छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज – भाग १’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. संदीप रघुनाथ मोहिते-पाटील प्रस्तुत आणि उर्विता प्रोडक्शन निर्मित बहुचर्चित, महाराष्ट्राचा महासिनेमा ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ या चित्रपटातील एक सीन सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे. औरंगजेबाच्या जुलमी सत्तेला आव्हान देत, छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाच्या छाताडावर लाथ मारून हिंदुत्वाला मिठी मारली. हा सीन सध्या खूप चर्चेत असून महाराजांवर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांनी हा सीन आणि चित्रपट डोक्यावर उचलला आहे. महाराष्ट्रभरात हा चित्रपट चांगलाच गाजत असून चित्रपटावर प्रेक्षक भरभरुन प्रेम करत आहेत.
या चित्रपटात ठाकूर अनुप सिंह, अमृता खानविलकर, किशोरी शहाणे, भार्गवी चिरमुले, मल्हार मोहिते-पाटील, संजय खापरे, पल्लवी वैद्य, कमलेश सावंत, विनीत शर्मा, प्रदीप रावत, प्रदीप कब्रा, राज जुत्शी प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहेत.
चित्रपटाचे दिग्दर्शक तुषार विजयराव शेलार म्हणतात, “संभाजी महाराजांचे जीवन म्हणजे प्रेरणादायी पराक्रमाची गाथा. आम्ही त्यांच्या संघर्षाच्या आणि वीरतेच्या काही महत्त्वाच्या क्षणांना उभं करण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना त्यांच्या जीवनातील प्रत्येक टप्प्याचा अनुभव घेता येईल. मला विश्वास आहे की, हा चित्रपट प्रेक्षकांना महाराजांच्या अद्वितीय धैर्याची झलक दाखवेल.”
संदीप रघुनाथ मोहिते-पाटील प्रस्तुत, आणि उर्विता प्रोडक्शन निर्मित या चित्रपटाची निर्मिती शेखर रघुनाथराव मोहिते-पाटील, धर्मेंद्र सुभाष बोरा, सौजन्य सूर्यकांत निकम आणि केतनराजे निलेशराव भोसले यांनी केली आहे.
Edited By – Tanvi Gundaye