घरमनोरंजनसिनेमातल्या ‘सायकल’ची बदललेली गोष्ट

सिनेमातल्या ‘सायकल’ची बदललेली गोष्ट

Subscribe

काळाच्या ओघात शहरं बदलली तशी रस्त्यावरची सायकलही बदलत गेली. रस्त्यावरुन दिसणारे सायकलस्वार कमी झाले. महिन्याचं रेशन घेऊन घरी येणारी वजन उचलणारी काळ्या रंगातली सायकल हळूहळू रेसर, पुढे छोट्या चाकांची बीएमएक्स ते आताच्या गिअर बदलापर्यंत बदलत गेली. त्यावेळी मुंबईसारख्या शहरातील एखाद्या चौकात, नाक्यावर सायकलस्वाराला पाहण्यासाठी मोठी गर्दी व्हायची. हा सायकलस्वार सायकलवर उभा राहून कसरती करून दाखवे, एका चाकावर सायकल चालवणं, वेडीवाकडी सायकल चालवून जमलेल्यांचे मनोरंजन तो करत असे. तर हीच सायकल त्या काळात कामगार, कनिष्ठ मध्यमवर्ग आणि संघर्ष करणार्‍या पडद्यावरच्या नायकाचं प्रतिनिधीत्व करत होती. नूतन, शर्मिला टागोर, लीना चंदावरकर, रेखा, हेमा मालिनी, बिंदीया गोस्वामी या नायिकांना पडद्यावरच्या कॉलेजात ने-आण करण्याचं काम त्याकाळी या सायकललाच करावं लागे.

काळाच्या ओघात हळूहळू हिंदी पडद्यावरून सायकलही दिसेनाशी झाली. ७० च्या दशकात हिंदी पडद्यावरच्या बहुतांशी चित्रपटांत सायकलवरचं गाणं होतंच. अशी सायकल सफर बहुतेक नूतन, आशा पारेख, हेमामालिनी, पुढे रेखा आणि श्रीदेवी यांच्या वाट्याला आली. त्याकाळी नायिकांकडेच सायकल चालवण्याचे सगळे हक्क निर्विवाद होते. तर नायक खुल्या जीप किंवा व्हिंटेज कारमध्ये होते. पुढे नायक नायिका एकाच दुचाकीवर दिसू लागले. पण तोपर्यंत सायकलची मोटारसायकल झाली होती. पडद्यावरून पेडल इतिहासजमा होऊन किक स्टार्टचा जमाना सुरू झाला होता.
ऐंशीच्या दशकाआधी जागतिकीकरणाचा परिणाम नव्हता. मनोज कुमारचा १९७२ चा ‘शोर’ लक्षात असतोच. यात आजारी मुलाला वाचवण्यासाठी दवाखान्याचं बील भरण्यासाठीचा पैसा मनोजकुमार जिवाच्या आकांतानं आठवडाभर सायकल चालवून गोळा करतो. सायकल त्यावेळी कनिष्ठ मध्यम कामगारवर्गाचं प्रतिनिधीत्व करत होती.

‘जैसे राधाने माला जपी शाम की…’हे लताचं गाणं आणि मिल कामगार असलेल्या देवानंदसोबत सायकलवर बसलेली केसात गजरा माळलेली मुमताज हे कनिष्ठ मध्यमवर्गातल्या युगुलाचं रोजच्या जगण्यातल्या किरकोळ स्वप्नांचं कथानक असलेला ‘तेरे मेरे सपने’ (१९७१) सायकल सिनेमा. याच सिनेमातलं ‘मैने कसम ली…’हे गाणंसुद्धा लक्षात राहणारं सायकलसाँगच. तेव्हा सायकल आजच्या इतकी ग्लॅमरस नव्हती. सुबोध मुखर्जींचा ‘पेईंग गेस्ट’ १९५७ मध्ये रिलिज झाला. ‘माना जनाब ने पुकारा नही…’हे किशोरचं गाणं, यात नूतनच्या मागे मागे धावत तिला छेडणारा हलणार्‍या सायकलवर आणखी हेलकावे खाणारा देव आनंद आठवतोच. या गाण्यात देव आनंद नूतनला आपल्या सायकलवर ओढून डबलसीट घेतो आणि पुढे जातो. नायक नायिका एकाच सायकलवर डबलसीट…इतक्या एकमेकांच्या जवळ अरेरे…हे काय अरिष्ट असं वाटून ‘पेईंग गेस्ट’ सेन्सॉरनं प्रदर्शनासाठी रोखून धरला होता. आता दिग्दर्शक मुखर्जींनी देव आणि नूतन दोघांनाही दोन वेगवेगळ्या सायकली देऊन हे गाणं मार्गी लावलं आणि चित्रपट सेन्सॉरकडून सोडवून घेतला. या सायकलगाण्यातल्या घंटीच्या आवाजाचा वापर एस.डी. बर्मनने मोठ्या कल्पकतेने केला होता. त्यानंतर १९५९ मध्ये राज कपूरच्या ‘अनाडी’मध्ये हीच सायकल पुन्हा नूतननंच चालवली. गाणं होतं, ‘बन के पंछी…गाए प्यार का तराना…’ही रोमँटीक सायकल पुढेही थांबली नाही. ‘पुकारता चला हूँ मै…गली गली बहार की…’रफीसाहेबांच हे हळूवार गाणं ‘मेरे सनम’ (१९६५)च्या इस्टमनकलर काळातलं, यात नायक विश्वजीत जीपमधून सायकलवर असलेल्या आशा पारेख आणि तिच्या मैत्रिणींची खोडी काढतोय. ‘मै चली मै चली..देखो प्यार की गली…’पिकनिकला आलेली ‘पडोसन’मधली सायरा बानो आपल्या मैत्रिणींसोबत डोंगरकड्यातल्या वेड्यावाकड्या रस्त्यावरून सायकलसफारी करते, तोही हाच काळ होता.

- Advertisement -

‘शोर’ (१९७२) मधली सायकल अतिसर्वसामान्य कामगाराच्या कथानकाचा भाग होती. यातला सायकलस्वार मनोज कुमार होता. तर ऐंशीच्या दशकात सायकलस्वारीची ही जबाबदारी जितेंद्रने १९८६ मध्ये आलेल्या ‘घर संसार’मध्ये घेतली. यात जितेंद्रही आजारी नातेवाइकांसाठी सातत्याने आठवडाभर सायकल चालवतो आणि बक्षिसाची रक्कम जिंकून नातेवाइकाचे उपचार करतो. सत्तर ऐंशीच्या काळात हिंदी पडद्यावरच्या गावात खाकी कपड्यातला येणारा पोस्टमन सायकलवरूनच येत असे. ‘डाकिया डाक लाया…’(१९७६) ‘पलकों की छाव में’ मध्ये राजेश खन्नानं या गाण्यात गावातल्या वेड्यावाकड्या पायवाटेवरून चालवलेली सायकल लक्षात राहते. तर सुभाष घईंच्या ‘गौतम गोविंदा’ (१९७९) मधलं असंच एक सायकलगाणं महत्त्वाचं आहे. ‘इक रुत आये…इक रुत जाए, मौसम बदले ना, बदले नसीब…’किशोरच्या आवाजातल्या या गाण्यात बदली झालेल्या इन्स्पेक्टर नायक शशी कपूरला विजय अरोरा सायकलवर मागे बसवून गावात घेऊन येतो. या गाण्यातून चित्रपटाची पार्श्वभूमी उलगडत जाते. ‘शान’मधलं ‘जानू मेरी जान…’हे किशोर आणि रफीसाहेबांचं गाणं ऐंशीच्या दशकातलं सायकलगीतच होतं. यात पुढे दोन हँडलची सायकल वापरली गेली. त्यानंतर खूप वर्षांनी आलेला नव्वदच्या दशकातला ‘जो जिता वो ही सिंकदर’ हा सिनेमा संपूर्ण सायकलपटच होता. यातली अर्ध्याअधिक गाण्यात सायकलच होती. या चित्रपटाचा शेवट रोमहर्षक सायकलरेसमुळे लक्षात राहतो आणि हा सिनेमाही. हिंदी पडद्यावरच्या खान त्रिकुटांंच्या यशात या सायकलचाही वाटा मोठा आहे.

डोंगरावर दगड फोडून, खदानीत काम करून, खून पसीने की कमाई… दो हजार रुपये कमावून ‘मैने प्यार किया’मध्ये सलमान खान अर्थात प्रेम हा सुमन (भाग्यश्री)ला भेटायला सायकलवरूनच येतो. यात ‘आया मौसम दोस्ती का…’या सिनेमात आकाशात उडणार्‍या कबुतराबरोबर जमिनीवर चालणारी सायकलही होतीच. शहारूख खाननं नगमा नावाच्या नायिकेला ‘किंग अंकल’मध्ये…‘इस जहाँ की नही है…तुम्हारी आँखे,’ असं तिच्या डोळ्यांचं कौतुक करत सायकल सफर घडवली. तर मिथुन गोविंदानं श्रीदेवी, मंदाकिनीला अनेकदा पडद्यावर सायकलवर सोबत केली. चांदी की सायकल सोने के सीट…असं बोलून जुही चावलाला भाभी चित्रपटांत १९९२ मध्ये गोविंदानं अशाच सायकलवरून फिरवून आणलं. एन.चंद्राच्या ‘तेजाब’मध्ये मोहिनी असलेली माधुरी मंदाकिनीच्या कारच्या टायरची हवा काढते. त्यावेळी कॉलेजातून अनिल कपूरच्या सायकलवर डबलसीट जाणारी मंदाकिनी पाहून माधुरीचा तिळपापड होतो. आता हिच सायकल आलिया भट्ट शहारूख खानच्या डिअर जिंदगीत परदेशातल्या तांबड्या लाल फुलांचा सडा पडलेल्या चकचकीत रस्त्यावर दिसते. ‘पिकू’मध्ये अमिताभसोबत हीच सायकल असते. ‘बर्फी’मध्ये रणबीर कपूरला फिरवून आणते. रा-वन, राजकुमार हिरानीचा पी.के. सलमानचा ‘किक’, ‘जब वी मीट’मध्येही नायक नायिकांना प्रेमाची सफर घडवून आणणार्‍या या सायकलच्या प्रेमातून बॉलिवूडची सुटका अजूनही झालेली नाही.तीन ते चार दशकांपूर्वी कामगार असलेल्या नायकाचं प्रतिनिधीत्व करणारी सायकल आता खूपच रोमँटीक झाली आहे. ती आता कारखान्याचा भोंगा वाजल्यावर मिलमध्ये कामावर जाणार्‍या नायकाची रोजच्या जगण्यातली गरज राहिलेली नाही. पडद्यावरची सायकलही काळानुसार खूपच बदललेली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -