अभिनेत्री वर्षा दांदळे यांच्या प्रकृतीची मुख्यमंत्री व महापौरांकडून विचारपूस

अभिनेत्री वर्षा दांदळे यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन त्यांचा अपघात झाल्याची माहिती दिली होती.

CM and mumbai Mayor inquired about health of marathi actress Varsha Dandale
अभिनेत्री वर्षा दांदळे यांच्या प्रकृतीची मुख्यमंत्री व महापौरांकडून विचारपूस

मुंबई महापालिका शाळांमधील शिक्षिका व अभिनेत्री वर्षा दांदळे यांच्या अपघाताची बातमी समजताच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः चौकशी करून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना, नाशिक येथे वर्षा दांदळे यांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यास सांगितले होते. त्यानुसार महापौरांनी मंगळवारी स्वतः भेट देऊन वर्षा यांची विचारपूस केली. याप्रसंगी, नगरसेविका सिंधू मसुरकर उपस्थित होत्या. पालिका शिक्षिका व अभिनेत्री वर्षा दांदळे यांनी वैद्यकीय सल्ल्याने औषधोपचार घेऊन लवकरात लवकर बरे व्हावे आणि पुन्हा एकदा चित्रपट क्षेत्रात नव्या उत्साहाने, उमेदीने काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन करावे, या शब्दात महापौर किशोरी पेडणेकर यांनी, वर्षा यांना शुभेच्छा दिल्या.

तसेच, अभिनेत्री वर्षा दांदळे या लवकरात लवकर बरे होण्यासाठी महापौरांनी ईश्वरचरणी प्रार्थना केली. त्याचप्रमाणे, महापौरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अभिनेत्री वर्षा दांदळे यांच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती देऊन आपले कर्तव्य बजावले.

अभिनेत्री वर्षा दांदळे यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन त्यांचा अपघात झाल्याची माहिती दिली होती. ‘माझा अपघात झाला असून पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याचप्रमाणे मणक्याला देखील त्रास झाला आहे. मी सध्या घरी आराम करत असून माझ्यासाठी सगळ्यांनी सदिच्छा व्यक्त करुन प्रार्थना करा’, असे आव्हान वर्षा दांदळे यांनी केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Varsha Dandale. (@varshadandale)

वर्षा दांदळे या नुकत्याच ‘पाहिले न मी तुला मी तुला’ या मालिकेत दिसल्या होत्या. या मालिकेत त्यांनी ‘उषा मावशी’ ही व्यक्तिरेखा साकारली होती. तसेच याआधीही वर्षा दांदळे यांची ‘नांदा सौख्य भरे’ या मालिकेतील ‘वच्छी आत्या’ ही भूमिका चांगलीच गाजली होती. ‘एकाच या जन्मी जणू’, ‘आंनदी हे जग सारे’ अशा अनेक मालिका आणि सिनेमात वर्षा दांदळे यांनी काम केले आहे.


हेही वाचा – Bahubali in Marathi: मराठी रसिकांसाठी ‘बाहुबली’ सिनेमा मराठी रूपात