‘सर्किट’ चित्रपटासाठी वैभव तत्त्ववादीचं बॉडीबिल्डिंग

प्रख्यात निर्माता, दिग्दर्शक मधुर भांडारकर निर्मित, प्रस्तुत “सर्किट” या चित्रपटाची चांगलीच हवा झाली आहे. चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाल्यापासून अल्पावधीत या टीजरला लाखो व्ह्यूज मिळाले असून, या चित्रपटातील भूमिकेसाठी अभिनेता वैभव तत्त्ववादीनं आपल्या बॉडीबिल्डिंगवर मेहनत घेतल्याचं दिसून येत आहे. “सर्किट” हा चित्रपट ७ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.

भांडारकर एंटरटेनमेंट आणि पराग मेहता प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती मधुर भांडारकर, फिनिक्स प्रॉडक्शनच्या पराग मेहता, अमित डोगरा आणि देवी सातेरी प्रॉडक्शनच्या प्रभाकर परब यांनी केली असून स्वरूप स्टुडिओचे सचिन नारकर, विकास पवार हे सहनिर्माते आहेत. अनेक वर्षे निर्मिती आणि प्रस्तुती केलेल्या आकाश पेंढारकरने या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शकीय पदार्पण केलं आहे. वैभव तत्त्ववादी आणि हृता दुर्गुळे ही फ्रेश जोडी या चित्रपटात आहे. चित्रपटातील सिद्धार्थ मोहिते या भूमिकेसाठी वैभवनं विशेष मेहनत घेतली आहे. वैभवनं या भूमिकेसाठी बॉडीबिल्डिंग केलं आहे. त्यासाठी त्याला प्रसाद शिर्के यांचं मार्गदर्शन मिळालं आहे. प्रसाद यांनी आजवर बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशन, टायगर श्रॉफ, उर्वशी रौतेला यांना बॉडीबिल्डिंग ट्रेनर म्हणून फिटनेसचे धडे दिले आहेत.

वैभवनं त्याचा लुक इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. वैभवच्या बॉडीबिल्डिंगचं आणि लुकचं कौतुक सर्वत्र होत आहे. वैभवच्या “सर्किट”मध्ये नेमकं काय पाहायला मिळणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.


हेही वाचा : तू सनी देओलसारखाच दिसतोस… खऱ्या सनी देओलला पाहून शेतकऱ्याने दिली प्रतिक्रिया