गॅंगस्टर विकास दुबेचा एन्काऊंटर मोठ्या पडद्यावर, चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

कानपूरचा गॅंगस्टर विकास दुबे याच्या जीवनावर आधारित एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

उत्तर प्रदेशातील कानपूर पोलीस हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबे पोलिस चकमकीत ठार झाला होता. या गुंडाच्या आयुष्यावर आधारित एक चित्रपट लवकरच येणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘बिकरु कानपुर गॅंगस्टर’ असे असून या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘बिकरु कानपुर गॅंगस्टर’ या चित्रपटाची निर्मिती अजय पाल सिंह यांनी केली आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये कुख्यात गुंड विकास दुबेचा संपूर्ण जीवनप्रवास दाखवण्यात आला आहे. या चित्रपटातील विकास दुबे ही भूमिका अभिनेता निमय बाली याने साकारली आहे. विकास दुबे याने उत्तर प्रदेशात निर्माण केलेली दहशद, त्याने केलेले गुन्हे तसेच त्याच्यावर सुरु असलेले खटले हे सर्व या चित्रपटाद्वारे दाखवण्यात येणार आहे. सध्या या चित्रपटाच्या ट्रेलरची सोशलमीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.

विकास दुबे हा उत्तर प्रदेशातील बिकरु गावातील एक कुख्यात गुंड होता. कानपूर येथे २ जुलै रोजी अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांवर त्याने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी गोळीबार केला होता. या अंदाधुंद गोळीबारात आठ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर १० जुलैला विकास दुबेला अटक करण्यात आली. पोलिसांचे एक विशेष पथक त्याला कानपूरला घेऊन जात होते. यावेळी पोलिसांच्या ताफ्यातील एका वाहनाचा अपघात झाला, दरम्यान संधी साधून पोलिसांवर हल्ला करत विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. त्याचवेळी पोलिसांनी विकास दुबेला ठार केले. आता त्याच्या जीवनपटावर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप स्पष्ट झाली नाही आहे.


हे वाचा- श्रेया घोषालने दिली गूड न्यूज&, बेबी बंप सोबतचा फोटो केला शेअर