Wednesday, March 19, 2025
27 C
Mumbai
HomeमनोरंजनChhaava Director Laxman Utekar : छावावर शिर्केंच्या वंशजांनी आक्षेप घेतल्यावर उतेकरांनी दिले स्पष्टीकरण

Chhaava Director Laxman Utekar : छावावर शिर्केंच्या वंशजांनी आक्षेप घेतल्यावर उतेकरांनी दिले स्पष्टीकरण

Subscribe

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय. रिलीजनंतर दहाव्या दिवशीसुद्धा हा सिनेमा बऱ्याच ठिकाणी हाऊसफुल सुरु आहे. दरम्यान, राजेशिर्के घराण्याच्या वंशजांनी या सिनेमातील काही दृश्यांवर आक्षेप घेतला आहे. ‘छावा’ सिनेमात इतिहासाची मोडतोड केली आहे. कोणताही ऐतिहासिक पुरावा नसताना राजेशिर्केंची बदनामी केली, असे म्हणत त्यांनी अब्रूनुकसानीचा 100 कोटींचा दावा ठोकणार असे पत्रकार परिषदेत म्हटले होते. यावर आता दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांची प्रतिक्रिया समोर आली आहे. (Chhaava Director Laxman Utekar apologize descendants of shirke family)

एका मराठी वृत्तवाहिनीसोबत संवाद साधतेवेळी उतेकर म्हणाले, ‘आदरणीय भूषणजी (महाराणी येसूबाईंचे वंशज) सर्वांत आधी तुमचा फोन मी नेटवर्कमध्ये नसल्यामुळे उचलू शकलो नाही… यासाठी सॉरी. पण, तुमची पत्रकार परिषद मी पाहिली आणि तुमचा मेसेजदेखील वाचला. सगळ्यात आधी नकळत तुमच्या भावना दुखावल्या असतील तर मी तुमची माफी मागतो. तुमच्या मॅसेजला मी प्रामाणिकपणे उत्तर देऊ इच्छितो. सर, सिनेमाच्या सुरुवातीला एक डिस्क्लेमर येतो ज्यात नमूद केलंय की, हा सिनेमा ‘छावा’ कादंबरीवर आधारित आहे. ही कादंबरी शिवाजी सावंत यांनी लिहिली आहे. ते पुस्तक आजही सर्वत्र उपलब्ध आहे’.

‘शिवाय महाराजांवर जी मालिका सुरू होती, त्यातसुद्धा नावासकट तसंच दाखवलं होतं. या सिनेमात मी त्यांचं आडनाव, गाव असं काहीच दाखवलेलं नाही. गणोजी आणि कान्होजी या सिंगल नावांनीचं उल्लेख केलाय. त्यांचं आडनाव काय आहे हे आपण अजिबात दाखवलेलं नाही. ही खबरदारी आपण नक्कीच घेतलीये. कारण, मला कुणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या. पैसे कमावण्यासाठी हा सिनेमा बनवण्याची मला गरजंच नव्हती साहेब. माझ्याकडे इतर खूप विषय होते, जे भरपूर पैसे कमावून देऊ शकतात. पण या सिनेमासाठी आमची पूर्ण टीम, मी, निर्माते दिनेश विजन सगळ्यांनीचं रात्रंदिवस मेहनत घेतली आहे. आम्ही गेली ४ वर्ष मेहनत घेऊन हा सिनेमा बनवला. आपले छत्रपती संभाजी महाराज काय होते हे आपल्या जगाला कळावं, एव्हढाच काय तो हेतू’.

‘या सिनेमातून छत्रपती संभाजी महाराजांवर केलेलं गढूळ लिखाण पुसण्याचा प्रयत्न केला. आपले राजे काय होते? हे लहान मुलांनासुद्धा कळायला हवं हा प्रयत्न होता. पैसे कमावण्यासाठी इतर खूप विषय आहेत.. पण हा विषय पैसे कमावण्यासाठी नव्हता. आपल्या महाराजांचा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न होता. तरी पुन्हा एकदा भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो आणि हेच सांगेन की, चित्रपटात कुठेही शिर्के या आडनावाचा उल्लेख केलेला नाही. ना गावाचा उल्लेख केलाय. ‘छावा’मध्ये असं काहीचं नाहीये… पण तरीही तुम्हाला काही वाटलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो’.

हेही पहा –

Akshay Kumar : महाकुंभात पोहोचला अक्षय कुमार, त्रिवेणी संगमावर केले पवित्र स्नान