व्हेलेंटाईन वीक सुरू असल्यामुळे सगळीकडे गुलाबी वातावरण निर्माण झालंय. जो तो आपल्या प्रेमभावनांची वाट मोकळी करू पाहतोय. असे असले तरीही जगभरात असे कितीतरी लोक आहेत ज्यांच्या प्रेमकहाणीची सुरुवात होता होता राहिली. तर काहींची प्रेमकथाच अधुरी राहिली. अशीच एक गोष्ट, अशीच एक व्यथा अभिनेत्री आशा पारेख यांचीही आहे. सिनेसृष्टीतील एक सुंदर आणि यशस्वी अभिनेत्री असणाऱ्या आशा पारेख आजही अविवाहित आहेत. यामागील कारण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (Asha Parekh why choose not to marry ever)
बॉलिवूड सिनेविश्वातील नामांकित तारकांपैकी एक म्हणजे सिने-अभिनेत्री आशा पारेख. सिनेसृष्टीतील त्यांचे योगदान फार मोठे आहे. ज्यासाठी त्यांना ‘दादासाहेब फाळके’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. त्यांच्या कारकिर्दीइतकीच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा कायम राहिली. त्यापैकी एक कारण म्हणजे त्यांची अधुरी प्रेम कहाणी. आज आशा पारेख आपलं आयुष्य एकट्या जगत आहेत. त्यांच्या आयुष्यात ‘लाईफ पार्टनर’ म्हणता यावं अशी कुणीच व्यक्ती नाही. याबाबत स्वतः आशा पारेख यांनी खुलासा केलाय.
लग्न माझ्या नशीबात नसेल..
एका मुलाखतीत आशा पारेख यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य करताना म्हटले, ‘होय. माझं लग्न झालेलं नाही. पण मला या गोष्टीचं कधीच वाईट वाटलं नाही. उलट लग्न माझ्या नशीबात नसेल म्हणून मी अविवाहित आहे असं मी समजते. खरंतर लग्न- संसार- आईपण या सगळ्याची मला आवड आहे. पण त्या गोष्टी माझ्या आयुष्यात घडल्याचं नाहीत म्हणून मला काही वाटत नाही. त्यापेक्षा मी एकटी का असेना माझं आयुष्य मी माझ्या मर्जीने जगतेय याचा मला आनंद आहे’.
म्हणून अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला
आशा पारेख यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1942 रोजी झाला. त्यांनी 1959 मध्ये ‘दिल दे के देखो’ या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूड डेब्यू केला. दरम्यान, आशा आणि सिनेमाचे दिग्दर्शक नासिर हुसैन एकमेकांच्या प्रेमात पडले. पण नासिर विवाहित होते. परिणामी त्यांनी हे नातं पुढे जाऊ दिलं नाही. आपला संसार मोडेल, या भीतीने त्यांनी एक पाऊल मागे घेतले. आशा यांचीही अशीच काहीशी ईच्छा होती.
मुळात आपल्याला ‘दुसरी पत्नी’ हा टॅग नकोच म्हणून त्यांनीही नासिर यांच्या निर्णयाला दुजोरा दिला आणि हे नातं तिथेच संपवलं. पण पुढे जाऊन आशा पारेख यांचं मन कुणावर आलंच नाही. शिवाय त्या एक अभिनेत्री असल्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचणं कित्येकांना कठीण होतं. त्यामुळे कुणी लग्नाची मागणी घेऊन आलंच नाही. अखेर अभिनेत्रीने आयुष्यभर अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला.
आशा पारेख यांचा सिनेप्रवास
आशा पारेख यांनी ‘माँ’ सिनेमातून बालकलाकार म्हणून फिल्मी करिअरची सुरुवात केली. तर अभिनेत्री म्हणून ‘दिल दे के देखो’ हा त्यांचा पहिला सिनेमा होता. आशा पारेख यांचे अनेक सिनेमे गाजले. ज्यामध्ये ‘जब प्यार किसी से होता है’, ‘घराना’, ‘मेरे सनम’, ‘तीसरी मंजिल’, ‘दो बदन’, ‘भरोसा’, ‘उपकार’, ‘साजन’, ‘आन मिलो सजना’, ‘शिकार’, ‘फिर वही दिल लाया हूँ’, ‘प्यार का मौसम’, ‘कटी पतंग’ आणि ‘कारवां’सारख्या सुपरहिट सिनेमांचा समावेश आहे.
हेही पहा –