सोनी मराठीचा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा एक धमाल कॉमेडी शो आहे. यामध्ये विनोदी प्रहसने सादर केली जातात. या कार्यक्रमातील मंडळी अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘चिकी चिकी बुबूम बुम’ या चित्रपटात झळकली. हास्यजत्रेतून प्रकाशझोतात आलेला अभिनेता प्रसाद खांडेकरने हा चित्रपट प्रदर्शित केला आहे. एक दिग्दर्शक म्हणून त्याचा हा दुसरा चित्रपट आहे. जो 5 मित्रांच्या रियुनियनवर आधारलेला आहे. यामध्ये हास्यजत्रेतील लोकप्रिय चेहरे आणि त्यासोबत मराठी सिनेविश्वातील लाडके नायक, नायिका झळकले आहेत. पण मुळात प्रसिद्ध चेहरे घेऊन केलेला चित्रपट विशेष ठरेलच अशी खात्री देणे अवघड असते. त्यामुळे अशावेळी कथानकावर जोर येतो. चला तर जाणून घेऊया ‘चिकी चिकी बुबूम बुम’ हा प्रयत्न कितपत जमून आलाय. (Chiki Chiki Booboom Boom Movie Review)
‘चिकी चिकी बुबूम बुम’ या चित्रपटाचे नाव अत्यंत वेगळे असल्यामुळे याकडून बरीच आशा ठेवली गेली. ट्रेलर पाहिल्यानंतर हा चित्रपट पूर्ण विनोदी असेल असेच वाटले होते. अर्थात काही पंचलाईन कमाल आहेत. पण पूर्णवेळ हसण्यासारखं यात काहीच नाही. कथानकात एक बंगला आहे. ज्यामध्ये हे सगळं नाट्य घडतं. एका रात्रीची ही गोष्ट असल्यामुळे कलाकारांच्या अंगावरील कपडेसुद्धा बदललेले दिसत नाहीत. अगदी एका रात्रीत एक अख्खं कथानक रंजक पद्धतीने दर्शवलं आहे. त्यामुळे कमी बजेटमध्ये एक सिनेमा कसा उत्तमरीत्या तयार करायचं हे यातून नक्कीच शिकण्यासारखं आहे.
चित्रपटाच्या कथानकाची मांडणी बरीच चांगली आहे. या कथेतील 5 पात्रं खूप जुने मित्र आहेत. ज्यांच्या रियुनियनमध्ये सगळी धमाल होताना दिसते. ते ज्या ठिकाणी रियुनियन करायला भेटतात त्या ठिकाणी एक हत्या होणे, मग निर्माण होणारा गुंता, तो सावरताना उडालेला पात्रांचा गोंधळ हे सगळंच पाहणं फार रंजक वाटेल. पण चित्रपटाचं नाव ‘चिकी चिकी बुबूम बुम’ का ठेवलं असेल बरं? असा प्रश्न मागे उरतो. ज्याचं कुणीच काहीच करू शकत नाही. असो..
कथानकाविषयी बोलायचं झालं तर शाळेतील जुन्या मित्रमंडळींचा ‘रियुनियन’चा बेत ठरतो. भेटीचं ठिकाण ठरतं ‘काकाचा बंगला’. या बंगल्यात येण्यासाठी आदित्य (प्रथमेश शिवलकर) सगळ्यांना निमंत्रण देतो. या पार्टीच्या नियोजनात त्याचा मित्र वैभव (स्वप्निल जोशी) त्याची मदत करतो. त्यामुळे आदित्य वैभवलाही पार्टीत यायला सांगतो. आता आदित्य, वैभव, टुमदेव (रोहित माने) , भैय्या (प्रसाद खांडेकर), धन्नो (प्रार्थना बेहेरे) आणि रावी (प्राजक्ता माळी) यांची पार्टी चांगली रंगात येते आणि त्यांना बंगल्यात एक मृतदेह सापडतो. याचं करायचं काय? पळून जायचं? पोलिसांना बोलवायचं? का आणखी काय करायचं? असे वेगवेगळे प्रश्न प्रत्येकाला पडू लागतात. शेवटी ते कोणता पर्याय निवडतात? या संकटातून ते सगळे बाहेर पडतात की अडकतात? या सगळ्याची गंमतीशीर गोष्ट म्हणजे ‘चिकी चिकी बुबूम बुम’.
मनोरंजनाच्या बाबतीत हा चित्रपट कुठेही कमी पडतो असे वाटत नाही. पण एव्हढे सगळे विनोदवीर जेव्हा एकत्र येतात तेव्हा कुठेतरी अपेक्षा थोड्या जास्त होतात असं वाटतं. चित्रपट पाहताना त्याचा पूर्वार्ध यातील पात्रांची ओळख करून देण्यात जातो. पुढे हळूहळू कथानकाला रंग चढतो. काहीवेळा ओढून ताणून विनोद झाल्याचे वाटते. पण कलाकारांचा दमदार अभिनय वेळ मारून नेतो. चित्रपटाचा उत्तरार्ध पूर्वार्धापेक्षा चांगला वाटतो. यातील प्रसंगांच्या मांडणीतून कलाकारांनी काढलेल्या विनोदाच्या जागा कौतुकास्पद आहेत. तसेच वर म्हटल्याप्रमाणे कलाकारांचा विनोदी अभिनय चित्रपटासाठी जमेची बाजू म्हटले तर चुकीचे वाटणार नाही. प्रत्येकाचं टायमिंग तुमच्या चेहऱ्यावर वेगवेगळे भाव आणण्यासाठी पुरेसं आहे.
या चित्रपटात सरप्राईज करते ती प्रार्थनाने साकारलेली धन्नो. नेहमीपेक्षा वेगळी अशी तिची भूमिका सहज तुमचे लक्ष वेधून घेते. तर चित्रपटातील आदित्य, भैय्या, टुमदेव, रावी या पात्रांसोबत अभिनेता स्वप्निल जोशीची वैभव ही भूमिका सर्वाधिक लक्ष वेधून घेते. विनोदवीरांच्या मैफिलीत स्वप्नील, प्रार्थना आणि प्राजक्ता वेगळीच छाप सोडून जाताना दिसतात. यांसह निखिल रत्नपारखी, चेतना भट, अभिजित चव्हाण, प्रियदर्शिनी इंदलकर आणि खुद्द सचिन गोस्वामीसुद्धा या चित्रपटात झळकले आहेत. प्रत्येकाने आपापल्या वाट्याला आलेली भूमिका कमाल साकारली आहे. शिवाय चित्रपटाचे पार्श्वसंगीत बऱ्यापैकी चांगले आहे. त्यामुळे थोडावेळ का होईना खळखळून हसायचं असेल आणि एक मजेदार राईड करायची असेल तर हा वन टाईम वॉच चित्रपट नक्की बघता येईल.
हेही पहा –
Punha Ekda Sade Made Teen : ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’चे शूटिंग पूर्ण