मराठी चित्रपट, मालिका तसेच नाट्यविश्वात आपल्या अभिनयाची जादूगिरी दाखवलेला भरत जाधव हा प्रेक्षकांचा लाडका अभिनेता आहे. लवकरच त्याचा नवा चित्रपट आपल्या भेटीला येतोय आणि या चित्रपटाचे नुकतेच मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या मातीतील एका प्रेरणादायी सत्यकथेवर हा चित्रपट आधारलेला आहे. ज्याची निर्मिती ‘झी स्टुडिओज्’, ‘चॉक अँड चीज फिल्म्स’ आणि ‘फिल्म जॅझ’ने केली आहे. या चित्रपटाचे नाव ‘आता थांबायचं नाय!’ असे आहे. ज्याचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. (Ata Thambaycha Naay Movie Motion Poster Released)
हटके टायटल – आता थांबायचं नाय!!
आता थांबायचं नाय! या चित्रपटाचे मोशन पोस्टर टायटलप्रमाणेच कमाल आहे. वेगवान रस्त्यावरील एका भिंतीवर तीन ठसठशीत रंगांत लिहिलेले ‘आता थांबायचं नाय!’ हे शीर्षक पाहून लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच स्फूर्ती येईल. या मोशन पोस्टरमधून ऐकू येणारे जादुई संगीत रसिकांना मंत्रमुग्ध करत कमालीचे आकर्षण तयार करीत आहे.
View this post on Instagram
एकापेक्षा एक दर्जेदार मराठी चित्रपट महाराष्ट्रातील रसिकांच्या मनामनात आणि घराघरात रुजवणाऱ्या ‘झी स्टुडिओज्’ची प्रस्तुती असलेली ही या वर्षातील सर्वात मोठी घोषणा आहे. ‘झी स्टुडीओज् मराठी’चे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर यांनी नुकतीच या चित्रपटाची घोषणा केली आहे.
जबरदस्त कलाकारांची फौज
‘झी स्टुडीओज्’, ‘चॉक अँड चीज फिल्म्स’ आणि ‘फिल्म जॅझ’ निर्मित ‘आता थांबायचं नाय!’ या चित्रपटाचे दिग्दर्शन लोकप्रिय अभिनेते शिवराज वायचळ यांनी केले आहे. प्रेरणादायी सत्यकथेवर आधारित असलेल्या या चित्रपटात प्रमुख भुमिकांमध्ये लोकप्रिय अभिनेता भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, ओम भुतकर, श्रीकांत यादव, पर्ण पेठे, प्रवीणकुमार डाळिंबकर, प्राजक्ता हनमघर, किरण खोजे यांसह एका खास भूमिकेत रोहिणी हट्टंगडी आणि एका कर्तबगार, संवेदनशील अधिकाऱ्याच्या भूमिकेत आशुतोष गोवारीकर दिसणार आहेत.
कधी रिलीज होणार?
‘झी स्टुडिओज्’ प्रस्तुत ‘आता थांबायचं नाय!’ या चित्रपटाबाबत आणखी सांगायचं म्हणजे, चित्रपटाचे लेखन शिवराज वायचळ, ओमकार गोखले आणि अरविंद जगताप यांनी केले आहे. तर चित्रपटाच्या निर्मितीसाठी निर्माते उमेश के बन्सल(झी स्टुडिओज्), निधी परमार – हिरानंदानी(चॉक अँड चीज फिल्म्स’), क्रिएटिव्ह प्रोड्युसर – तुषार हिरानंदानी, धरम वालीया (फिल्म जॅझ) हे सर्व एकत्र आले आहेत. ‘आता थांबायचं नाय!’ ही सकारात्मक ऊर्जा घेऊन येणारी सत्यकथा १ मे पासून थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
अभिनेता भरत जाधवचा मोठा चाहता वर्ग आहे. मराठी रंगभूमी, मालिका तसेच चित्रपटांमध्ये भरतने साकारलेल्या भूमिकांना कायम प्रेक्षकांची वाहवाह मिळाली आहे. भरत शेवटचा ‘लंडन मिसळ’ या चित्रपटात दिसला होता. ज्यामध्ये ऋतुजा बागवे आणि रितिका श्रोत्रीदेखील मध्यवर्ती भूमिकेत होत्या. शिवाय माधुरी पवार, गौरव मोरेदेखील या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत होते. हा एक कॉमेडी जॉनर सिनेमा होता. यानंतर आता भरत पुन्हा एकदा नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे.
हेही पहा –
Chiki Chiki Boo Boom Boom : ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटाचा धमाल टिझर भेटीला