Bigg Boss Marathi 3: बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच किर्तनकार शिवलिला यांनी मागितली माफी, म्हणाल्या…

प्रसिद्धी किंवा पैशांसाठी मी या शोमध्ये सहभागी झाले नाही.

Bigg Boss Marathi 3 contestant kirtankar Shivalila patil apologized audience after left the bigg bos house
Bigg Boss Marathi 3: बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच किर्तनकार शिवलिला यांनी मागितली माफी, म्हणाल्या...

बिग बॉस मराठीच्या ३ पर्वात (Bigg Boss Marathi 3) स्पर्धक म्हणून सहभागी झालेल्या किर्तनकार शिवलिला पाटील (Shivlila patil) या त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यामुळे घराबाहेर गेल्या. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आता त्यांची प्रकृती ठीक आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा संपूर्ण वारकरी संप्रदाय आणि ज्येष्ठ मंडळींची माफी मागितली आहे. ‘माझा मार्ग चुकला असेल पण माझा हेतू प्रामाणिक होता. मी बिग बॉसमध्ये गेल्याने वारकरी संप्रदाय दुखावला असेल तर मी त्यांची माफी मागते. यापुढे ज्येष्ठांना विचारल्याशिवाय मी कोणताच निर्णय घेणार नाही’,असे शिवलिला पाटील या एबीपी माझाशी बोलताना सांगितले.

आपण पाहिले तर किर्तनकार शिवलिला पाटील या बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात स्पर्धक म्हणून गेल्या तेव्हाच सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. लहान वयात किर्तनकार बनलेल्या शिवलिला पाटील या बिग बॉसमध्ये केल्याने त्यांच्यावर अनेक स्तरातून टीका केल्या जात होत्या. मात्र शिवलिला यांनी बिग बॉसमध्ये जाण्याचा त्याचा हेतू स्पष्ट केला त्या म्हणाल्या, महाराष्ट्राची संस्कृती, वारकरी संप्रदाय, किर्तन परंपरा याविषयी या शोच्या माध्यमातून मराठी आणि अमराठी वर्गाचे प्रबोधन करण्याचा माझा हेतू होता. प्रसिद्धी किंवा पैशांसाठी मी या शोमध्ये सहभागी झाले नाही. आपली संस्कृती सिनेप्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचा माझा हेतू होता,असे त्या म्हणाल्या.

बिग बॉसच्या घरात सकाळची सुरुवात गाण्यावर नाचून होते. बिग बॉसच्या घरात हिंदी गाण्यांवर नाचल्याने देखील शिवलिला यांच्यावर टीका करण्यात आली होती. ‘मी गाण्यावर नाचल्याबद्दल आक्षेप घेण्यात आला पण मी सांगू इच्छिते की, मी फक्त पहिले विठ्ठल वारीचे गाणे वाजले त्यावेळी नाचले होते. नंतर आई तुळजाभवानीचे गाणे लागले होते तेव्हा नाचले होते.त्यानंतर इतर कोणत्याही गाण्यांवर माझे हात पाय हलले नाहीत’,असे शिवलिला यांनी सांगितले.

शिवलिला या बिग बॉसच्या घरात आणखी काही दिवस स्पर्धक म्हणून राहिल्या असत्या. मात्र हवामानात बदल झाल्याने दुसऱ्याच आठवड्यात त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांनी स्वत:हून स्पर्धेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.


हेही वाचा – समांथाशी जवळीक वाढवल्याने स्टायलिस्ट प्रीतम जुकलकरला ठार मारण्याची धमकी