घरताज्या घडामोडीभूमिकांना लाभलेला परीसस्पर्श - छाया कदम

भूमिकांना लाभलेला परीसस्पर्श – छाया कदम

Subscribe

तिच्या वाट्याला आलेली ‘फॅन्ड्री’मधील नानी असो, ‘सैराट’मधील सुमन असो किंवा ‘न्यूड’मधील चंद्राक्का असो, एकदा का छाया कदम त्या भूमिकेत शिरली की तिचे मूळ अस्तित्व बाजूला राहते आणि तिने ते साकारलेले पात्र मनाचा ठाव घेऊ लागते. ज्या पण भूमिकांना तिने स्पर्श केला, त्या भूमिकांचे सोने झाले. ही परीसस्पर्शी किमया छाया कदम नावाच्या अष्टपैलू अभिनेत्रीमध्ये आहे यात कुठलीही शंका नाही.

– संतोष खामगांवकर

अभिनेत्री छाया कदम मुळातच अभिनय क्षेत्रात आली ती अपघातानेच. करियर निवडण्याच्या वयात तिने विचारही केला नव्हता की ती अभिनेत्री होईल. मुळातच छायाला शाळा-कॉलेजमध्ये असताना कबड्डीची प्रचंड आवड होती. शाळेमधून तसेच कॉलेजमधून तिने कबड्डीचे मैदान गाजवले होते. याबद्दल छाया सांगते की, कॉलेजमध्ये असताना माझा अभिनयाशी काही फारसा संबंध नव्हता, मात्र मी सतत कबड्डीच्या मैदानात असायचे. गुडघे असे कायम फुटलेले असायचे. स्टेट लेवलपर्यंत मी कबड्डी खेळले आहे. मी अभिनेत्री झाले नसते तर कबड्डीच्या क्षेत्रातच असते, पण काही वर्षांनी माझं लिगामेंट ऑपरेशन झालं आणि मला दोन वर्षांचा गॅप घ्यावा लागला. ऑपरेशननंतरही मी खेळले पण तेवढा फोर्स नव्हता. मग पुढे ते कुठेतरी पाठी पडत गेलं.

- Advertisement -

२००१ मध्ये दुर्दैवाने छायाचे बाबा आणि भाऊ या दोघांचेही निधन झाले. कुटुंबीयांसाठी हा फार मोठा जिकिरीचा काळ होता. त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी छाया प्रयत्न करीत होती. अशातच एक दिवस तिने वर्तमानपत्रात प्रा. वामन केंद्रे यांची अभिनय-कार्यशाळेची जाहिरात बघितली. काहीतरी नवीन करावे किंवा शिकावे या भावनेतून छायाने वर्कशॉप करण्याचा निर्णय घेतला. वर्कशॉप करताना कळत-नकळत तिच्यामध्ये अभिनयाची आवड निर्माण झाली. छाया सांगते की, माझ्या सुप्त मनात अभिनयाची आवड कुठेतरी होती, पण यातच करिअर वगैरे करायचं असा विचार केला नव्हता. कारण मला असं वाटायचं टीव्हीवर दिसणारे चेहरे काही वेगळेच असतात. त्यासाठी वेगळ्या फॅमिलीमध्ये जन्म घ्यावा लागतो वगैरे. म्हणजे खूपच मोठं वाटायचं ते. हे वर्कशॉप करतानाही पुढे काहीतरी घडेल वगैरे डोक्यात नव्हतं. माझ्या आयुष्यात ज्या काही घटना घडल्या होत्या, त्या विसरून मला वेगळ्या गोष्टींमध्ये रमायचं होतं. म्हणून मी ते जॉईन केलं.

- Advertisement -

छायाला वर्कशॉपमधील केंद्रे सरांची शिकवण्याची पद्धत आवडायला लागली. एक कॅरेक्टर जर आपल्याला उभं करायचं असेल, तर ते कॅरेक्टर चालतं कसं, बोलतं कसं, त्याचा वेगळा आवाज याचे आकलन व्हायला लागले. त्यामुळे वेगवेगळ्या माणसांचे निरीक्षण करणे, त्या सगळ्यांचे आवाज आणि त्यांचे अभ्यास करणे या सगळ्या गोष्टी छायाला आवडायला लागल्या. छाया ज्या हाऊसिंग बोर्ड कॉलनीमध्ये राहत होती, तिथल्या ग्राऊंडमध्ये येणारे सर्व फेरीवाले, भंगारवाले, भाजीवाले तर कधी छक्के हे तिच्या नेहमीच्या बघण्यातले होते. छाया सांगते की, केंद्रे सरांनी वर्कशॉपमध्ये या सर्व माणसांचा अभ्यास करायला सांगितला आणि मग मी एकेक कॅरेक्टर घेऊन त्याचं चालणं, बोलणं, आवाज अभ्यासायला सुरुवात केली. केंद्रे सरांच्या मार्गदर्शनाखाली छायाने इथेच कुठेतरी अभिनयाचा पहिला धडा गिरवायला सुरुवात केली होती.

वर्कशॉप संपले पण पुढे काय, या विचारात असतानाच छायाने काही ओळखींतून अभिनय क्षेत्रामध्ये हातपाय मारायला सुरुवात केली. २००६ साली छाया वामन केंद्रेंच्याच ‘झुलवा’ या नाटकामधून झळकली. हे सगळे करीत असताना एका सर्वसामान्य घरातली मुलगी म्हणून तिला नाट्य-सिनेमासृष्टीमध्ये पाऊल टाकण्यासाठी घरातही झुंज द्यावी लागली होती. स्वतःच्या भूमिकेवर अटळ असल्यामुळे छाया त्या स्तरावर जिंकली.

सर्वसाधारणतः नाटकात किंवा चित्रपटात काम करण्याचे स्वप्न पाहणार्‍या मुलींचा कल गुडीगुडी-नाजूक नायिका साकारण्याकडे असतो. छायाने मात्र वेगळ्या भूमिका निवडल्या. कॅरेक्टर रोल्सकडे तिचा कल जास्त होता. याबद्दल ती म्हणते की, यामध्ये कुठेतरी ‘झुलवा’ आणि वामन केंद्रे यांचा हात आहे. पहिलंच नाटक एवढ्या वेगळ्या धाटणीचं माझ्या वाट्याला आलं की तिथूनच पुढे माझी विचार करण्याची प्रक्रिया बदलली. मला आधीपासून स्मिता पाटील आणि शबाना आजमी यांचे चित्रपट आवडत होते. माणसांचे वास्तववादी सिनेमे मला आवडत होते. एक हिरो येतो आणि एक फाईट मारून दहा जणांना लोळवतो हे मला कधी वास्तववादी वाटलं नव्हतं आणि जे मला पटलं नाही ते माझ्या आतून येणंच कठीण होतं. मला खरीखुरी माणसं आणि त्यांच्या गोष्टी उभ्या करायला जास्त आवडतात.

तिच्या खरेपणाची साक्ष म्हणजे तिने संतोष कोल्हे यांच्या ‘हिजडा’ या वेबसीरिजमध्ये साकारलेली प्रत्यक्ष हिजड्याची भूमिका. ट्रांसजेंडरची भूमिका साकारणारी छाया कदम ही पहिली महिला कलाकार आहे. त्याबद्दल ती सांगते की, संतोष कोल्हेंनी मला जेव्हा कथा ऐकवली तेव्हा त्यातलं हिजड्याचं पात्र कुणीतरी पुरुष कलाकार करणार होता. मी त्याला म्हटलं की, तू मला जी इतर पात्रं ऐकवलीस, ती कोणीही करू शकतं. मला हिजडा करायला आवडेल. संतोष म्हणाला की, अरे मी हा विचारच केला नव्हता आणि मी तर चक्क त्याच्याकडे हिजड्याची भूमिका मागत होते.

‘हिजडा’च्या वेळी छायाने मेकअपमनला ती छान दिसेल यापेक्षा खरोखर तृतीयपंथी वाटेल असा मेकअप करण्याची पूर्ण मुभा दिली होती. तिच्या स्वतःच्या निरीक्षणानुसार तिने मेकअपमनला गालावर दाढी करून जो हिरवेपणा येतो तसा तंतोतंत करायला लावला. भूमिका जिवंत करण्याची किमया छाया कदमलाच का जमते याचे हे उत्तम उदाहरण आहे.

छायाला ‘फॅन्ड्री’ चित्रपटाने ‘क्लास’पर्यंत पोचविले, तर ‘सैराट’ने ‘मास’पर्यंत पोचविले आणि या दोन्ही चित्रपटांचा संबंध येतो तो नागराज मंजुळे या मातब्बर दिग्दर्शकाशी. फॅन्ड्री चित्रपटातील नानी कुणीतरी नामांकित अभिनेत्री साकारणार होती, परंतु काही कारणास्तव ते शक्य होऊ शकले नाही. अशातच नागराज मंजुळे यांनी छायाला अचानक फोन केला. त्यावेळी छाया अंगाई या नाटकाच्या प्रयोगांमध्ये व्यस्त होती. ठाण्यात गडकरीला त्याचा प्रयोग होता. रात्री प्रयोग संपल्यावर नागराज मंजुळे छायाला भेटण्यासाठी थेट गडकरीलाच पोहचले आणि चक्क गडकरीच्या समोरच्या रस्त्यावर उभे राहून नागराजने तिला फॅन्ड्रीची स्टोरी ऐकवली. अशी नागराजला फॅन्ड्रीमधील नानी सापडली.

भिडू या चित्रपटातील तिच्या भूमिकेसाठी छायाला दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आता तर छायाने मराठी सिनेमासोबतच हिंदी चित्रपटांमध्येही स्वतःची छाप सोडायला सुरुवात केली आहे. नासिरुद्दीन शहासारख्या दिग्गज कलाकाराने ‘न्यूड’मधील तिच्या भूमिकेसाठी कौतुकाची थाप दिली होती, शिवाय त्यातील ‘चंद्राक्का’च्या भूमिकेसाठी शासनाचा पुरस्कारही तिला मिळाला. ‘अंधाधुंद’ या हिंदी सिनेमातील तिच्या भूमिकेसाठी खास तब्बूचा तिला अभिनंदनाचा फोन आला होता. चाहत्यांकडून ‘गंगुबाई काठीयावाड’मधील तिच्या भूमिकेचे तोंडभरून कौतुक झाले. हेमा मालिनी, रेखा, राखी अशा ग्लॅमरस नायिकांना आपण अमिताभ बच्चन यांच्या पत्नीच्या भूमिकेत पडद्यावर पाहिले आहे. ‘झुंड’च्या निमित्ताने छायाही त्या रांगेत जाऊन बसली आहे. समोर खुद्द बच्चनजी असतानाही तिच्या अभिनयातील सहजता आणि नैसर्गिक भाव तेवढ्याच प्रभावीपणे साकारायला ती विसरलेली नाही.

ग्लॅमरच्या दुनियेतील स्पर्धेचे कोणतेही दडपण छायावर नाही. या दुनियेत प्रवेश करत असतानाही संघर्ष अटळ होता आणि इथे एक प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर दुसरा प्रोजेक्ट मिळेपर्यंतही संघर्ष हा असतोच, असे तिचे म्हणणे आहे. ती म्हणते की, पूर्वी काम मिळण्यासाठी मला संघर्ष करावा लागायचा आणि आज अधिक चांगले काम मिळण्यासाठीही संघर्षच करावा लागतो. असे असूनही ती स्वांत सुखाय जगते. शूटिंगमधून सुट्टी मिळाली की तिची पावलं आपोआप कोकणातल्या गावच्या कौलारू घराकडे धाव घेतात. गौरी-गणपती असो किंवा गावची जत्रा छाया कधीही हे उत्सव चुकवत नाही.

आज छायाकडे मोठमोठ्या बॅनरची कामे येत आहेत. असे असूनही छाया दरवर्षी नवोदित तरुणांना प्रेरणा मिळावी आणि स्वतःला पैशांपेक्षा कामाचा आनंद घेता यावा याकरिता नव्या होतकरू मुलांसोबत काम करते. तिच्या मोकळ्या-ढाकळ्या, स्वच्छंद स्वभावाला अनुसरूनच तिचा मैत्रीचा पसारा मोठा आहे. मिलिंद शिंदे, शशांक शेंडे, नागराज मंजुळे अशा मित्रांची नावे तिच्या मित्रयादीत आहेत. ती सांगते की, मला हे सांगायला आवडेल की मी जे काही माझ्या व्यक्तिगत जीवनात किंवा या इंडस्ट्रीत ठामपणे उभी आहे त्यासाठी माझा हा मैत्रीचा पसारा मला खूप मोलाचा आणि महत्त्वाचा वाटतो.

छायाला तिच्या कल्पनेतील प्रेमाच्या संकल्पनेबद्दल विचारले असता ती शिताफीने शॉर्टकर्ट मारत उत्तरते की, प्रेमाबद्दल असं बोलायचं सांगायचं नसतं. प्रेम फक्त करायचं असतं. अर्थातच सध्यातरी छायाच्या वाट्याला येणार्‍या भूमिकांचं ती ज्याप्रमाणे सोनं करतेय ते पाहता निशःब्दपणे ती त्या भूमिकांवर मनसोक्त प्रेम करतेय हेच एकमेव सत्य आहे.


हेही वाचा – ‘सुर्या’ चित्रपटाचा धमाकेदार म्युझिक लाँच सोहळा संपन्न

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -