‘टाईमपास ३’ चं कोल्ड ड्रिंक सॉंग प्रेक्षकांच्या भेटीला

झी स्टुडिओजच्या टाइमपास ३ या चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्यांचा सध्या समाजमाध्यमांवर एकच बोलबाला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरने केवळ तरुणाईचं नाही तर सर्वच वयोगटातील प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. शिवाय साई तुझं लेकरू आणि लव्हेबल या गाण्यांनाही प्रेक्षकांनी आपल्या पसंतीची पावती दिली आहे. यामुळे टाइमपास ३ बद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. ही उत्सुकता अधिक वाढविण्यासाठी आणखी एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. ‘कोल्ड ड्रिंक वाटतेस’ हे नवीन गाणं प्रेक्षकांना आपल्या तालावर ठेका धरायला लावण्यासाठी सज्ज झाला आहे. प्रथमेश परब आणि हृता दुर्गुळे यांच्यावर चित्रित झालेलं हे धम्माल गाणं गायलं आहे अमितराज आणि हिंदीमध्ये आपल्या आवाजाची जादू पसरवणाऱ्या शाल्मली खोलगडे यांनी. याचं संगीत अमितराज यांचं असून गाण्याचे शब्द क्षितीज पटवर्धनचे आहेत.

टाइमपास चित्रपटाच्या यापूर्वीच्या दोन्ही भागाच्या यशामध्ये त्यांच्या संगीताचा महत्त्वाचा वाटा होता. दोन्ही भागातील गाणी रसिकांमध्ये आजही लोकप्रिय आहेत. हीच परंपरा टाइमपास ३ नेही कायम ठेवली आहे. साई तुझं लेकरू या गाण्याने सोशल मीडियावर एकच कल्ला केला आहे. यात आता कोल्ड सॉंग नव्याने धुमाकूळ घालणार आहे. या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे याचे भन्नाट शब्द आणि चाल आणि त्याला न्याय देणारं तेवढंच धम्माल नृत्य दिग्दर्शन. राहुल ठोंबरे आणि संजीव होवालदार यांनी रचलेल्या कोरिओग्राफीवर प्रथमेश आणि हृता यांनी भन्नाट डान्स केला आहे. याशिवाय या गाण्यासाठी संतोष फुटाणे यांनी अतिशय सुरेख असं कला दिग्दर्शन केलं आहे.

सध्या पावसामुळे सगळीकडे गार गार वातावरण झालंच आहे. हा गारवा अधिक वाढवण्याचं काम हे कोल्ड ड्रिंक सॉंग करणार आहे. झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशनची निर्मिती असलेल्या टाइमपास ३ चे दिग्दर्शन रवी जाधव यांनी केले आहे. येत्या २९ जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.


हेही वाचा :‘मी पुन्हा येईन’मध्ये दिसणार सत्तेचा घोडेबाजार