HomeमनोरंजनCharlie Chaplin : चार्ली चॅप्लिन... द ग्रेट अ‍ॅक्टर

Charlie Chaplin : चार्ली चॅप्लिन… द ग्रेट अ‍ॅक्टर

Subscribe

प्रेक्षकांच्या चेहर्‍यावर निखळ हास्य खुलवणारा चार्ली चॅप्लिन आजही जगभरात सर्वांना ठाऊक आहे. वास्तविक तो मूकपटांचा बादशहा होता. तरीही त्याचे चित्रपट आवर्जून पाहिले जातात, त्यावर आजही समीक्षा लिहिली जाते. आजही चार्ली चॅप्लिन सर्वांचा लाडका आहे. २५ डिसेंबर १९७७ रोजी येशूने त्याला बोलावून घेतले. याला आता ४७ वर्षे झाली आहेत, मात्र चार्लीच्या लोकप्रियतेत तसूभरही फरक पडलेला नाही. आजही जगभरातील विनोदवीरांना चार्ली त्यांचा आदर्श वाटतो, यातूनच चार्ली काय चीज होती हे लक्षात येते.

– अविनाश चंदने –

हसून हसून पोट दुखणे म्हणजे काय असते हे अनुभवायचे असेल तर चार्ली चॅप्लिनचा कुठलाही चित्रपट पाहा. जगाला पोट दुखेपर्यंत हसवणार्‍या चार्ली चॅप्लिनला आजही कुणी विसरलेला नाही. गंमत पाहा चार्लीचा काळ मूकपटांचा होता. त्यामुळे केवळ अभिनयातून त्याने सर्वांच्या चेहर्‍यावर हास्य फुलवले होते, आनंद दिला होता. आजही चार्ली चॅप्लिनचे नाव घेतले तरी नकळत चेहरा आनंदाने फुलतो. चित्रपट बोलू लागल्यानंतर भाषा हा चित्रपटाचा आत्मा झाला.

हे लक्षात घेतले तर संवादाशिवाय केवळ देहबोली आणि चेहर्‍यावरील हावभावाने प्रेक्षकांना हसवणे आणि हसवता हसवता कारुण्याची झलक दाखवण्याची जबरदस्त किमया त्याकाळी चार्ली चॅप्लिनने केली होती. अशा या चार्लीने २५ डिसेंबर १९७७ रोजी जगाचा निरोप घेतला. 47 वर्षांनंतरही चार्लीला लोक विसरू शकले नाहीत आणि येणारी नवी पिढीही चार्लीकडे आकर्षित होते. एवढी लोकप्रियता क्वचितच कुठल्या कलाकाराला मिळाली असेल.

चार्ली चॅप्लिनचा जन्म 16 एप्रिल 1889 रोजी लंडनमध्ये झाला. अभिनय त्याच्या रक्तातच भिनला होता. कारण त्याचे आईवडील रंगभूमी कलाकार होते. चार्ली अवघ्या 12 वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचा व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे मृत्यू झाला होता. तत्पूर्वी त्याचे आईवडील वेगळे झाले होते. त्यामुळे सर्व जबाबदारी आईवर आली होती.

म्हणतात ना संकटे आली की एकापाठोपाठ येतात, तसेच झाले. चार्लीच्या आईचा आवाज गेला. रंगभूमीवरील कलाकाराचा आवाज गेला तर उरले काय? त्यामुळे चार्लीच्या आईला रंगभूमीवरून जिवंतपणीच एक्झिट घ्यावी लागली आणि पोटासाठी कष्टाची कामे करण्याची वेळ तिच्यावर आली. त्या परिस्थितीतही चार्लीला अभिनयाचे वेड लागले आणि ते कधीही सुटले नाही. म्हणूनच जगाला एक मोठा कलाकार पाहता आला.

चार्लीचे बालपण खूप कष्टात गेले. तरीही त्याने रंगभूमीवर लहानमोठी कामे करणे सुरूच ठेवले. हळूहळू रंगभूमीवर त्याला ओळख मिळू लागली होती. पुढे त्याला मूकपटाचे आकर्षण वाटू लागले. अभिनयाचे भूत चार्लीच्या डोक्यात इतके भिनले होते की तो मूकपटांमध्येही लोकप्रिय झाला. 1910 मध्ये तो पहिल्यांदा अमेरिकेला गेला. त्यानंतर त्याचे अमेरिकेला जाणे-येणे वाढू लागले. पुढे तो अमेरिकेचा बनला म्हणजे अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले. लंडन ही चार्लीची जन्मभूमी तर अमेरिका ही त्याची कर्मभूमी ठरली. 1914 ते 1967 ही 53 वर्षे चार्ली चॅप्लिन मूकपटाचा बेताज बादशहा होता. त्याचे सर्व चित्रपट त्याकाळी सुपरडुपर हिट झाले.

चार्ली चॅप्लिन असे नाव जरी उच्चारले तरी डोळ्यांसमोर एक प्रतिमा उभी राहते. डोक्यावर हॅट, हातात केन काठी, ते ढगळपगळ कपडे आणि ती हिटलरछाप मिशी! चार्ली पडद्यावर कायम निरागस दिसायचा. त्याच्या चेहर्‍यावर कायम करुण भाव असायचे. त्यामुळे प्रेक्षकांना खळखळून हसवताना प्रेक्षकांच्या डोळ्यांच्या कडा तो कधी ओल्या करायचा कळतही नव्हते आणि चार्लीला हे अगदी सहज जमायचे. त्याच्या निरागस अभिनयातून जे प्रेक्षकांपर्यंत पोहचायचे त्याला संवादाची कधी गरजच भासली नाही. तो इतका अस्सल कलावंत होता.

अगदी पाच वर्षांचा असताना चार्लीने रंगभूमीवर पहिले पाऊल ठेवले. त्याची आई नाटकात काम करीत असताना अचानक गाणे विसरली. त्यामुळे प्रेक्षक चलबिचल झाले. काही वेळातच त्यांचा आरडाओरडा सुरू झाला. हे पाहून विंगेत बसलेल्या चार्लीला राहवले नाही. तो पटकन स्टेजवर आला आणि आईच्या हातातील माईक हातात घेऊन आईने सुरू केलेले गाणे तो गाऊ लागला. एवढ्या छोट्या मुलाचे रंगभूमीवरील हे धाडस पाहून प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटासह त्याचे कौतुक केले.

हेच चार्लीचे रंगभूमीवरील पहिले पाऊल होते. मेकिंग अ लिव्हिंग… हा चार्ली चॅप्लिनचा पहिला चित्रपट. त्यानंतर त्याने प्रेक्षकांना आपलेसे केले ते कायमचेच! पुढे तो लिहू लागला म्हणजे लेखक बनला. अभिनेता होताच दिग्दर्शकही बनला. निर्माताही झाला. त्याचा सहज सुंदर अभिनय, नैसर्गिक देहबोलीतून निर्माण झालेला अस्सल विनोद आणि भावनाप्रधान होण्याचे त्याचे कसब हे सारे अफलातून होते. त्यातूनच चार्ली जगभरातील सामान्य माणसांचा हिरो बनला तो आजतागायत.

मूकपटांचा सुपरस्टार

मूकपटांचा बादशहा ही चार्ली चॅप्लिनची खरी ओळख. द किड, सर्कस, द ग्रेट डिक्टेटर, पोलीस असे काही चित्रपट पाहिले की मूक अभिनय काय असतो याची जाणीव होते. त्याने देहबोलीतून जे दाखवले ते हजारो संवादांच्या पलीकडले होते. लाईमलाईट, ट्वेन्टी मिनिटस् ऑफ लव्ह, द गोल्ड रॅश, मॉडर्न टाइम्स, अ वूमन, इन द पार्क, अ बिझी डे, हिज फेव्हरेट पास्ट टाइम्स हे आणि असे त्याचे अनेक चित्रपट जगभर गाजले.

द किड, पोलीस, सीटीलाईट्स, द ग्रेट डिक्टेटर आणि द सर्कस या सिनेमांनी चार्लीला तुफान लोकप्रियता आणि पैसा मिळवून दिला. चार्लीने कायम सामान्य माणसाचे प्रतिनिधित्व केले. प्रेक्षकांनी कायम स्वत:ला चार्लीमध्ये पाहिले. म्हणूनच रस्त्यावरच्या मुलाला आधार देणारा ‘द किड’मधला चार्ली लोकांना भावला आणि ‘द ग्रेट डिक्टेटर’मधील त्याची हिटलरसारखी भूमिकाही तेवढीच गाजली. चार्लीच्या या लोकप्रियतेपर्यंत आजही कुणी पोहचू शकलेला नाही यातच त्याचे यश आहे.

स्टाईल स्टेटमेंट

असे असले तरी चार्लीच्या यशात पूरक ठरली ती त्याची स्टाईल स्टेटमेंट! हॅट, स्टीक, गबाळी पॅन्ट आणि मिशी ही चार्लीची कपड्यांची स्टाईल जगभरात लोकप्रिय आहे. डोक्यावर हॅट, हातात केनची काठी, अंगावर चढवलेला कळकट मळकट ब्लेझर आणि घातली म्हणण्यापेक्षा कमरेत खोचलेली ढगळपगळ पॅन्ट म्हणजे चार्ली चॅप्लिन. हॅट आणि केन स्टीकशिवाय चार्ली चॅप्लिनची कल्पनाच करता येत नाही.

डाव्या हाताने केनची काठी फिरवून उजव्या हाताने हॅट काढत आदबीने वाकणे हे फक्त आणि फक्त चार्लीनेच करावे. चार्ली इतक्या सहजतेने हे करायचा की तीच पुढे त्याची ओळख बनली. या ओळखीला एक महत्त्वाची गोष्ट चिकटली ती म्हणजे मिशी. हिटलरछाप मिशीने चार्लीच्या स्टाईल स्टेटमेंटला चार चांद लावले. जी मिशी जर्मनीच्या हिटलरच्या चेहर्‍यावर कठोर दिसायची तीच मिशी चार्लीच्या चेहर्‍यावर अत्यंत निरागस वाटायची. चार्लीच्या निरागसतेमध्ये या मिशीचा उल्लेख टाळता येणार नाही.

आता एवढा मोठा कलाकार म्हटल्यावर चार्लीला किती ऑस्कर मिळाले, असा प्रश्न कुणीही विचारेल. प्रत्यक्षात चार्लीला ऑस्कर एकदाच मिळाले तेही जीवन गौरव म्हणून. ब्रिटिश सरकारने चार्लीचा ‘सर’ किताब देऊन सन्मान केला होता. तीन घटस्फोटांनंतर चार्लीचे चौथे लग्न शेवटपर्यंत टिकले. ब्रिटनमधून अमेरिकेचा नागरिक झालेला चार्ली अखेरच्या टप्प्यात स्वित्झर्लंडमध्ये स्थिरावला होता. तो नाताळचा दिवस होता. जगभरात प्रभू येशूच्या जन्माचा आनंद साजरा होत असताना येशूने चार्लीलाच त्याच्या घरी बोलावले. 25 डिसेंबर 1977 या दिवशी वयाच्या 88 व्या वर्षी चार्लीने झोपेतच चाहत्यांना अलविदा केला.

शवपेटी गायब

चार्लीच्या मृत्यूनंतर अघटित घडले होते. मृत्यूनंतर चार्लीचे पार्थिव शवपेटीसह गायब झाले होते. ही बाब उघडकीस आली ती चोरांच्या फोनमुळे. या चोरांनी चार्लीच्या पत्नीला फोन करून चार्लीच्या शवपेटीच्या बदल्यात चार्लीच्या पत्नीकडे मोठ्या रकमेची मागणी केली होती. अखेर स्वित्झर्लंड पोलिसांनी या चोरांचा शोध घेण्यासाठी सर्व टेलिफोन बूथवर सापळे रचले आणि चोरांना अटक केली, मात्र चार्लीच्या शवचोरीची चर्चा झाली नाही. चार्ली चॅप्लिनला आपल्यातून जाऊन 47 वर्षे झाली. आजही रंगभूमी आणि छोट्या-मोठ्या पडद्यावरील कलाकार त्याचे चित्रपट बारकाईने पाहतात यातच त्याच्या यशाचे गुपित लपलेले आहे. म्हणूनच भविष्यात महान अभिनेत्यांचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा त्यात चार्ली चॅप्लिन नक्कीच पहिल्या क्रमांकावर असेल, एवढे मात्र नक्की!