बहुप्रतिक्षित सिनेमा ‘छावा’ येत्या 14 फेब्रुवारी 2025 रोजी सर्वत्र राज्यभरात थिएटरमध्ये प्रदर्शित होतोय. रिलीजआधी या सिनेमाबाबत प्रेक्षकांची वाढणारी उत्सुकता अगदी पाहण्याजोगी आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या ऐतिहासिक सिनेमात अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. नुकताच या सिनेमाच्या प्रमोशनचा श्रीगणेशा झाला आहे. माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथून ‘छावा’च्या प्रमोशनल दौऱ्याची सुरुवात करण्यात आली आहे. (Chhaava Movie Promotion started from Chhatrapati Sambhajinagar)
‘छावा’च्या प्रमोशनची दणक्यात सुरुवात
प्रदर्शनास केवळ आठवडा उरला असताना सिनेमाच्या टीमने अगदी दणक्यात प्रमोशनल दौऱ्याची सुरुवात केली आहे. छत्रपती संभाजीनगर पासून सुरु झालेला हा दौरा आता राज्यभरात भ्रमण करणार आहे. हा दौरा सुरू करण्यापूर्वी अभिनेता विकी कौशलने श्री घृष्णेश्वर, ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. महादेवाच्या आशीर्वादाने या महायात्रेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी विकीने अत्यंत मनोभावे शिवपूजन केले आणि सिनेमाच्या यशासाठी महादेवाला साकडे घातले.
भगवे झेंडे, ढोल ताशांचा गजर
यानंतर भगवे झेंडे फडकावत ढोल ताशाच्या गजरात आणि छत्रपती संभाजीनगर वासियांच्या गर्दीत हा महादौरा सुरू करण्यात आला आहे. तसेच हा प्रमोशनल दौरा सुरू करण्यापूर्वी अभिनेता विकी कौशलने छत्रपतींच्या अश्वारुढ पुतळ्याला नमन केले. त्यासोबत भगवा झेंडा चहुबाजुला फडकावला आणि वातावरणनिर्मिती केली. यावेळी उपस्थितांचा उत्साह अगदी पाहण्याजोगा होता. आसपासचा संपूर्ण परिसर शिवमय झाला होता. ही महायात्रा पाहण्यासाठी जमलेली गर्दी आणि त्यांचा उत्साह या वातावरणात आणखी ऊर्जा प्रदान करत होता.
मॅडॉक फिल्म्स निर्मित या सिनेमासाठी नामांकित संगीतकार ए.आर.रहमान यांनी साउंड ट्रॅक तयार केले आहेत. अंगावर काटा आणणारी दृश्य, मनाला भिडणारे संवाद आणि खिळवून ठेवणारे संगीत या सिनेमाची उजवी बाजू ठरणार आहेत. हा सिनेमा छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर बेतला असून त्यांची भूमिका अभिनेता विकी कौशल साकारतो आहे. तर महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत रश्मिका मंदाना आणि मुघल बादशाह औरंगजेबाच्या भूमिकेत अभिनेता अक्षय खन्ना दिसणार आहे. तसेच सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या भूमिकेत अभिनेता आशुतोष राणा, सोयराबाईंच्या भूमिकेत दिव्या दत्त आणि जीनत-उन-निसा बेगम (औरंगजेबाची मुलगी) या भूमिकेत अभिनेत्री डायना पेंटी झळकणार आहे.
हेही पहा –
Aishwarya Rai Bachchan : ऐश्वर्याने पतीसाठी केलेल्या त्या पोस्टमुळे घटस्फोटाच्या चर्चांना विराम