-हर्षदा वेदपाठक
आयुष्यमान खुराना आणि अनन्या पांडे अभिनीत ड्रीमगर्ल 2 या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आठवड्याभरामध्ये ऐशी करोडचा व्यवसाय केला आहे. आयुष्मानचे मागचे दोन चित्रपट आपटल्यानंतर या मिळालेल्या यशाबद्दल तो समाधानी आहे. त्याबद्दल त्याच्यावर केलेली बातचीत
तुझी ‘फिगर’ बघून तर मोठमोठ्या नट्यांनाही न्यूनगंड येईल! खुष?
(हसतो) सगळया अभिनेत्रीबरोबर स्पर्धा करायची. मोठ्या पडद्यावरचा मी त्यांचा स्पर्धक ठरु शकेन, अशी भीती दाखवत त्यांची झोपच उडवून लावण्याची माझी इच्छा होती ती ड्रीमगर्ल 2 या चित्रपटाने पूर्ण केली.
तुझ्या बायकोची किती मदत घेतलीस?
मी कोणत्याच टीप्स घेतल्या नाहीत. अभिनेता म्हणून आम्ही सतत लोकांचे निरिक्षण करत असतो आणि आम्ही आमच्या निरिक्षणांच्या आधारेच काम करत असतो. त्याचबरोबर मी माझ्यातील स्त्रीशक्ती प्रज्वलित करण्याचाही प्रयत्न केला. रंगभूमीवर मी बरेच काम केले आहे. त्याचबरोबर रेडीयोसाठी व्हॉईस मॉड्युलेशन केले असल्यामुळे, मुलीचा आवाज काढणे माझ्यासाठी कठीण काम नव्हते. सोबत मी व्यायाम करणे थांबले, कारण महिलांची बॉडी हि माचो नसते. फक्त डाएट वर लक्ष केंद्रित केले.
हे स्त्री गुण तू कोणाकडून आत्मसात केलेस?
माझ्या अवतीभवती सशक्त स्त्रिया आहेत – मग ती माझी बायको असेल, व्यवस्थापक असेल किंवा सहकलाकार – त्या सगळ्या अतिशय कणखर, सक्षम महिला आहेत. त्यांच्याबरोबर राहील्याने माझ्या स्त्री वादी विचारांना चालना मिळते. या भूमिकेसाठी मला ड्रीम गर्ल हेमा मालिनी आणि त्याचबरोबर माधुरी दिक्षितकडून प्रेरणा मिळाली. मला त्यांच्यासारख्या लकबी अंगीकारायच्या होत्या.
हे स्त्री गुण कितपत तुझ्या मनाचा भाग झाले आहेत?
असे काही नाही. मी अगदी सहजतेने स्विच ऑफ आणि स्विच ऑन करु शकतो. मी ती व्यक्तिरेखा घरी घेऊन जात नाही. शांतपणा आणि संयम हि स्त्रिलिंगी मुलतत्व पुरुषामध्ये देखील असतात. आणि त्यातून समतोल राखला गेला पाहिजे. यामुळे आपला समाज जगण्याच्या दृष्टीने अधिक चांगला होईल असे मला वाटते. याचा अर्थ आपल्या पुरुषी उर्जेवर मात करावी असा मात्र नाही.
स्त्री आणि पुरुष यांच्यात समतोल साधणे कठीण होते का?
या चित्रपटात स्त्री-पुरुषांमध्ये समतोल राखणे महत्वाचे होते. माझ्या मते, प्रत्येक पुरुषामध्ये स्री शक्ती असते. आणि ज्या महीला स्वतः ला सक्षम मानतात. त्या खंबीरपणा दाखवतात. हे एका खंबीर स्त्रीचे लक्षण आहे.
कोणी विचारणा केली तर किन्नराची व्यक्तिरेखा स्विकारशील?
मला किन्नराची भूमिका साकारायला आवडेल, पण मला असंही सांगायला आवडेल, की जर असा विषय मोठ्या पडद्यावर येणार असेल, तर त्यासाठी खऱ्याखुऱ्या किन्नर व्यक्तिचीच निवड त्या भूमिकेसाठी व्हायला पाहीजे. दसरा उत्सवात रामलीलेमध्ये मुलांनी सीता आणि द्रौपदीची भूमिका करण्याची आपल्याकडे प्रथा आहे. नाट्यशास्त्रातही हे शिकवले गेले आहे. मला वाटते आपल्या देशात ही सामान्य बाब आहे.
नव्वदच्या दशकात अशा विषयावर चित्रपट बनविणे शक्य नव्हते. तुला असे वाटते काय, की तुझ्या या चित्रपटासाठी तुला काही वैयक्तिक स्पष्टीकरण देण्याची गरज आहे?
आमचा चित्रपट हा मनोरंजन करणार होता. त्यामध्ये प्रहसनाची (स्लॅपस्टीक) थोडी झलक होती. आपण आता अशा प्रगतीशील टप्प्यावर आलो आहोत, तिथे आपण प्रत्येक प्रकारचे चित्रपट प्रदर्शित करु शकतो. आता सिनेमाचे व्याकरणच बदलले आहे. ओटीटी वर तर तुम्ही अधिक प्रयोगशील होऊ शकता. चित्रपटगृहात प्रदर्शित होणारे चित्रपट हे सर्वस्तरातील प्रेक्षकांसाठी तयार केले जातात. विभाजनाचा हा प्रकार नुकताच सुरु झाला आहे. माझ्या मते आपण प्रगती केली आहे आणि ते चांगले एक लक्षण आहे.
तुझ्यासाठी आनंद म्हणजे काय आहे?
आनंद म्हणजे समाधान. महत्वाकांक्षा आणि व्यावसायिकता यांचे खासगी आयुष्यात चांगले संतुलन साधता येणे.
आव्हानांचे रुपांतर संधीत करण्याबद्दल तुला काय वाटते?
माझ्या चित्रपटांची यादी पाहा तुम्ही, तेच एक मोठे आव्हान होते. पारंपारिक हिंदी चित्रपटांपेक्षा ही यादी खूपच वेगळी आहे. या व्यवसायात माझे स्थान भक्कम करण्यासाठी, मला खूप मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागला. आणि मी त्या आव्हानांचे संधीत रुपांतर केले आणि माझे स्वतःचे स्थान निर्माण केले.
या कमालीची उलथापालथ असलेल्या ग्लॅमरच्या जगात तु तुझा शांतपणा कसा काय राखतोस?
मी स्वभावाने शांत व्यक्ती आहे. घरातही माझा कधी तोल जात नाही. माझ्या आईवडीलांनी ज्याप्रकारे मला वाढवले, त्यामुळेच हे शक्य झाले आहे.
हेही वाचा- Movie Review: प्रेरणादायी लव्ह ऑल