गेल्या अनेक दिवसांपासून आगामी सिनेमा ‘छावा’ चांगलाच चर्चेत आहे. रिलीजआधीच या सिनेमाने प्रेक्षकांचे पूर्ण लक्ष वेधून घेतले आहे. जबरदस्त टिझर, लक्षवेधी पोस्टर्सनंतर आता या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमात अभिनेता विकी कौशल हा छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसतो आहे. टीझरमध्ये त्याच्या भूमिकेची एक छोटीशी झलक दिसल्यापासून प्रेक्षक ट्रेलरच्या प्रतीक्षेत होते आणि अखेर 22 जानेवारी 2025 रोजी दिमाखदार सोहळ्यात ट्रेलर रिलीज झाला.
शोर नव्हे शिकार करणारा ‘छावा’
22 जानेवारीला मुंबईत ‘छावा’ या बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोहळा मोठ्या ग्रँड पद्धतीने पार पडला. ज्यासाठी सिनेमातील मुख्य स्टारकास्ट आणि मेकर्सची पूर्ण टीम उपस्थित होती. युट्युबवर ‘छावा’ या सिनेमाचा ट्रेलर नंबर 1 वर ट्रेंडिंगमध्ये आहे. प्रेक्षकांनीदेखील या ट्रेलरला चांगली पसंती दिली आहे. एकूण 3 मिनिट 8 सेकंदाचा हा ट्रेलर तुम्हाला एक क्षणसुद्धा डोळे मिटून देणार नाही. अंगावर शहारे आणणारे प्रसंग आणि मनाला भिडणारे संवाद या ट्रेलरचे मुख्य आधार आहेत.
मराठी कलाकारांच्याही महत्वपूर्ण भूमिका
ट्रेलर रिलीजनंतर विकीच्या चाहत्यांसह अनेक मराठी कलाकारांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून खास पोस्ट शेअर केल्या आहेत. खास बाब अशी की, या सिनेमात काही मराठी कलाकार देखील दिसणार आहेत. ज्यामध्ये अभिनेता संतोष जुवेकर, शुभंकर एकबोटे, वैभव चव्हाण, अभिनेत्री अश्विनी मुकादम या कलाकारांचा समावेश आहे.
कधी प्रदर्शित होणार?
बहुप्रतीक्षित ‘छावा’ सिनेमात अभिनेता विकी कौशल हा छत्रपती संभाजी महाराजांच्या मध्यवर्ती भूमिकेत आहे. तर अभिनेत्री रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंच्या प्रमुख भूमिकेत झळकताना दिसेल. शिवाय अभिनेता अक्षय खन्ना या सिनेमात मुघल बादशाह औरंगजेबाची निगेटिव्ह भूमिका साकारतो आहे. या सिनेमाचा स्क्रीनप्ले आणि जबरदस्त संवाद हे लक्ष्मण उतेकर, ऋषी वीरमानी, कौस्तुभ सावरकर, उन्मन बनकर आणि ओमकार महाजन यांनी लिहिले आहेत. तर संगीत प्रसिद्ध संगीतकार ए. आर.रहमान यांनी दिले आहे. त्यामुळे हा ऐतिहासिक सिनेमा प्रेक्षकांसाठी एक खास पर्वणी आहे. जो येत्या 14 फेब्रुवारी 2025 रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
हेही पाहा –