काळवीट शिकार प्रकरण; सैफ, सोनालीसह ५ जण पुन्हा अडचणीत

जोधपूर हायकोर्टाने सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, नीलम कोठारी, तब्बू आणि दुश्यंत सिंह या पाच जणांना नोटीस पाठवली आहे.

Black Buck Poaching case
काळवीर शिकार प्रकरण

काळवीट शिकार प्रकरणी राजस्थान हायकोर्टाने निर्दोष सुटका झालेले बॉलिवूड सेलिब्रिटी सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, नीलम कोठारी, तबू आणि दुष्यंत सिंह पुन्हा अडचणीत येऊ शकतात. या प्रकरणी सत्र न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात राजस्थान सरकारने जोधपूर हायकोर्टात धाव घेतली आहे. जोधपूर हायकोर्टाने सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, नीलम कोठारी, तब्बू आणि दुश्यंत सिंह या पाच जणांना नोटीस पाठवली आहे. सलमान खान व्यतिरिक्त या प्रकरणातील ५ आरोपींची निर्दोष मुक्तात करण्यात आली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी सुपरस्टार सलमान खान याला यापूर्वीच दोषी ठरवत पाच वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सलमान खान सध्या जामीनावर बाहेर आहे.

एप्रिल २०१८ मध्ये काळवीट शिकार प्रकरणात जोधपूरच्या जिल्हा सत्र न्यायालयाने सलमान खानला पाच वर्षाची शिक्षा सुनावली. त्याचसोबत सैफ अली खान, सोनाली बेंद्र, तब्बू, नीलम कोठारी आणि दुश्यंत सिंह यांची निर्दोष मुक्तता केली. त्यावेळी सलमान खान दोन दिवस जोधपूर सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्याला जामीन देण्यात आला. हे प्रकरण २० वर्षापेक्षा जुने आहे.

१९९८मध्ये ‘हम साथ साथ हैं’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सैफ अली खान, नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रे शुटींगसाठी राजस्थान गेले होते. दरम्यान, शुटींगचे काम संपल्यानंतर कांकाणीजवळच्या जंगलात सर्व फिरण्यासाठी गेले होते. त्याठिकाणी त्यांनी एका काळवीटाची शिकार केली होती. काळवीटाच्या हत्येवर स्थानिक बिष्णोई समाजात आक्रमक झाला. त्यांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेत सलमान खान आणि त्याच्या अन्य साथिदारांविरोधात गुन्हा दाखल केला. गेल्या २० वर्षापासून हे प्रकरणावर कोर्टात सुनावणी सुरु आहे.