शेवंता म्हणते, ‘या’ अभिनेत्री आहेत की डान्सर?

झी मराठी वरील ‘रात्रीस खेळ चाले २’ या मालिकेने प्रेक्षकांना टेलिव्हिजन स्क्रीनला अक्षरशः खिळवून ठेवलं आहे. अल्पावधीतच या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखेवर प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. पण रात्रीस खेळ चाले २ मालिकेतील एक व्यक्तिरेखा अशी आहे जिची चर्चा सर्वत्र आहे आणि ती म्हणजे शेवंता. शेवंता या व्यक्तिरेखेच्या एंट्री नंतर मालिकेने वेगळच वळण घेतलं. शेवंताच्या अदांनी फक्त अण्णाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र घायाळ झाला आहे. शेवंताची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर ही खऱ्या आयुष्यात देखील तितकीच मनमोहक आहे. तिच्या लूकवर चाहते देखील फिदा आहेत. पण तिला ग्लॅमर मध्ये अडकायचं नाही आहे.

याबद्दल मत व्यक्त करताना अपूर्वा म्हणाली, “ग्लॅमर कसं घ्यावं हे मला माहीत नाही. पण, अतिग्लॅमरमुळे एक वेळ अशी येते की तुम्ही अभिनय विसरू लागता. मग तुम्ही फक्त ग्लॅमरकडेच ओढले जाता. मला ते नाही करायचं. बऱ्याचश्या अभिनेत्रींबाबत मला प्रश्न पडतो, त्या डान्सर आहेत का अभिनेत्री आहेत? एका पुरस्कार सोहळ्यात मी नृत्य परफॉर्मन्स केल्यानंतर नृत्यासाठी मला अनेक ठिकाणांहून ऑफर्स आल्या. पण, मला कुठेही नाचायचं नाहीय. मी स्वतःकडे प्रथम अभिनेत्री म्हणून पाहते. त्याबरोबर ग्लॅमर येत असेल, तर ते स्वीकारेन. पण, लोकांनी मला ग्लॅमरसाठी नव्हे, तर माझ्या भूमिकेमुळे ओळखलं पाहिजे.”


हे ही वाचा- VIDEO – गोव्याच्या किनाऱ्यावर अण्णा आणि शेवंताचा रोमान्स