माधुरीची ‘बकेट लिस्ट’ हाऊसफुल्ल!

Bucket-List movie poster
'बकेट लिस्ट' चे पोस्टर

बॉलिवूडची डान्सिंग दिवा माधुरीचा मराठी सिनेमा ‘बकेट लिस्ट’ येत्या फिल्मी फ्रायडेला रिलीज होतोय. मराठीतला माधुरीचा हा पहिलाच सिनेमा असल्यामुळे माधुरीच्या चाहत्यांमध्ये सिनेमाची उत्सुकता आहे. या सिनेमाच्या उत्सुकतेपोटीच माधुरीच्या फॅन्सनी तिची ‘बकेट लिस्ट’ हाऊसफुल्ल केली आहे. ५ वर्षानंतर सिनेमातून माधुरी पुन्हा एकदा झळकणार असून मराठी सिनेमात ती दिसणार असल्याचा आनंद तिच्या फॅन्समध्ये अधिक आहे.

रिलीज पूर्वीच हाऊसफुल्ल!

‘बकेट लिस्ट’ रिलीज व्हायला आता फक्त एकच दिवस उरला आहे. तुम्ही या सिनेमाची तिकिटं काढली नसतील तर थांबा! कारण, माधुरीच्या फॅन्सनी अनेक ठिकाणी थिएटर्स हाऊसफुल्ल केली आहेत. सिनेमाच्या शोचे प्री बुकिंग केल्यामुळे अनेक सिनेमागृहांबाहेर हा सिनेमा ‘हाऊसफुल्ल’ असल्याचं कळत आहे. ‘बकेट लिस्ट’ या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन तेजस प्रभा विजय देऊस्कर यांनी केलं आहे तर या कथेचं सहलेखन देवश्री शिवडेकर यांचे आहे.

पूजा आणि निशा दिसणार एकत्र

तुम्ही नाव ऐकून कदाचित गोंधळला असाल. पण माधुरीने साकारलेली निशा कोणीच विसरु शकत नाही. ‘हम आपके है कौन’ या सिनेमामध्ये रेणुका शहाणे आणि माधुरीने पूजा आणि निशाची भूमिका साकारली होती. या दोघी या सिनेमातून पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वी ‘बकेट लिस्ट’ या सिनेमाच्या सेटवर या दोघी ‘लो चली मैं’च्या तालावर थिरकल्या होत्या. आता त्या एकत्र पुन्हा दिसणार हे समजल्यामुळे ‘धकधक गर्ल’चे फॅन्स आणखीनच खूश झालेत.

(‘लो चली मैं’च्या तालावर थिरकल्या माधुरी आणि रेणुका)

बकेटलिस्टची चर्चा

माधुरी एखाद्या सिनेमात कॅमिओ रोलमध्ये जरी असली, तरी तो सिनेमा चर्चेत येतो. २०१३ साली तिने ‘ये जवानी है दिवानी’ या सिनेमात ‘घागरा’ गाण्यांवर ठेका धरला होता. त्यानंतर आता थेट २०१८ मध्ये ती नवा सिनेमा करत आहे आणि तोही मराठी! त्यामुळे ‘तमाम दिलो की धकधक’ असलेल्या माधुरीच्या ‘बकेटलिस्ट’ची चर्चा होणे स्वाभाविकच आहे.