घरमनोरंजनबत्ती गूल मीटर चालू

बत्ती गूल मीटर चालू

Subscribe

व्यवस्थेच्या गडद अंधारात...अंतर्मनाच्या आशेचा किरण

टॉयलेट एक प्रेम कथा बनवणार्‍या श्री नारायण सिंह यांचा बत्ती गूल मीटर चालू हा पुढचा प्रयत्नही उत्तम जमून आलाय. बॉलिवूडमध्ये अलिकडच्या काळात प्रेमकथांना सामाजिक समस्येशी जोडून त्यातून चांगल्या कलाकृती पडद्यावर साकारल्या जात आहेत. हिंदी पडद्यावरची ही नवी सिनेपद्धत लोकप्रिय होत आहे.

टॉयलेट…मध्ये ज्या पद्धतीने नारायण सिंह ने ही रोजच्या जगण्याशी संबंधित अशी समस्या मांडली होती. त्यात कुठलाही आडपडदा नसलेलं पती पत्नीतलं हळवं नातं ज्यावेळी नैसर्गिक गरजेच्या आड येतं, त्यावेळी निर्माण होणारी हतबलता ब्लॅक कॉमेडीसारख्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न होता. हा प्रयत्न नारायण सिंहने पूर्णपणे ब्लॅक न ठेवता तो ग्रे शेडमध्ये यशस्वीरित्या रंगवला होता. बत्ती गूल मीटर चालू मध्ये प्रेमत्रिकोणातून लोडशेडींगचा प्रश्न मांडण्यात यावेळी श्री नारायण सिंहना यश आलं आहे. सोबत लव्ह ट्रँगलची आवड असलेल्या रोमँटीक प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न बत्ती गूल मीटर चालू मध्ये झाला आहे.

- Advertisement -

समांतर सिनेमांची परंपरा असलेल्या हिंदी पडद्यावरील ब्लॅक कॉमेडी काहीशी ग्रे शेडमध्ये रंगवण्याची पद्धत नवी नाही. त्याला सामाजिक समस्येची जोड देणारा तरुण दिग्दर्शक म्हणून श्री नारायण सिंहची दखल घ्यावीच लागेल. वीजवापर आता जगण्याचा भाग राहिलेला नाही, तर तो जगणंच झालेला आहे. लोडशेडींगच्या समस्येवर वर्तमानपत्रात रकानेच्या रकाने भरून बातम्या येत असताना बत्ती गूल…ने हा विषय परिणामकारकपणे मांडलाय. आपल्या नेहमीच्या वापरापेक्षा जास्त येणारं वीज बिल आपणही कधीनाकधी पाहिलेलं असतं. तर ज्यांच्याघरी अद्याप वीज पोहचलेलीच नाही अशा ग्रामीण आदिवासी भागातील घरांनाही हजारोंचं वीज बिल पाठवल्याच्या बातम्या याआधी आलेल्या आहेत.

या जादा वीज बिल त्यात वीज मंडळातील अधिकारी कर्मचार्‍यांची अडेलत्तटू भूमिका यामुळे समान्य माणूस मेटाकुटीला आल्याच्या घटना याआधी घडल्या आहेत. हाच प्रश्न बत्ती गूल…मध्ये मांडलाय. पण तो मांडताना कथेला पटकथा बांधून ठेवली असल्याने चित्रपट विस्कळीत होत नाही. संवादातून सिनेमा उलगडत जातो. मात्र गाण्यांचा वापर नको तेवढा झाल्याने चित्रपटाचा विषय काहीसा लांबवला जातो. मध्यंतरापर्यंत चित्रपट काहीसा रटाळ झालाय. पण त्यानंतर कथानक वेग घेते.

- Advertisement -

चित्रपटाची कथा उत्तराखंडमधल्या एका छोट्या शहरातली आहे. शाहीद कपूर (सुशील कुमार पंत) वकील आहे. पण कायद्यातले कच्चे दुवे त्याला माहित आहेत आणि आपल्या छोट्यामोठ्या फायद्यासाठी कायदे मोडणार्‍या नागरिकांना वेठीस धरून तो आपली वकिली दुकानदारी चालवतोय. दिव्यांदू शर्मा (सुंदर त्रिपाठी) आणि श्रद्धा कपूर ( ललिता, नॉटी) हे मित्रांचं त्रिकूट आहे. सुंदर त्रिपाठी एक प्रिटींग प्रेस टाकतो, त्याचं कायम लोडशेडींग असलेल्या शहरात त्याला अवाढव्य बिल येतं. हे बिल भरण्यासाठी त्याची दमछाक होते.

batti-gul-meter-chalu

या समस्येवर त्याला त्याचे मित्र सुशील आणि नॉटी मदत करतात का, याचं उत्तर पडद्यावर पहायला हवं. चित्रपटाच्या सुरुवातीचा जळक्या टायरमधून केलेल्या तीरंदाजीच्या स्पर्धेचा प्रसंग लोडशेडींगची हतबलता दाखवणारा आहे. चित्रपटांत अनेक प्रसंग कॉमेडीतून अशाच ग्रे शेडमधून रंगवलेले गेलेले आहेत. त्यामुळे विषय अंधाराविरोधात असलेल्या लढ्याचा असला तरी ही ब्लॅक कॉमेडी होणार नाही…याचं भान दिग्दर्शकाने जपलं आहे. हा लढा आहे गेंड्याची कातडी असलेल्या व्यवस्थेविरोधात तरुणाईचा. जादा आलेलं वीज बिल पाहून नागरिकांनी केलेली आत्महत्या किंवा त्याचा धसका घेऊन झालेला मृत्यू अशा आशयाच्या बातम्या येतंच असतात. याच बातमीचा पाया बनवून श्री नारायण सिंहने वीज गूल मीटर चालू चित्रपट उभा केला आहे.

एखाद्या बातमीला चित्रपटाचं रूप देण्याचं कौशल्य त्याच्यात आहे. वैविध्यपूर्ण आणि वास्तववादी मांडणी करताना कुठेही चित्रपट वीज वापराविषयी समुपदेशन करत नाही. न्यायव्यवस्था आणि सरकारी यंत्रणांमध्ये सुरू असलेला समान्य माणसाचा हक्कांसाठीचा हा लढा असतानाही तो एकांगी झालेला नाही. कायद्याची धमकी दाखवून कोर्टाबाहेरच वकिलीचचे दुकान चालवणार्‍या व्यवहारचतुर शहीद कपूरने वकील सुशील कुमार पंत सहज अभिनयातून उभा केला आहे.

काही दिवसांपूर्वी आलेल्या स्त्री चित्रपटामुळे कौतूक होत असलेल्या श्रद्धा कपूरचा या चित्रपटातही पडद्यावरचा वावर आत्मविश्वासाने भरलेला आहे. त्यामुळे येत्या काळात हिंदी पडद्यावरच्या समकालीन नायिकांना ती खर्‍या अर्थाने आव्हान देण्यासाठी ती सज्ज झालीय. यामी गौतमी आणि दिव्यांशू शर्माही लक्षात राहातात. उत्तराखंडमधल्या डोंगरदर्‍यांवरून फिरणारा कॅमेर्‍या लोडशेडींगचा अंधार जास्तच गडद करतो. या मिट्ट अंधारात आपल्या अंतर्मनातून निघालेला प्रकाश हाच एक आशेचा किरण आहे. याच ठिणगीचा वणवा कसा पेटत जातो आणि निरगरट्ट सरकारी यंत्रणा त्यात कशी उघडी पडते…हे पाहायला बत्ती गूल मीटर चालू पहायला हवा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -