Homeमनोरंजन'भाऊ सापडण्या'चा अनुभवसिद्ध रंजक प्रवास!

‘भाऊ सापडण्या’चा अनुभवसिद्ध रंजक प्रवास!

Subscribe

अभिनेता म्हणून जडणघडण होत असताना अगदी महाविद्यालयीन जीवनापासून या प्रवासात संपर्कात आलेले लेखक, दिग्दर्शक, निर्माते, सहकारी, सहकलावंत, तंत्रज्ञ या सर्वांचाच असलेला महत्त्वाचा वाटा डॉक्टर गिरीश ओक अध्याहृत करतात आणि त्याचवेळी काही न पटलेल्या गोष्टींबद्दलही तितक्याच ठळकपणाने ते आपली मतं मांडतात.

श्रीनिवास नार्वेकर


डॉ. गिरीश ओक हे नाव मराठी रंगभूमीला आणि मालिका क्षेत्राला – थोडक्यात एकूणच मराठी रसिकाला – नवीन नाही. आपल्या समर्थ अभिनयाने, स्वच्छ स्पष्ट आणि खणखणीत वाणीने आणि दर्जेदार भूमिकांनी डॉ. ओक यांनी मराठी रसिकांच्या मनात आपले स्थान बळकट केले आहे. सुमारे 40 वर्षांच्या धडपडीच्या आणि समर्थपणे उभे राहण्याच्या प्रवासाचा लेखाजोखा डॉ. ओक यांनी “तो कुणी माझ्यातला” या आत्मकथनपर गप्पांच्या पुस्तकात मांडला आहे. लेखक-दिग्दर्शक आणि अभ्यासक श्रीनिवास नार्वेकर यांनी याच पुस्तकाचा घेतलेला धांडोळा…


बऱ्याच काळानंतर एका रात्रीत एका बैठकीत वाचून काढलेलं डॉ. गिरीश ओक यांचं हे आत्मकथन! अर्थात आत्मकथन असलं तरी हे कोणत्याही प्रकारे आत्मचरित्र नाही, तसं काही मांडण्याचा त्यांचा उद्देशही नाही. आपल्या ओघवत्या, सहज अभिनयाप्रमाणे आणि स्पष्ट नि स्वच्छ शब्दोचारांप्रमाणेच डॉ. ओकांचं हे आत्मकथन अगदी ओघवतं, सहज, स्पष्ट नि स्वच्छ आहे.

नागपूरपासून मुंबईपर्यंतचा आणि त्यानंतरचा धडपडीच्या काळापासून स्थिरस्थावर होण्याच्या आजपर्यंतचा काळ, त्या काळाचा प्रवास अगदी प्रामाणिकपणाने डॉक्टरांनी यामध्ये मांडला आहे. संजय मोने यांनी आपल्या मनोगतात म्हटल्याप्रमाणे गेल्या 30-35 वर्षांतल्या बदलत्या रंगभूमीवर आलेल्या लेखक-दिग्दर्शक आणि सहकलाकारांचा धांडोळा या आत्मकथनाच्या निमित्ताने नक्कीच अवगत करता येतो. शब्दांकनकार शिरीष देखणे यांना डॉक्टरांनी त्या त्या वेळी करून पाठवलेल्या ऑडिओमुळे असेल कदाचित, पण त्यामुळे अगदी समोर बसून आपल्यासोबत करत असलेल्या गप्पांप्रमाणे या आत्मकथनाची मांडणी झाली आहे. या सहज गप्पांमधला नेमका भाव शब्दांकनकार शिरीष देखणे यांनी या लेखनामध्ये उतरवला आहे.

अभिनेता म्हणून जडणघडण होत असताना अगदी महाविद्यालयीन जीवनापासून या प्रवासात संपर्कात आलेले लेखक, दिग्दर्शक, निर्माते, सहकारी, सहकलावंत, तंत्रज्ञ या सर्वांचाच असलेला महत्त्वाचा वाटा डॉक्टर अध्याहृत करतात आणि त्याचवेळी काही न पटलेल्या गोष्टींबद्दलही तितक्याच ठळकपणाने ते आपली मतं मांडतात.

डॉक्टर “भाऊ सापडणे” नेमकं कशाला म्हणतात हे इथे सांगण्यापेक्षा पुस्तक वाचताना कळणं अधिक गंमतीचं आणि तितकंच महत्त्वाचं आहे. या आत्मनिवेदनातलं अखेरचं प्रकरण “भूमिका साकारताना” आजच्या नव्या (किंवा अभिनयेच्छुक) कलावंतांसाठी फार महत्त्वाचं आहे. सहज इथल्या तिथल्या किंवा सहकाऱ्यांच्या गोष्टी सांगतानाही कोणताही उपदेशाचा आव न आणता डॉक्टर बरंच काही सांगून जातात, त्या दृष्टीनेही मला हे कथन फार महत्त्वाचं वाटतं. “भाऊ सापडण्या”चा शोध प्रत्येक कलाकारासाठी महत्त्वाचा आहेच. त्यासाठी या सगळ्या प्रवासाकडे, प्रक्रियेकडे गंभीरपणाने पाहण्याचीही गरज आहे.

थोडक्यातल्या पण नेमक्या आणि महत्वपूर्ण ऐवजाबद्दल (आणि दस्तावेजाबद्दलही) डॉ. गिरीश ओक यांचे आभार मानावे तेवढे कमीच. हा फार महत्त्वपूर्ण ठेवा आहे हा आजच्या नवीन रंगकर्मींसाठी. अभ्यास म्हणूनही आणि दस्तावेज म्हणूनही.

पुस्तकाची निर्मितीही छान झाली आहे. रवी मुकुल यांच्या मुखपृष्ठ व मांडणीबद्दल अधिक काय बोलावं? नेहमीप्रमाणेच उत्तम… पुढल्या पुस्तकाची आणि त्याबरोबरच गंगाराम गवाणकर यांनी आणि अधिक पुढे जाऊन विजय केंकरे यांनी म्हटल्याप्रमाणे “लेखक, दिग्दर्शक आणि प्रमुख भूमिका : डॉ. गिरीश ओक” अशी जाहिरात असलेल्या नाटकाची आम्ही सर्वच रसिक वाट पाहत आहोत.