्या संपूर्ण टीमकडून ही त्याला वाढदिवसाची भेट’.
हेही पहा –
IMDb Top 20 Web Series : या 20 वेब सिरीजने IMDb यादीत मिळवलंय विशेष स्थान