अभिनेत्री अरुणा इराणी यांनी मालिका विश्वात तसेच बॉलिवूडमध्ये विविध भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. ‘बेटा’, ‘रॉकी’, ‘बॉबी’, ‘लव्ह स्टोरी’, ‘फर्ज’ यासारख्या एकापेक्षा एक 500 हुन अधिक सिनेमात त्यांनी काम केलं आहे. आजही त्या अभिनय विश्वात कार्यरत आहेत. दरम्यान, अरुणा इराणी त्यांच्या कारकिर्दीसोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेदेखील बऱ्याचवेळा चर्चेत राहिल्या आहेत. माहितीनुसार, वयाच्या 40 व्या वर्षी त्यांनी दिग्दर्शक कुकू कोहलींसोबत प्रेम विवाह केला. पण बराच काळ त्यांना आपलं लग्न लपवावं लागलं होतं. त्याच कारण काय? याविषयी आज आपण जाणून घेऊ. (Aruna Irani Love Life She kept her marriage secret for a reason)
अभिनेत्री अरुणा इराणी आणि दिग्दर्शक कुकू कोहली यांच्या लग्नाची त्याकाळी सर्वाधिक चर्चा रंगली होती. अभिनेत्रीने आपले लग्न झाल्याचे बरेच दिवस लपवले होते. इतकेच नव्हे तर लग्नानंतर मूल होऊ द्यायचे नाही असा कठोर निर्णयदेखील त्यांनी घेतला होता. आपल्या प्रेमकहाणीचा एक महत्वपूर्ण अध्याय त्यांनी एका मुलाखतीत उलगडला होता. ज्यात त्यांनी आपल्या प्रेमकहाणीची सुरुवात कुठून झाली ते लग्न का लपवलं? आणि मूल का होऊ दिलं नाही? अशा अनेक महत्वाच्या गोष्टींवर प्रकाश टाकला.
पहिली भेट, तिरस्कार तरीही झालं प्रेम
या मुलाखतीत अरुणा इराणींनी सांगितले, ‘कोहरामदरम्यान मी आणि कुकूजी भेटलो. घर चालवण्यासाठी तेव्हा मी सिनेमे करत होते. माझ्या भूमिका फार चांगल्या नव्हत्या पण मला गरज होती. तेव्हा मद्रासमध्ये माझ्या सिनेमांचे शूट सुरू असताना कुकूजींनी माझ्या महिनाभराच्या डेट्स मागितल्या. मी प्रयत्न केला पण मला जमले नाही. म्हणून मी त्यांचा सिनेमा नाकारला. ज्याचा त्यांना राग आला. नंतर आम्ही काम सुरू केलं तेव्हा काम नसतानाही मला तारखा दिल्या जायच्या. ते मला सतत फोन करायचे. ज्याचा मला राग यायचा. अनेकदा आमची भांडणं व्हायची. आम्ही एकमेकांचा तिरस्कार करू लागलेलो. पण मग पुढे काय झालं काय माहित. ते अचानक नरमले आणि आमची मैत्री झाली. ज्यातून पुढे आम्ही प्रेमात पडलो’.
म्हणून लग्न लपवलं आणि ‘तो’ निर्णय घेतला
अरुणा इराणी म्हणाल्या, ‘माझं आणि कुकूजींचं लग्न झालं तेव्हा ते आधीपासून विवाहित होते. जे मला माहित होतं. म्हणून मी आमचं लग्न लपवण्याचा निर्णय घेतला. मी आमच्या लग्नाबद्दल कोणालाचं सांगितले नाही. त्यांची पत्नी मुलांसह सेटवर यायची. त्यामुळे मला ते विवाहित आहेत हे माहित होतं. आमचं लग्न हा आम्हा दोघांसाठीही एक कठीण निर्णय होता. पण कसबसं आमचं लग्न झालं. त्यावेळी मूल होण्याचा निर्णय आमच्यासाठी योग्य नव्हता आणि म्हणून आम्ही त्याचा विचार केला नाही. याची आज मला खंत वाटते. पण माझ्याशी लग्न करण्यासाठी त्याने जगाशी लढा दिला, या गोष्टीचं समाधान आहे’.
वयाच्या 40 व्या वर्षी थाटला संसार
अभिनेत्री अरुणा इराणी आणि दिग्दर्शक कुकू कोहली यांनी 1990 मध्ये लग्न केले. तेव्हा अरुणा 40 वर्षांच्या होत्या. कुकू कोहलींनी अरुण इराणींसोबत लग्न केले तेव्हा त्यांचा पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाला नव्हता. मात्र, कालांतराने हा वाद परस्पर चर्चेतून सोडवण्यात आला. ज्यामुळे कालांतराने अरुणा इराणी आणि कुकू कोहली सुखाचा संसार थाटू शकले.
हेही पहा –
Nargis Fakhri Secret Wedding : नर्गिस फाखरीने केलं सिक्रेट वेडिंग? पार्टनरसोबतचे फोटो व्हायरल