पु.ल.देशपांडे यांनी जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्या ‘पिग्मॅलियन’ नाटकाचे केलेले मराठी रूपांतरण म्हणजे ‘ती फुलराणी’. हे नाटक मराठी रंगभूमीवर अजरामर झाले. यातील मंजुळा हे मध्यवर्ती पात्र दिवंगत अभिनेत्री भक्ती बर्वे यांनी साकारले होते. त्यानंतर पुढे प्रिया तेंडुलकर, सुकन्या कुलकर्णी, अमृता सुभाष आणि हेमांगी कवीने या मंजुळाची भूमिका साकारली. प्रत्येकीने आपापल्या परीने या भूमिकेला न्याय दिला आणि प्रेक्षकांचे प्रेम मिळवले. पण तरीही भक्ती बर्वे यांनी साकारलेली मंजुळा प्रेक्षकांच्या अजूनही स्मरणात आहे. (Bhakti Barve Ti Phulrani fame actress story in marathi)
नाटक माझा प्राण..
आपण बऱ्याचदा ‘नाटक हा माझा प्राण आहे..’ हे वाक्य ऐकले असेल. पण हे वाक्य रंगभूमी गाजवताना जगलेली अभिनेत्री म्हणजे भक्ती बर्वे. त्यांचा जन्म 10 सप्टेंबर 1948 रोजी सांगलीमध्ये झाला. लहानपणापासून त्यांना अभिनयाची आवड होती. गणेशोत्सवातील स्पर्धांमध्ये विविध नकला करत त्यांचा अभिनय विश्वातील प्रवास सुरू झाला. उत्तम पाठांतराच्या जोरावर त्यांना आकाशवाणीवर काम करण्याची संधी मिळाली आणि या संधीचं त्यांनी सोनं केलं. दूरदर्शनवर निवेदन करताना त्यांच्यातली अभिनेत्री कायम जिवंत होती. त्यामुळे नाटक आणि भक्ती बर्वे हे समीकरण कायम राहिलं.
भक्ती बर्वेंची कारकीर्द
त्याकाळी नाटकाचा प्रेक्षकवर्ग भलामोठा होता. त्यात भक्ती बर्वे यांच्यासारखी चतुरस्त्र अभिनेत्री रंगभूमीवर अवतरली तर वन्स मोअर मिळाला नाही, तर नवल वाटायचे. मराठी रंगभूमीवर काम करणाऱ्या भक्ती बर्वे यांनी अनेक नाटकांत काम केले. ‘अखेरचा सवाल’, ‘अजब न्याय वर्तुळाचा’, ‘आई रिटायर होतेय’, ‘आधे अधुरे’, ‘आले देवाजीच्या मना’, ‘घरकुल’, ‘पप्पा सांगा कुणाचे’, ‘पळा पळा कोण पुढे पळे तो’, ‘पुरुष’, ‘बाई खुळाबाई’, ‘माणसाला डंख मातीचा’, ‘मिठीतून मुठीत’, ‘रंग माझा वेगळा’, ‘रातराणी’ आणि अशा बऱ्याच नाटकांमध्ये भक्ती बर्वेंनी आपल्या अभिनयाची जादू दाखवली. पण ‘ती फुलराणी’ काही वेगळीच कलाकृती ठरली.
अभिनेत्री भक्ती बर्वे या आपल्या भूमिकेचा अत्यंत बारकाईने अभ्यास करायच्या. आपण साकारत असलेली भूमिका काय आहे? कशी आहे? याचा पूर्ण विचार करून त्या भूमिका साकारायच्या. त्यामुळे काल्पनिक ‘फुलराणी’ जेव्हा रंगभूमीवर अवतरली तेव्हा भल्याभल्यांच्या मनाला भावली. या नाटकाचा पहिला प्रयोग 29 जानेवारी 1975 रोजी मुंबईत रविंद्र नाट्य मंदिरात झाला होता. या नाटकाचे 1111 हून अधिक यशस्वी प्रयोग झाले. तर भक्ती बर्वेंनी आईची भूमिका साकारलेले ‘आई रिटायर होतेय’ या नाटकाचे 950 प्रयोग झाले. रंगभूमीवर एक काळ गाजवलेल्या भक्ती बर्वे कोण? हे आजच्या पिढीतील बऱ्याच जणांना माहित नसतील, हे दुर्दैव. पण ‘ती फुलराणी’ पुन्हा होणे नाही हे वास्तव आहे.
एक होती ‘फुलराणी’
भक्ती बर्वे यांचा ‘रंगमंचावरील सम्राज्ञी’ म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या नावावर कोणत्याही विक्रमाची नोंद नसेल पण आजही रंगभूमीवर कार्यरत असणारे कलाकार त्यांच्या अभिनय कारकिर्दीतून प्रेरणा घेतात. मराठी नाट्यक्षेत्रातील अव्वल कामगिरीसाठी त्यांना 1990 साली ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले होते. भक्ती बर्वे यांनी आपल्या कारर्किदीत केवळ 2 सिनेमे केले. 1983 साली ‘जाने भी दो यारों’ आणि 1998 साली ‘चौरसिया की माँ’ या दोन सिनेमात त्या झळकल्या होत्या. दरम्यान, एका सिनेमाच्या शूटिंगदरम्यान त्या हिंदी सिनेसृष्टीतील सहअभिनेते शफी इनामदार यांच्या प्रेमात पडल्या. पुढे दोघांचा विवाह झाला. पण शफी यांचे 1996 साली हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आणि भक्ती एकट्या पडल्या.
पतीच्या निधनानंतरही भक्ती यांनी अभिनय विश्वात काम करणं सोडलं नाही. त्यामुळे काही काळ बरा गेला. सगळं काही अलबेल वाटत होतं. पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. पतीच्या मृत्यूनंतर 5 वर्षांनी वाईहून परत येताना मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर भक्ती यांच्या गाडीचा भयानक अपघात झाला. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला आणि कलाविश्वाने एका अष्टपैलू अभिनेत्रीला गमावलं. आज त्या हयात नसल्या तरी त्यांनी जगलेली ‘फुलराणी’ प्रेक्षकांच्या मनामनांत जिवंत आहे. शिवाय रजनीश जोशींच्या ‘एक होती फुलराणी’ या पुस्तकात त्यांनी भक्ती बर्वे यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला आहे.
हेही पहा –
Vicky Kaushal : कठोर परिश्रम, जखमांच्या खुणा.. असा मिळाला उतेकरांना छावा