बॉलिवूड दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या ‘छावा’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून प्रेक्षक रिलीजच्या प्रतीक्षेत आहेत. या सिनेमात अभिनेता विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची आव्हानात्मक भूमिका साकारतो आहे. ट्रेलरमध्ये त्याच्या अभिनयाची झलक पाहून प्रेक्षकांनी त्याच्याकडून प्रचंड अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. तर रश्मिका मंदान्ना महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत आणि अक्षय खन्ना औरंगजेबाच्या निगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी एका मुलाखतीत विकी आणि अक्षयविषयी मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी सांगितले, अक्षय आणि विकी आपल्या पात्रांमध्ये इतके रमले होते की त्यांना एकमेकांचे तोंडदेखील पहावे वाटले नाही. (Chhaava Vicky Akshay refused to interact during filming know the reason)
सिनेमातला औरंगजेब पाहून तुम्हीही घाबराल
एका नामांकित वाहिनीशी संवाद साधताना दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी सांगितले, ‘अक्षय खन्ना हा सिनेइंडस्ट्रीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे. पण त्याने या सिनेमात ज्या पद्धतीने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे ते पाहून तुम्हीही घाबराल. यात तो फार कमी बोलला पण डोळ्यांमधून त्याने खूप काही गोष्टी सांगितल्या’. अक्षय रुपेरी पडद्यावर फारसा दिसत नसताना उतेकरांनी त्याला छावासाठी कसे तयार केले? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. याबाबत बोलताना ते म्हणाले, ‘मी अक्षयच्या अलिबाग येथील घरी गेलो होतो. तो खूप छान माणूस आहे. त्याने फार कमी प्रोजेक्टवर काम केले असले तरी तो जे काही करतो ते मनापासून करतो’.
काय म्हणाला विकी कौशल?
विकी कौशलने अक्षयसोबत काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. यावेळी तो म्हणाला, ‘छत्रपती संभाजी महाराजांचा शोध घेण्यासाठी औरंगजेबाला ९ वर्षे लागली. सिनेमात हा शोध दाखवण्यात आला आहे. या सिनेमात काही गोष्टी आहेत. ज्यात आम्ही एकमेकांना भेटण्याचा विचार करतो. पण हा क्षण पाहण्यासाठी तुम्हाला प्रतीक्षा करावी लागेल. औरंगजेबाच्या भूमिकेला त्याने योग्य पद्धतीने धूर्त आणि हुशार दर्शवले आहे’.
मुलाखतीवेळी उतेकरांनी असेही सांगितले की, ‘हा सिनेमा करण्यापूर्वी विकी आणि अक्षय कधीही भेटले नव्हते. ज्या दिवशी सिनेमाचे शूटिंग होणार होते, त्या दिवशी ते एकमेकांना पहिल्यांदा भेटले आणि तेही सिनेमातील एक पात्र म्हणून’. याबाबत बोलताना विकीने सांगितले, ‘शूटिंगपूर्वी आम्ही कधीच बोललो नव्हतो. आम्ही दोघांनी ना गुड मॉर्निंग म्हटलेले, ना गुडबाय किंवा हॅलो. तो औरंगजेबाच्या भूमिकेत होता आणि मी छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत. आम्ही भेटलो ते थेट शूटिंगमध्ये. त्यामुळे अध्येमध्ये कुठलेही संभाषण झाले नाही’.
विकी- अक्षयला एकमेकांचे तोंडही पहायचे नव्हते
सिनेमातील काही दृश्यांचे वर्णन करताना विकी म्हणाला, ‘असं कधीच झालं नाही की आम्ही एकमेकांच्या शेजारी बसलो, चहा घेतला आणि मग शूटिंगसाठी गेलो. मला आशा आहे की सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर मला त्याच्याशी बोलायची संधी मिळेल. कारण सिनेमाच्या शूटिंगदरम्यान आमच्यात कोणतेही संभाषण झाले नाही’. याबाबत दिग्दर्शक लक्ष्मण यांनी सांगितले की, ‘दोन्ही कलाकारांनी एकमेकांशी बोलण्यास स्पष्ट नकार दिला होता. दोघेही आपापल्या पात्रात इतके गुंतले होते की त्यांना एकमेकांचे तोंडदेखील पाहावेसे वाटले नाही.
हेही पहा –
Adinath Kothare : आदिनाथ कोठारेचा नवा सिनेमा, ‘बेनं’च्या शूटिंगचा श्रीगणेशा