घरमनोरंजनबॉडी बिल्डर बन गया ॲक्टर! - मराठमोळा केतन करंडे

बॉडी बिल्डर बन गया ॲक्टर! – मराठमोळा केतन करंडे

Subscribe

अजय देवगणकृत ‘भोला’ हा हिंदी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून, एक चांगला मारधाडपट म्हणून चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. भोलामधील खलनायकांपैकी एक खलनायक मराठमोळा बॉडी बिल्डर केतन करंडे याने साकारला आहे. ११४ किलो वजन आणि ६.३ उंची असलेल्या केतनने अजय देवगणसोबत ‘ॲक्शन जॅक्सन’ या चित्रपटात खलनायक साकारला होता. त्याचीच दखल घेत अजय देवगणने त्याला पुन्हा एकदा भोलामध्ये पाचारण केले.

केतन, भोलाच्या चित्रीकरणादरम्यान घडलेला एक किस्सा सांगत होता, “शूटिंगच्या दरम्यान मला सात दिवस खूप ताप होता. कारण मसल्स आणि ॲब्ज डेव्हलप करण्यासाठी दीड महिने मी चपाती आणि भात असे काही कार्ब्स माझ्या जेवणातून घेणं बंद केले होते. यामुळे तुमचे मसल दिसतात, जे बॉडी बिल्डिंग पोज करण्यासाठी योग्य आहेत. मात्र चित्रपटातील फायटिंग सीन करण्यासाठी लागणारी स्ट्रेंथ त्यामुळे कमी होते. त्यामुळेच मला ताप आला , खोकला होता. अजय सर आणि तब्बू मॅडम साशंक झाल्या होत्या. त्यांनी मला विचारलंही की, तुला हे जमेल का ?… मी त्यावर म्हटलं की, सर हे माझं करिअर आहे आणि त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. प्लीज मला करू द्या. अजय सरांना हे आवडलं आणि त्यांनी माझे पंचेस आणखी वाढवले.” केतनने अजय देवगणला दिलेला शब्द तंतोतंत पाळला.

- Advertisement -

गोष्ट इथेच संपली नाही. आता अजय देवगण ‘भोला- २’ च्या तयारीला लागला असून, त्यामध्ये पुन्हा एकदा केतन खलनायक साकारणार आहे. मूळ स्क्रिप्टनुसार केतनच पात्र क्लायमॅक्समध्ये मारलं जाणार होतं. पण त्यांचं कामातील झोकून देणं पाहून, अजय देवगणनं भोलामध्ये त्याला जिवंत ठेवलं आणि त्याचंच कंट्युनिएशन भोला-२मध्ये होणार आहे. हेच केतनच्या कामाचं प्रमाणपत्र आहे.

केतन मुंबईतील गोरेगावमध्ये वाढला. त्याचे वडील मेकॅनिक आणि आई मुंबई महानगरपालिकेमध्ये काम करत होती. घरची परिस्थिती तशी बेताचीच होती. केतन जरी बॉडी बिल्डर म्हणून नावाजलेला असला तरी लहानपणी सतत आजारी असायचा. कुमार वयात केतनचं वजन फक्त 35 किलो होतं. हे पाहून डॉक्टरांनी त्याला दिलेल्या सल्ल्यानुसार केतन गोरेगावच्या प्रबोधन क्रीडा भवनच्या व्यायाम शाळेमध्ये जाऊ लागला. सुरुवातीला त्याला धड एक सूर्यनमस्कार मारता येत नव्हता पण तिथल्या विजय साळवी सरांनी त्याच्यात आत्मविश्वास निर्माण केला. केतनमध्ये व्यायामाची आवड निर्माण झाली. दुसरीकडे आई-वडिलांनी त्याच्या सकस आहाराची काळजी घ्यायला सुरुवात केली. केतनने साळवी सरांच्या मार्गदर्शनाखाली फाट मेहनत करून चांगलंच शरीर कमावलं.

- Advertisement -

पुढे ‘भारत श्री’ असलेल्या संदीप वालावलकरांनी केतनला चक्क शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये उतरवलं. वयाच्या सतराव्या वर्षीच त्याने ज्युनियर ‘मुंबई श्री’ स्पर्धेत रौप्य पदक मिळवलं. तर दुसऱ्यांदा त्याच स्पर्धेमध्ये त्याने सुवर्णपदक मिळवलं. पुढे राज्य स्पर्धा, राष्ट्रीय स्पर्धा असा त्याचा प्रवास सुरू झाला. २००३ सालच्या ‘भारत श्री’मध्ये केतनने कांस्यपदक पटकावं. केतन सांगतो की, या सर्व प्रवासात माझ्या आई-वडिलांचे आशीर्वाद तर होतेच परंतू नगरसेवक दिलीप शिंदे, आमदार सुभाष देसाई यांचीही त्याला खूप मदत झाली.

संदीप वालावलकरांनी केतनच्या करियरला एक वेगळी दिशा दिली. त्यांच्या प्रयत्नांनी उंच्यापुऱ्या- धिप्पाड केतनची बॉलीवूडने दखल घेतली आणि पहिलाच हिंदी चित्रपट ‘अशोका’मध्ये त्याची वर्णी लागली. यामध्ये त्याने डॅनीसोबत पंजा लढवला आहे. पुढे हिंदी चित्रपटांचा सिलसिला सुरू झाला. दरम्यान बॉडी बिल्डर असणाऱ्या केतनने अभिनयाचे धडे गिरवायला सुरुवात केली व वेगवेगळ्या ऑडिशन देत गेला. सलमानसोबत ‘मुझसे शादी करोगी’, सनी देओलसोबत ‘फुल अँड फायनल’, पुन्हा सलमानसोबत ‘गॉड तुसी ग्रेट हो’, जॉन अब्राहमसोबत ‘रेस-२’, प्रभू देवाकृत ‘ॲक्शन जॅक्सन’, विवेक ओबेरॉयसोबत ‘ग्रेट ग्रँड मस्ती-३’ आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित पानिपत, बिग बी यांच्यासोबत ठग्स ऑफ हिंदुस्तान असे चित्रपट केतनला मिळत गेले. बॉलीवूडमध्ये रमलेल्या केतनला मधल्या काळामध्ये ‘सिनियर सिटीझन’ या मराठी चित्रपटातही मोहन जोशी आणि स्मिता जयकरसोबत दर्शकांनी पाहिले आहे.

छोट्या पडद्यावरही तो चमकू लागला. स्टार प्लसवरील अर्जुन, सब टीव्हीवरील चिडियाघर, स्टार प्लसवरील महाभारत. यात त्याने साकारलेला घटोत्कच आवडल्यामुळे सोनी टीव्हीने त्याला ‘सूर्यपुत्र कर्ण’ मालिकेमध्येमध्ये भीमाची भूमिका दिली. चिडियाघरसाठी त्याला, उत्तम विनोदी अभिनेत्याचे पारितोषिकही मिळाले. साऊथच्या चित्रपटांमध्ये देखील केतनची वर्णी लागली. तिथल्या २२ चित्रपटांमध्ये त्याने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. केतनच्या चित्रपट कारकिर्दीचा आढावा घेतला असता त्याने गेल्या वीस वर्षांच्या कालावधीत ४५ चित्रपटांमधून भूमिका साकारल्या आहेत.

अभिनय कारकार्दीसोबतच केतनची आज गोरेगावमध्ये स्वतःची जिम आहे. तिथे योग्य मार्गदर्शन करणारे चार व्यावसायिक प्रशिक्षक असून, दिवसभरामध्ये शंभर ते दीडशे लोक तरी व्यायाम करतात. चित्रपटांचं चित्रीकरण, जिमच व्यवस्थापन आणि केतनला स्वतःचं कमावलेलं शरीर राखण्यासाठी लागणारा सकस आहार सांभाळण्यात पत्नी परिणीता हिची मोलाची मदत होते. येत्या काही काळामध्ये केतन आपल्याला नेटफ्लिक्सवर ‘काला पानी‘ आणि हॉटस्टारवर ‘36 डेज’मध्ये पाहायला मिळणार आहे.

 


हेही वाचा :

फ्रान्सचे राजदूतही शाहरुखचे चाहते; फोटो शेअर करत केलं कौतुक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -