राजू श्रीवास्तव यांना शु्द्धीत आणण्यासाठी अमिताभ बच्चन यांच्या ऑडिओ मेसेजचा वापर

गेल्या काही दिवसांपासून मृत्यूशी झुंज देणारे कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या दिर्घायुष्यासाठी अवघा देश प्रार्थना करत आहे. पण त्यांच्या तब्येतीत अपेक्षित सुधारणा होत नसल्याने एम्सच्या डॉक्टरांकडून आगळी उपचार थेरपी वापरण्यात येत आहे

गेल्या काही दिवसांपासून मृत्यूशी झुंज देणारे कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या दिर्घायुष्यासाठी अवघा देश प्रार्थना करत आहे. पण त्यांच्या तब्येतीत अपेक्षित सुधारणा होत नसल्याने एम्सच्या डॉक्टरांकडून आगळी उपचार थेरपी वापरण्यात येत आहे. यासाठी राजू श्रीवास्तव यांचे आदर्श असलेल्या बिग बींच्या आवाजाचा वापर डॉक्टर करत आहेत.

बिग बींनी राजू श्रीवास्तव यांना लवकर बरे व्हा अशी प्रार्थना करणारा ऑडिओ मेसेज पाठवला आहे. हा मेसेच राजू यांना सतत ऐकवण्यात येत आहे. राजू श्रीवास्तव हे बिग बींना आपला आदर्श मानतात. हे जगजाहीर आहे. आपल्या करियरची सुरुवात राजू यांनी बिग बींची मिमिक्री करूनच सुरू केली होती. आपला लूकही राजू यांनी बिग बींसारखाच ठेवला होता. त्यामुळे ते अल्पावधीतच लोकप्रियही झाले. तसेच अनेक कार्यक्रमात बिग बींनी राजू श्रीवास्तव यांची प्रशंसाही केली आहे. दोघेही उत्तर प्रदेशचे असून एकमेकांचे चाहतेही आहेत. यामुळे राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळाल्यापासून बिग बीही अस्वस्थ झाले आहेत. यादरम्यान, त्यांनी राजू यांच्या मोबाईलवर त्यांना लवकर बरे व्हा असे अनेक मेसेजही पाठवले. पण राजू बेशुद्धावस्थेत असल्याने ते मेसेज राजू आणि त्यांच्या कुटुंबीयांनीही वाचले नव्हते.

तर दुसरीकडे राजू यांना शुद्धीत आणण्यासाठी डॉक्टरही शर्थीचे प्रयत्न करत आहेत. याचदरम्यान शेवटचा उपाय म्हणून डॉ क्टरांनी मनोविज्ञानाचा आधार घेतला आहे. यापार्श्वभूमीवर राजू यांना जर त्यांच्या प्रिय व्यक्तीचा म्हणजेच बिग बी अमिताभ बच्चन यांचा आवाज सतत ऐकवल्यास कदाचित ते शु्द्धीत येण्याची आशा डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. यासाठी राजू यांच्या कुटुंबीयांनी बिग बींना राजू यांना पाठवलेले मेसेज ऑडियो स्वरुपात पाठवण्याची विनंती केली. बिग बींनीही तात्काळ ऑडिओ मेसेज पाठवला आहे. यात ते म्हणतात राजू उठ, बस झालं आता. खुप काम करायचंय. आता उठ आणि आम्हा सगळ्यांना हसायचं कसं ते शिकवं. बिग बींचा हा ऑडिओ मेसेज राजू यांना वारंवार ऐकवण्यात येत आहे.

दरम्यान राजू यांच्या तब्येतीत किंचितसी सुधारणा झाली असून त्यांना आता ट्यूबद्वारे दूध देण्यात येत आहे. मात्र ते अजूनही व्हेंटीलेटरवर आहेत. तसेच आता त्यांचा पल्स रेटही नॉर्मल झाला आहे. मात्र त्यांच्या मेंदूत गुंतागुंत झाल्याने ते अजूनही बेशुद्ध आहेत.