बहुप्रतीक्षित सिनेमा ‘छावा’ आता रिलीजसाठी सज्ज झाला आहे. येत्या आठवड्यात 14 फेब्रुवारी रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तत्पूर्वी सर्वत्र सिनेमाबाबत सुरू असलेल्या वेगवेगळ्या चर्चा प्रेक्षकांची उत्सुकता वाढवताना दिसत आहे. दरम्यान, काही तासांपूर्वी या सिनेमातील नवे गाणे प्रदर्शित झाले. ज्या गाण्यासाठी मराठी लेखक, गायिका आणि कलाकारांचे मोठे योगदान आहे. लक्ष्मण उतेकर यांच्या ‘छावा’ सिनेमातील ‘जाने तू’ या गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभल्यानंतर आता ‘आया रे तुफान’ गाण्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. (Chhaava Movie New Song Aaya Re Tufan Released)
मराठी लेखकाचे बोल अन मराठीच गायिकेचा आवाज
‘छावा’ सिनेमासाठी ए.आर.रेहमान यांनी साउंड ट्रॅक तयार केले आहेत. त्यामुळे गाणी हिट होणार यात शंका नाही. मात्र, विशेष बाब सांगायची म्हणजे या गाण्यांसाठी मराठी कलाविश्वातील कलाकारांचे मोठे योगदान आहे. ‘आया रे तुफान’ या गाण्याचे बोल मराठी लेखक क्षितिज पटवर्धनने लिहिले आहेत. तर या गाण्याला मराठमोळी गायिका वैशाली सामंतच्या आवाजाने संगीतबद्ध करण्यात आले आहे. या गाण्यात छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यातील क्षण दाखवण्यात आला आहे. शिवाय या गाण्यातून मराठ्यांचा मुघलांशी संघर्ष दर्शवणारी काही दृश्येदेखील दाखवली आहेत.
मराठी कलाकारांची तगडी फौज
या संपूर्ण गाण्याची आणखी एक खास बाब म्हणजे, या गाण्यातून सिनेमात काम करणाऱ्या बऱ्याच मराठी कलाकारांची झलक पाहायला मिळतेय. या सिनेमात अनेक मराठी कलाकार महत्वाच्या भूमिकेतून आपल्या भेटीस येत आहेत. ज्यामध्ये अभिनेता संतोष जुवेकर ‘रायाजी’ ही भूमिका साकारताना दिसेल. या गाण्यात राज्याभिषेक सोहळ्यादरम्यान रायाजी भावुक होताना पहायला मिळतंय. तर अभिनेता सुव्रत जोशी, सारंग साठ्ये हे दोघे छत्रपतींच्या दरबारात एकमेकांबरोबर बाजूला उभे आहेत.
शिवाय आशिष पाथोडे महाराजांच्या मागोमाग चालताना दिसून आला आहे. यापूर्वी ‘जाने तू’ हे गाणे प्रदर्शित झाले होते. ज्यात शुभंकर एकबोटे आणि ज्येष्ठ अभिनेत्री नीलकांती पाटेकर यांची एक झलक दिसली होती. याशिवाय ज्येष्ठ मराठी अभिनेत किरण करमरकरदेखील या गाण्यात दिसले आहेत. शिवाय मनोज कोल्हटकर आणि आस्ताद काळेदेखील या सिनेमात महत्वाच्या भूमिकेत आहेत. मात्र, त्यांच्या भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहेत.
‘छावा’ हा सिनेमा येत्या १४ फेब्रुवारी २०२५ रोजी सर्वत्र थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता विकी कौशल आणि महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत रश्मिका मंदाना झळकणार आहे. तर औरंगजेबाच्या भूमिकेत अभिनेता अक्षय खन्ना दिसणार आहे. याशिवाय सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या भूमिकेत अभिनेता आशुतोष राणा, सोयराबाईंच्या भूमिकेत दिव्या दत्त आणि जीनत-उन-निसा बेगम (औरंगजेबाची मुलगी) या भूमिकेत अभिनेत्री डायना पेंटी दिसणार आहे.
हेही पहा –
Chhabi Movie : समीर धर्माधिकारी, मकरंद देशपांडेंचा छबी येतोय प्रेक्षकांच्या भेटीला