घरउत्तर महाराष्ट्रनाशिकच्या अपूर्वाने बॉलीवुडमध्ये उमटवला ठसा; 'सिर्फ मनी' चित्रपटात मुख्य भूमिकेत

नाशिकच्या अपूर्वाने बॉलीवुडमध्ये उमटवला ठसा; ‘सिर्फ मनी’ चित्रपटात मुख्य भूमिकेत

Subscribe

नाशिक : नाशिकचा कला साहित्य क्षेत्रातील वारसा जपत आजवर अनेक कलाकारांनी चित्रपटसृष्टीत नाव कमावले आहे. याच मार्गावर स्वार होत शहरातील उदयोन्मुख अभिनेत्री अपूर्वा आनंद या मराठमोळ्या मुलीने सिर्फ मनी या हिंदी चित्रपटात मुख्य नायिकेची भूमिका साकारली आहे. अपूर्वाची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट शुक्रवारी (दि.४) चित्रपट गृहांमध्ये प्रदर्शित झाला.

अमृतसर (पंजाब) येथे राहणारी रंगीली नावाच्या एका सर्वसामान्य कुटुंबातील तरुणीला बालपणापासूनच अभिनय क्षेत्राची आवड असते. सर्व गुणसंपन्न असलेल्या मुलीने चांगली अभिनेत्री व्हावे, असे स्वप्न तिच्या आईनेही उराशी बाळगलेले असते. तिच्या स्वप्नपूर्तीसाठी आणि नशीब आजमावण्यासाठी रंगीली अमृतसर येथून मुंबईत दाखल होते. मला सर्वकाही येते असा समज असणार्‍या रंगीलीला मुंबईत दाखल झाल्यानंतर अभिनय क्षेत्रात एक स्थान मिळविण्यासाठी किंवा एखादे काम मिळवण्यासाठी अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. त्या अडचणींचा सामना करत ही आपल्या ध्येयापर्यंत कसे पोहोचते, हे या चित्रपटातून दाखविण्यात आले आहे.

- Advertisement -

तिचा हाच प्रवास सिर्फ मनी या चित्रपटातून बघता येणार आहे. या चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून रंगीलीची भूमिका अपूर्वा आनंद हिने अतिशय उत्कृष्ट अभिनयातून साकारली आहे. या चित्रपटाचे निर्माते सत्यवान नाईक असून, दिग्दर्शन जितेंद्र कीर यांनी केले आहे. या चित्रपटातील प्रमुख भूमिकेत अपूर्वा आनंद हिच्यासह सुदेश बेरी, सूरज भारद्वाज यांसह अनेक दिग्गज कलाकारांनी भूमिका केल्या आहेत.

उच्चशिक्षित असलेल्या अपूर्वाने आजवर मॉडलिंग तसेच, मिस नाशिक-2019, मिस महाराष्ट्र-2021 तर, मिस इंडिया प्राईड-2019 असे किताब पटकाविले आहेत. त्याचबरोबर मोर सैय्या चाले परदेस या अल्बम साँगसाठी तिने आपली कलाकृती सादर केली असून, भविष्यातही उच्च शिक्षणाबरोबरच अभिनय क्षेत्रात ठसा उमटविण्याचा तिचा मानस असल्याचे तिने सांगितले. या सर्व प्रवासात तिच्या आई-वडिलांसह कुटुंबीयांनी तिला मोलाची साथ दिली असल्याचे तिने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -