Saturday, June 10, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन दिलीप प्रभावळकर यांनी लिहिलेले "बोक्या सातबंडे" लवकरच येणार रंगभूमीवर

दिलीप प्रभावळकर यांनी लिहिलेले “बोक्या सातबंडे” लवकरच येणार रंगभूमीवर

Subscribe

ज्येष्ठ अभिनेते-लेखक दिलीप प्रभावळकर यांनी लिहिलेली 'बोक्या सातबंडे' या कादंबरीवर आधारीत नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २० एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे 'बोक्या सातबंडे' या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग सादर करण्यात येणार आहे.

ज्येष्ठ अभिनेते-लेखक दिलीप प्रभावळकर यांनी लिहिलेली ‘बोक्या सातबंडे’ कादंबरी आणि त्यातील बोक्याच्या करामती आपल्याला सर्वांनाच माहिती आहेत. सुरुवातीला गोष्टींच्या माध्यमातून आणि नंतर चित्रपटाद्वारे रसिकांच्या भेटीला आलेला ‘बोक्या सातबंडे’ आता रंगभूमीवर अवतरणार आहे. बोक्या सातबंडे या दिलीप प्रभावळकर यांनी लिहिलेल्या पुस्तकाला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळालेला आहे. या पुस्तकात लिहिलेल्या कथेच्या आधावरच बोक्या सातबंडे नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येऊन गेला आहे. ज्याला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आता लवकरच या पुस्तकावर आधारीत व्यावसायिक नाटकाची निर्मिती करण्यात येणार आहे.

अनामिका, भूमिका आणि मिलाप थिएटर यांची निर्मिती असलेल्या ‘बोक्या सातबंडे’ या नाटकाचे लेखन डॅा. निलेश माने यांनी केलेले आहे. विक्रम पाटील आणि दीप्ती प्रणव जोशी यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. या नाटकाची दृष्य-संकल्पना प्रणव जोशी यांनी केली असून मिलिंद शिंत्रे या नाटकाचे क्रिएटिव्ह दिग्दर्शक आहेत. आरुष प्रसाद बेडेकर या नाटकात टायटल रोलमध्ये दिसणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तर त्याच्या जोडीला इतरही काही कलाकार या नाटकात आपल्या अभिनयाद्वारे रंग भरणार आहेत. पुस्तकामध्ये वाचलेल्या बोक्याच्या करामती आता रंगमंचावर पाहताना रसिकांना एक वेगळाच थरार अनुभवायला मिळणार आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे नाटकाची गोष्ट जरी लहान मुलाला केंद्रस्थानी ठेवून लिहिण्यात आली असली तरी पूर्णत: व्यावसायिक असलेलं ‘बोक्या सातबंडे’ हे नाटक सर्व वयोगटांतील प्रेक्षकांसाठी एक अनोखा अनुभव देणारा असल्याचे मत दिग्दर्शक विक्रम पाटील यांनी व्यक्त केले आहे. नाटकातील बोक्या सातबंडेचे कारनामे सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरावेत असे असून, नेहमीच सावध राहून आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर बारकाईने लक्ष ठेवल्यास येणाऱ्या संकटांचा धीरोदात्तपणे सामना करता येऊ शकतो असं काहीसं सांगणारे आहेत, असे दिप्ती जोशी यांच्याकडून सांगण्यात आले आहे. तसेच गौरव सर्जेराव यांनी या नाटकाचे पोस्टर डिजाइन केले आहे.

- Advertisement -

20 एप्रिल रोजी सायंकाळी 05 वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे ‘बोक्या सातबंडे’ या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग सादर करण्यात येणार आहे. नंतर 21 एप्रिल रोजी दुपारी 12:30 वाजता अण्णाभाऊ साठे स्मारक, पद्मावती येथे आणि 22 एप्रिलला दुपारी 12:30 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरुड येथे प्रयोग होणार आहेत. गीतकार वैभव जोशी यांनी या नाटकातील गीत लिहिले असून संगीतकार निनाद म्हैसाळकर यांनी संगीत दिले आहे. नेपथ्यकार संदेश बेंद्रे यांनी या नाटकाचा सेट बनवला आहे, तर राहुल जोगळेकर यांनी प्रकाशयोजना केली आहे. वेशभूषा महेश शेरला यांनी केली असून, रंगभूषा कमलेश बिचे यांनी केली आहे. संतोष भांगरे यांनी कोरिओग्राफी केली आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -