बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सिनेमा ‘छावा’ येत्या 14 फेब्रुवारी 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. प्रदर्शनाआधीच या सिनेमाबाबत प्रेक्षकांची वाढणारी उत्सुकता पाहण्याजोगी आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या ऐतिहासिक सिनेमात अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. हा सिनेमा भारतात सर्वत्र थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. यासोबत देशाबाहेरही प्रदर्शित होणार असल्याचे समजत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हा सिनेमा भारतासह रुसमध्येही रिलीज होण्याच्या तयारीत आहे. (Chhaava will release simultaneously in India and russia)
परदेशातही ‘छावा’ची चर्चा
जेव्हापासून ‘छावा’ सिनेमाची घोषणा झाली आहे तेव्हापासूनच प्रेक्षक रिलीजच्या प्रतीक्षेत आहेत. हा सिनेमा महाराष्ट्राचे आद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर बेतलेला आहे. या मध्यवर्ती भूमिकेत अभिनेता विकी कौशल दिसणार आहे. अलीकडेच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ज्यात विकीने आपल्या भूमिकेसाठी घेतलेली मेहनत अगदी स्पष्ट दिसून येतेय. हा सिनेमा आतापर्यंत जितके ऐतिहासिक सिनेमे होऊन गेले त्यांच्या यादीत येत असला तरीही अत्यंत खास ठरणार आहे. याचे कारण असे की, ‘छावा’ हा सिनेमा फक्त देशात नव्हे तर परदेशातही प्रदर्शित होणार आहे.
माहितीनुसार, भारताबाहेर रुसमध्ये ‘छावा’ हा ऐतिहासिक सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे. रुसमध्ये या सिनेमाचे भव्य पद्धतीने प्रदर्शन करण्याची मेकर्सची तयारी सुरु आहे. मुख्य म्हणजे, भारतात आणि रुसमध्ये एकाच दिवशी हा सिनेमा प्रदर्शित केला जाईल. अर्थात एकाच दिवशी देशात आणि परदेशात हा सिनेमा धुमाकूळ घालणार हे स्पष्ट आहे. आता प्रतीक्षा आहे ती फक्त आणि फक्त 14 फेब्रुवारीची.
जबरदस्त स्टारकास्ट
बॉलिवूड सिनेमा ‘छावा’च्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांचे आयुष्य रुपेरी पडद्यावर दाखवले जाणार आहे. या सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता विकी कौशल साकारतोय. त्यामुळे विकीच्या खांद्यावर एक मोठी जबाबदारी देण्यात आली आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. शिवाय दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाने या सिनेमात महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली आहे. ही भूमिका साकारणे तिच्यासाठी अत्यंत भाग्याचे असल्याचे तिने म्हटलंय.
या सिनेमाच्या माध्यमातून मुघल बादशाह औरंगजेबाच्या भूमिकेत अभिनेता अक्षय खन्ना दिसणार आहे. ही भूमिका त्याच्या कारकिर्दीला एक वेगळे वळण देणारी ठरेल. तसेच सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या भूमिकेत अभिनेता आशुतोष राणा आपल्या भेटीस येत आहेत. सोयराबाईंच्या भूमिकेत दिव्या दत्त आणि जीनत-उन-निसा बेगम (औरंगजेबाची मुलगी) या भूमिकेत अभिनेत्री डायना पेंटी झळकणार आहे.
मॅडॉक फिल्म्स निर्मित हा सिनेमा बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीला एका वेगळ्या स्तरावर नेऊन ठेवेल अशी आशा आहे. या सिनेमासाठी नामांकित संगीतकार ए.आर.रहमान यांनी साउंड ट्रॅक तयार केले आहेत. अंगावर काटा आणणारी दृश्य, मनाला भिडणारे संवाद आणि खिळवून ठेवणारे संगीत या सिनेमाची उजवी बाजू ठरणार आहेत.
हेही पहा –
Saba Pataudi : सैफच्या फास्ट रिकव्हरीवर शंका घेणाऱ्यांना अभिनेत्याच्या बहिणीने दिलं सडेतोड उत्तर