वाघ बचावासाठी अनुष्का शर्मा करणार प्रचार

अभिनेत्री अनुष्का शर्माने वाघांच्या संरक्षणासाठी जागतिक जागरूकता निर्माण करण्यासाठी डिस्कव्हरी चॅनलसह हातमिळवणी केली आहे.

anushka sharma
अनुष्का शर्मा

अवनी वाघिणीला मारल्यानंतर हे प्रकरण खूपच तापलं. पण सध्या जगभरात वाघांची संख्या कमी होत चालली आहे ही खूपच गंभीर आणि चिंताजनक बाब आहे. त्यामुळे आता अभिनेत्री अनुष्का शर्माने वाघांच्या संरक्षणासाठी जागतिक जागरूकता निर्माण करण्यासाठी डिस्कव्हरी चॅनलसह हातमिळवणी केली आहे. अनुष्का सी.ए.टी. कंजर्विग एकर्स फॉर टायगर्स या योजनेचा प्रचार करणार आहे. जंगलातील वाघांची कमी होणारी संख्या वाढविण्यासाठी आणि त्यांचं निवास स्थान सुरक्षित करण्यासाठी जागरूकता निर्माण करणे हा त्याचा मुख्य उद्देश असणार आहे. ‘वाघांचं अस्तित्व सध्या लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे आपल्या मदतीची त्यांना गरज आहे’ अशी भावना यावेळी अनुष्काने व्यक्त केली आहे.

वाघांची सध्याची अवस्था वाईट

‘एका मोठ्या शिकारीच्या रूपात वाघ जंगलामध्ये संतुलन ठेवण्यासाठी एक महत्त्वाची भूमिका निभावत असतो. एक माणूस म्हणून वर्तमान स्थितीमध्ये वाघांची संख्या कमी होणे हे आपल्यासाठीही वाईट आहे. वाघांची सध्याची अवस्था वाईट आहे,’ अशी भावना यावेळी डिस्कव्हरी कम्युनिकेशन्स इंडियाचे दक्षिण आशियाचे वरीष्ठ उपाध्यक्ष आणि महाप्रबंधक करण बजाज यांनी केली. शिवाय वाघांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी अनुष्काबरोबर करार करून आपल्याला आनंद झाल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

अनुष्का सध्या व्यग्र

अनुष्का सध्या शाहरूख खानबरोबर येणाऱ्या ‘झिरो’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्येही व्यग्र आहे. यामध्ये एका अपंग मुलीची भूमिका अनुष्का साकारत असून हा चित्रपट २१ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. याशिवाय या चित्रपटामध्ये कतरिना कैफचीही महत्त्वाची भूमिका असणार आहे. या चित्रपटाकडून प्रेक्षकांनाही अपेक्षा असून हा अनुष्काचा शाहरूखबरोबर तिसरा चित्रपट आहे.