घरताज्या घडामोडीशाहरुख आणि DDLJ चं गारुड !

शाहरुख आणि DDLJ चं गारुड !

Subscribe

किंग खान म्हणजेच शाहरुख खानचा वाढदिवस हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. यंदा या चर्चेला एक वेगळाच रंग आहे, तो म्हणजे आज शाहरुखच्या ५७ व्या वाढदिवसानिमित्त त्याचाच रोमँटिक सिनेमा ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ पुन्हा प्रदर्शित केला जात आहे. हा चित्रपट देशभरातील पीव्हीआर आणि सिनेपोलिसच्या स्क्रिन्सवर प्रदर्शित होणार आहे.
20 ऑक्टोबर 1995 रोजी रिलीज झालेल्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ ला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. हा चित्रपट केवळ भारतातच नाही, तर परदेशात राहणार्‍या भारतीयांनाही आवडला होता. या चित्रपटामुळे हिंदी चित्रपटसृष्टीला शाहरुख खान आणि काजोलच्या रूपाने एक नवी रोमँटिक जोडी मिळाली, ज्याची जादू आजही कायम आहे. या चित्रपटाने सर्व विक्रम मोडीत काढले. मुंबईतील मराठा मंदिरात हा चित्रपट 1000 आठवडे चालला. 10 फिल्मफेअर पुरस्कार जिंकणारा DDLJ अवघ्या 4 कोटी रुपयांमध्ये बनला होता. 1995 मध्ये या चित्रपटाने एकूण 102.50 कोटी रुपयांचा व्यवसाय केला, ज्यापैकी 89 कोटी रुपये भारतातून आणि 13.50 कोटी रुपये विदेशातून कमावले गेले.

‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ रिलीज होऊन 27 वर्षे झाली आहेत. भारतीय सिने-इतिहासात वेगळे स्थान असलेल्या या चित्रपटाने बॉलिवूडला जगभरात एक नवी ओळख दिली. राज आणि सिमरनच्या या प्रेमकथेने प्रेमाची नवी व्याख्या तयार केली होती. हीर-रांझा आणि लैला-मजनू यांच्या प्रेमकहाणीप्रमाणेच सिमरन-राजचे प्रेमही अजरामर झाले. हा चित्रपट पाहणारी तरुण पिढी आज मध्यमवयीन झाली असून या चित्रपटानंतर आलेली पिढी तरुण झाली असली तरी या चित्रपटाची जादू आजही कायम आहे.

- Advertisement -

या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराने आपल्या व्यक्तिरेखेत जीव ओतला होता. त्यामुळे शाहरुख खान ते अमरीश पुरी यांसारख्या कलाकारांच्या पात्रांची आजही चर्चा होते. या चित्रपटाने केवळ नायक नायिकेचे प्रेमच नाही, तर इतर अनेक नातीही नव्याने परिभाषित केली. बाप-मुलगी आणि बाप-मुलाच्या नात्यातील वेगळे आयाम प्रेक्षकांना पहायला मिळाले. या चित्रपटाची कथा जितकी रंजक आहे तितकेच त्याच्याशी संबंधित किस्सेही रंजक आहेत.

मुळातच DDLJ हा चित्रपट आदित्य चोप्रांनी बनवायचा ठरवलं तेव्हा नायकाच्या भूमिकेत हॉलिवूड स्टार टॉम क्रूझ त्याच्या नजरेसमोर होता असे म्हटले जाते. शिवाय चित्रपटाचे नावही वेगळे होते. ‘द ब्रेव्हहार्ट विल टेक द ब्राइड’ असे ठेवण्यात आले होते, पण आदित्यचे वडील यश चोप्रा यांच्या मनात काही वेगळेच चालू होते. हा चित्रपट रोमँटिक असल्यामुळे आणि भारतीय प्रेक्षकांसाठी बनवायचा असल्याने नायकाच्या म्हणून शाहरुखला घ्यायचे त्यांच्या मनात होते. वडिलांच्या मनधरणीनंतर आदित्य या बदलांसाठी तयार झाला. शाहरुखनेही भूमिका समोर आल्यावर लगेच होकार दिला नाही. आदित्यबरोबर शाहरुखच्या चार बैठकी झाल्या. त्यानंतर शाहरुखने सिनेमा स्वीकारला. त्याने जर नाकारले असते, तर आदित्यपुढे सैफ अली खान हा दुसरा पर्याय उपलब्ध होता, परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते. याच चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख खानला किंग ऑफ रोमान्सची पदवी मिळणार होती!

- Advertisement -

चित्रपटाच्या ‘द ब्रेव्हहार्ट विल टेक द ब्राइड’ या नावात बदल करण्याबद्दलचा खुलासा खुद्द आदित्य चोप्राने यशराज फिल्म्सने प्रकाशित केलेल्या ‘आदित्य चोप्रा रिलिव्ह्स…दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या पुस्तकात केला आहे. त्यात किरण खेर यांनी ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हे नाव सूचित केल्याचे म्हटले गेले आहे. आदित्य चोप्राला DDLJ ची स्क्रिप्ट लिहिण्यासाठी फक्त एक महिना लागला असे म्हटले जाते. यातील शाहरुखने ‘राज’ नावाचे जे पात्र साकारलेआहे, ते शोमन राज कपूरच्या नावावरून घेतले आहे.

या चित्रपटात एक सिन आहे, जो ‘पलट सिन’ म्हणून ओळखला जातो. शाहरुख खानच्या प्रसिद्ध ‘पलट सिन’बद्दल सांगायचे तर तेव्हाच्याच नव्हे, अगदी आजच्या तरुणाईमध्येही त्याचे पडसाद असल्याचे दिसून येते. हा सिन हॉलिवूड चित्रपटापासून प्रेरित होता. 1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या क्लिंट ईस्टवुडच्या अमेरिकन चित्रपट ‘इन द लाइन ऑफ फायर’मधील एका दृश्यावरून याची प्रेरणा मिळाली होती. आदित्य चोप्राला DDLJ बनवत असताना हे दृश्य आठवले ज्यामध्ये अभिनेत्याची मैत्रीण निघून जाते आणि तो तिला वळायला सांगतो. नंतर DDLJ मध्ये त्याने ते चित्रित केले.

चित्रपट इतिहासकार एस एम एम असजा म्हणतात, ‘या चित्रपटाने सामान्य लोकांना, विशेषत: त्या काळातील तरुणांना एक ओळख दिली. त्या तरुणांनी शाहरुखमध्ये स्वतःला पाहिले, जे 80 आणि 90 च्या दशकाच्या सुरुवातीच्या रोमँटिक हिंदी चित्रपटांपेक्षा वेगळे होते. तोपर्यंत रोमँटिक हिरो सुपरहिरो असायचे, जे DDLJ ने तोडले.’ प्रथमच असा एक नायक पडद्यावर पाहायला मिळाला जो नायिकेला पळवून नेऊ शकत असतानाही, तो पर्याय न स्वीकारता, तिच्या वडिलांच्या परवानगीची वाट पाहतो. हा आदर्शवाद त्यावेळी अनेकांना भावला. त्या काळात सलमान खान, आमिर खान आणि शाहरुख खान हे सगळेच रोमँटिक चित्रपट करत होते, मात्र शाहरुख ज्या ऊर्जेने आला, ती ऊर्जा त्याला तरुणाईसोबत जोडण्यास कारणीभूत ठरली.

उमराव जान सारख्या चित्रपटाचे संवाद लिहिणार्‍या जावेद सिद्दिकिंनी DDLJ चे संवाद लिहिले होते. जे लोकांना खूप आवडले. त्यात जावेद सिद्दीकी यांनी तरुणाईची भाषा वापरली होती. आजही हे संवाद अनेकांच्या जिभेवर रेंगाळताना पहायला मिळतात. उदा . “जा सिमरन जा, जी ले अपनी ज़िंदगी” हा डायलॉग तर आयकॉनिक ठरला !

“बड़े बड़े देशों में ऐसी छोटी-छोटी बातें होती रहती है सेनॉरिटा”

“राज, अगर वो तुझसे प्यार करती है तो तुझे पलट के ज़रूर देखगी, पलट-पलट”

“तुम अपनी ज़िंदगी ऐसे लड़के के साथ गुज़ार दोगी जिसे तुम जानती नहीं हो, मिली नहीं हो, जो तुम्हारे लिए बिल्कुल अजनबी है”

“मैं एक हिंदुस्तानी हूं और मैं जानता हूं कि एक हिंदुस्तानी लड़की की इज़्ज़त क्या होती है”

“मेरी मां कहा करती थी कि जो शादी वाले घर में सेवा करता है उसे बहुत सुंदर दुल्हन मिलती है”

हे सारे संवाद जनमानसात प्रसिद्ध तर झालेच शिवाय DDLJ च्या यशामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे, हे नाकारता येणार नाही. जसे संवाद तसेच या चित्रपाटाच्या संगीताचेही झाले. DDLJ मध्ये सात गाणी होती आणि सर्व गाणी सुपरहिट झाली होती. जतिन-ललित यांचे संगीत आणि आनंद बक्षी यांचे गीत प्रचंड यशस्वी ठरले. ही गाणी लता मंगेशकर, आशा भोसले, उदित नारायण, कुमार सानू आणि अमिताभ भट्टाचार्य यांनी गायली आहेत.

एस एम एम असाजा सांगतात, “चित्रपट सुपरहिट होण्यामागे चित्रपटाचे संगीत हे एक मोठे कारण होते. ही गाणीही पाहण्यास अतिशय सुंदर होती. त्यामुळे चित्रपटाला रिलीज होण्यापूर्वीच खूप प्रसिद्धी मिळाली.”

या चित्रपटाचे संगीतकार ललित पंडित म्हणतात, “जर एखादा चित्रपट हिट झाला आणि त्याचे संगीतही तितकेच हिट झाले तर तो चित्रपट आयकॉनिक बनतो.” त्यांचे हे शब्द तंतोतंत खरे ठरले. DDLJची गाणी आता क्लासिकमध्ये गणली जातात. DDLJ हा जतिन-ललितच्या कारकिर्दीचा उच्चांक आहे, जो कधीही मोडू शकत नाही. चित्रपटाच्या कथेने प्रभावित होऊन जतिन-ललित यांनी चित्रपटासाठी होकार दिला होता त्याच्या आणि गाण्यांनी इतिहास रचला !

त्या काळात अनिवासी भारतीय प्रेक्षकांमध्ये हा चित्रपट जास्त लोकप्रिय झाला होता. कारण अनिवासीय भारतीयांमध्ये पंजाबी जास्त होते. यश चोप्रांच्या इतर चित्रपटांप्रमाणे हा चित्रपटही पंजाबी संस्कृतीचा उत्सव साजरा करतो. चित्रपटाचा माहोल, पंजाबी संस्कृती यांचा परिणाम अनिवासी भारतीयांवर होता. यामधील काजोलचे पात्र परदेशात शिक्षण घेते आणि पाश्चात्य कपडे घालते, परंतु जेव्हा सिमरनचे पात्र भारतात येते तेव्हा वधूच्या रूपात भारतीय संस्कृतीशी नातं जोडणारी ठरते. आधुनिक भारतातील मध्यमवर्गीय कुटुंबांची नाळ आजही त्या संस्कृती-परंपरांशी जोडलेली आहेत. हे देखील चित्रपटाशी प्रेक्षकांना जोडण्याचे एक मोठे कारण होते.”

आपली तरुणाई राज आणि सिमरच्या पात्रांशी स्वतःला जोडत असताना, इतर पात्रही आपली छाप सोडत होते. अशा पात्रांमध्ये पूजा रुपारेलने साकारलेली सिमरनची धाकटी बहीण “चुटकी”, मंदिरा बेदीने साकारलेली कुलजीतची बहीण “प्रीती” आणि हिमानी शिवपुरीने साकारलेली ’बुवा’ यांचा समावेश होता.

DDLJ च्या निर्मिती आणि यशानंतर तो अनेक चित्रपटांसाठी प्रेरणा ठरला. रोहित शेट्टीचा ’चेन्नई एक्स्प्रेस’, इम्तियाज अलीचा ’जब वी मेट’, वरुण धवन आणि आलिया भट्टचा ’बद्रीनाथ की दुल्हनिया’ यासह अनेक हिंदी चित्रपटांमध्ये या चित्रपटातील सीन्स वापरण्यात आले आहेत.

एकूणच DDLJ मधील अनेक छोट्यामोठ्या गोष्टी त्याच्या यशामध्ये सहभागी आहेत, परंतु शाहरुख खान आणि DDLJ हे एक अतूट समीकरण आहे. म्हणूनच आज शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त DDLJ पुन्हा एकदा प्रदर्शित करावासा वाटतोय. या चित्रपटापूर्वी शाहरुख खान ‘दिवाना’, ‘डर’, ‘बाजीगर’ यांसारख्या चित्रपटांमुळे प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाला होता पण या चित्रपटाने शाहरुख खानच्या करियरला एक मोठी कलाटणी दिली. त्याला ‘रोमँटिक हिरो’ ही त्याची खरी ओळख DDLJ ने मिळवून दिली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -