अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या नुकत्याच एका अपघातातून थोडक्यात बचावली आहे. सध्या देहरादून आणि मसूरी येथे स्टुडेंट ऑफ द ईयर २ या चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे. या शूटिंगदरम्यान अनन्याचा अपघात झाल्याचे वृत्त आहे. अनन्या या चित्रपटातून बॉलीवू़डमध्ये पदार्पण करत आहे.
नेमकं काय झालं ?
देहरादूनमध्ये अनन्या चित्रपटातील एक सीन शूट करताना हा अपघात झाला. या सीनमध्ये तिला कार ड्राइव्ह करायची होती. ड्राइव्ह करताना अचानक तिचा गाडीवरील ताबा सुटला आणि कार एका झाडावर जाऊन आदळली. अनन्याने सेफ्टी गार्ड लावलं असल्याने सुदैवाने तिला कोणतीही दुखापत झाली नाही.
बॉलीवूड पदार्पणाच्या तयारीत
निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या २०१२ मध्ये आलेल्या सुपरहिट चित्रपट ‘स्टूडेंट ऑफ द इयर’मधून आलिया भट्ट, वरुण धवन आणि सिध्दार्थ मल्होत्रा यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. आता या चित्रपटाच्या सिक्वलचे चित्रीकरण सुरू आहे. स्टूडेंट ऑफ द ईयर २ मधून अनन्यासोबतच तारा सुतारिया देखील बॉलीवूडमध्ये पदार्पण करत असून टायगर श्रॉफ हा मुख्य भूमिकेत आहे. वरुण धवन आणि सिध्दार्थ मल्होत्रा या चित्रपटात कॅमियो करणार असल्याचंही वृत्त आहे.
सोशल मीडियावर असते अॅक्टिव्ह!
अनन्या पांडे सोशल मीडियवर खूपच अॅक्टिव असते. ट्विटर, इन्स्टाग्रामवर ती सतत आपले फोटो शेअर आणि पोस्ट करते. तिच्या फोटोंना चाहत्यांसोबतच बॉलीवूड जगतातील सेलिब्रिटींनीही नेहमीच दाद दिली आहे. अनन्याने नुकताच तिच्या शूटिंगमधून ब्रेक घेत कुटुंबियासोबत एकत्र ब्रंचचा आस्वाद घेतला. आपल्या भावंडांसोबत ब्रेकफास्ट घेतानाचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. अनन्याच्या पदार्पणानंतर तिची चुलत बहीण अलानादेखील ग्लॅमरच्या दुनियेत येणार असल्याचे बोलले जात आहे.