सध्या सगळीकडे ‘छावा’ सिनेमाची हवा आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित हा सिनेमा 14 फेब्रुवारी 2025 रोजी प्रदर्शित झाला. आठवड्याभरात या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 200 कोटींपेक्षा जास्त कमाई करून रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. या सिनेमात अभिनेता विकी कौशल, अक्षय खन्ना, अभिनेत्री रश्मिका मंदाना या कलाकारांनी आपल्या भूमिका अतिशय उत्तम साकारल्या आहेत. प्रेक्षकही त्यांच्या अभिनयाचे कौतुक करत आहेत. दरम्यान, या सिनेमातील ‘कवी कलश’ हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्याचेदेखील विशेष कौतुक केले जात आहे. आज आपण या कलाकाराविषयी जाणून घेऊया. (Chhaava Fame Vineet Kumar Singh left career as doctor to become actor of Bollywood)
अभिनयाच्या आवडीपोटी सोडली डॉक्टरकी
‘छावा’ सिनेमातील कवी कलश हे अत्यंत महत्वाचे ऐतिहासिक पात्र आहे. कारण, कवी कलश हे केवळ पात्र नव्हे तर छत्रपती संभाजी महाराज यांचे जवळचे मित्र होते. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना कैद केले होते. शेवटच्या क्षणापर्यंत कवी कलश शंभूराजांसोबत होते. औरंगजेबाने त्यांचीही निर्घृण हत्या केली होती.
View this post on Instagram
दरम्यान, ‘छावा’मध्ये कवी कलश हे पात्र अभिनेता विनीत कुमार सिंहने साकारले आहे. आपल्या दमदार अभिनयातून त्याने या भूमिकेला योग्य तो न्याय दिला आहे. फार कमी लोक जाणतात की, विनीत पेशाने डॉक्टर आहे. केवळ अभिनयाच्या आवडीपोटी त्याने डॉक्टरकी सोडली आणि ॲक्टर बनला.
आता मला कुणी अंडररेटेड अभिनेता म्हणणार नाही
गेली २२ वर्ष तो अभिनय क्षेत्रात आपले नशीब आजमावत आहे. पण ‘छावा’ सिनेमातून त्याला खरी ओळख मिळाली. या सिनेमात त्याने ‘कवी कलश’ ही भूमिका अगदी जीव ओतून साकारली आहे. सिनेमातील शेवटचा सीन शंभूराजे आणि कवी कलशवर चित्रीत केला गेलाय. जो पाहून प्रेक्षकांचे डोळे भरून आले.
View this post on Instagram
गेल्या 22 वर्षांच्या कारकिर्दीत विनीतला जितके यश आणि प्रेम मिळाले नाही तेव्हढे ‘छावा’ने मिळवून दिले. ‘छावा’च्या यशानंतर विनीत सिंह आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाला, ‘चांगलंय, आता कोणी मला माझं नाव विचारणार नाही आणि मला अंडररेटेड अभिनेता म्हणणार नाही’.
मेडिकल कॉलेजमध्ये टॉपर, बास्केटबॉल चॅम्पियन
अभिनेता विनीत कुमार सिंह हा मूळचा उत्तर प्रदेशचा आहे. तो सीपीएमटी क्वालिफाईड असून मेडिकल कॉलेजमध्ये टॉपर राहिलाय. शिवाय तो मेडिकल प्रॅक्टिशनरदेखील आहे. माहितीनुसार, त्याने आर.ए. पोद्दार आयुर्वेद वैद्यकीय मेडिकल कॉलेजमधून आयुर्वेद, मेडिसीन आणि सर्जरी यात डिग्री घेतली आहे. पुढे नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून त्याने आयुर्वेदात एमडी पदवी घेतली. अभिनेता, डॉक्टर यासोबतच विनीत राष्ट्रीय स्तरावरील बास्केटबॉल चॅम्पियनदेखील आहे.
मांजरेकरांसोबत काम
मुंबईत ‘सुपरस्टार टॅलेंट हंट’मध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या विनीतने विजेतेपद जिंकले आणि पुढे महेश मांजरेकरांनी त्याला ‘पिताह’ सिनेमात काम दिले. यामध्ये संजय दत्त मुख्य भूमिकेत होता. यानंतर विनीतने मांजरेकरांच्या ‘विरुद्ध’ आणि ‘देह’ या सिनेमांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले.
View this post on Instagram
पण विनीतला अभिनेता व्हायचं होतं आणि म्हणून त्याने 2007 मध्ये दिग्दर्शन सोडून अभिनयावर लक्ष केंद्रित केले. त्यानंतर काही भोजपुरी मालिका आणि सिनेमे केल्यांनतर तो ‘सिटी ऑफ गोल्ड’ या हिंदी- मराठी चित्रपटात झळकला.
विनीतची कारकीर्द
विनीतने अनुराग कश्यपच्या ‘गँग्स ऑफ वासेपूर’ सिनेमात ‘दानिश खान’ची भूमिका साकारली होती. यानंतर ‘अगली’, ‘बॉम्बे टॉकीज’ सारख्या सिनेमांमध्येही त्याने काम केले. ‘बॉलीवूड डायरीज’, ‘मुक्काबाज’, ‘आधार’, ‘सांड की आँख’, ‘गोल्ड’, ‘गुंजन सक्सेना’ आणि ‘दास देव’सारख्या सिनेमांमध्ये काम केल्यानंतर ‘मुक्काबाज’ त्याच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरला. या सिनेमासाठी त्याला ‘क्रिटिक्स चॉइस फिल्म अवॉर्ड्स 2019’ मध्ये ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ म्हणून पुरस्कार मिळाला. तसेच त्याला 64 व्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये ‘बेस्ट ॲक्टर क्रिटिक्स’साठी नामांकनदेखील मिळाले होते.
हेही पहा –