राज्याभिषेक विशेष सप्ताह

राज्याभिषेक विशेष सप्ताह

गुढीपाडवा हा काही फक्त दारात गुढी उभारुन साजर करण्याइतपत राहिलेला नाही. मराठी अस्मिता, मराठी जागृती यानिमित्ताने विभागातील आयोजक एकत्र येऊन शोभायात्रेच्या माध्यमातून गुढी पाडवा साजरा करत असतात. जिकडेतिकडे जोरदार तयारी सुरु झालेली आहे आणि यात हमखास शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचे संचलन उपस्थितांना पहायला मिळते. अशा पार्श्वभूमीवर झी-मराठीने स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत महाराजांचा राज्याभिषेक विशेष सोहळा आजपासून सलग सात दिवस दाखवण्याचे ठरवलेले आहे.

अभिषेकापूर्वीची तयारी, संभाजी महाराजांचे आगमन, मोठ्या प्रमाणात मावळ्यांची उपस्थिती, होम-हवन, मंत्रोच्चार, शाही थाट हे सर्व या सप्ताहामध्ये दाखवले जाणार आहे. शनिवार किंवा सोमवारी या अखेरच्या भागामध्ये राज्याभिषेक सोहळा प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल. प्राजक्ता गायकवाड, स्नेहलता वसईकर, राहुल मेहेंदळे यांच्या यात महत्त्वपूर्ण भूमिका असल्या तरी मुख्य भूमिका साकार करणारे डॉ. अमोल कोल्हे हे दर्शनी भागात दिसणार आहेत. यंदा लोकसभेच्या निवडणुकीत डॉ. अमोल कोल्हे हे उमेदवार म्हणून उभे राहिलेले आहेत. अशा पार्श्वभूमीवर दाखवला जाणारा हा राज्याभिषेक सोहळा त्यांच्या प्रचारासाठी कितपत उपयोगी ठरेल हा चर्चेचा विषय होणार आहे.