Defamation Case: शिल्पा शेट्टी मानहानी प्रकरण, माध्यमांच्या रिपोर्टिंगवर हायकोर्टचे मत आले समोर

bombay high court what said in shilpa shetty defamation case
Defamation Case: शिल्पा शेट्टी मानहानी प्रकरण, माध्यमांच्या रिपोर्टिंगवर हायकोर्टाचे मत आले समोर

पॉर्न फिल्मप्रकरणातील अडचणीत वाढ होत असतानाच काल, गुरुवारी अभिनेत्री शिल्पा शेट्टीने २९ पत्रकार आणि माध्यमांविरोधात मानहानी केल्याची याचिका हायकोर्टात दाखल केली. या याचिकेवर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी होत आहे. सुनावणी दरम्यान हायकोर्ट म्हणाले की, ‘जर सुत्रांद्वारे माध्यम बातमी देत असेल तर ते चुकीचे नाही आहे. तसेच तुमच्या क्लाईंटच्या पती विरोधात एक खटला आहे आणि यामध्ये कोर्ट कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करणार नाही. तुमचा क्लाईंट कोणीही असो, मानहानीसाठी एक कायदा आहे.’

हायकोर्टात शिल्पाचे वकील म्हणाले की, ‘माध्यम जे वार्तांकन करत आहे, त्याचe परिणाम तिच्या मुलांवर होत आहे.’ यावर कोर्ट म्हणाले की, ‘कोर्टाने स्वतः बसून प्रत्येक बातमी आणि माध्यमाचा स्रोत काय आहे याचा तपास करावा, अशी तुमची इच्छा आहे का? पोलिसांच्या सुत्रांनुसार बातम्या करणे, मानहानी नाही आहे.’

हायकोर्ट नेमके काय म्हणाले?

आज सुनावणी दरम्यान हायकोर्ट म्हणाले की, ‘तिला पश्चाताप झाला आहे की नाही हे आम्हाला माहित नाही. याबाबत आम्ही काही म्हणत नाही. परंतु तपासादरम्यान क्राईम ब्रांच किंवा पोलीस काही म्हणत आहे, त्याचे रिपोर्टिंग करणे हे मानहानी होऊ शकत नाही. याप्रकरणात ज्यांना आरोपी केले आहे, त्यांना संधी मिळाली पाहिजे. यावर शिल्पाचे वकील म्हणाले की, माध्यमाचे काही लोकं राज कुंद्रा प्रकरणात तिची आई, मुलं आणि कुटुंबांचे नाव घेत आहेत. एका युट्यूब युजरचा व्हिडिओ शिल्पाच्या वकीलांनी सादर केला. हायकोर्ट म्हणाले की, आपण ज्या गोष्टीची अपेक्षा करत आहात त्याचा पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर खूप गंभीर परिणाम होईल.

दरम्यान शिल्पाने या याचिकेद्वारे माध्यमांवरील प्रतिमा मलीन करणाऱ्या बातम्यांना आळा घालण्याची मागणी केली आहे. या याचिकेत अनेक उदाहरण शिल्पाने दिली आहेत. पॉर्न फिल्मप्रकरणात तिचा सहभाग असल्याबाबत आणि तिने याप्रकरणाच्या तपासावर प्रतिक्रिया दिल्याबाबतच्या चुकीच्या बातम्यांचे उदाहरण तिने सादर केले आहेत. याचिकेद्वारे शिल्पाने माध्यमाकडे माफीची मागणी केली असून २५ कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यास सांगितले आहे. तसेच बदनामी करणाऱ्या बातम्या सर्व ताबडतोब काढून टाकाव्यात, अशी विनंती याचिकेच्या माध्यमातून केली आहे.